Hridaynath Mangeshkar : संगीत सागरातील हिमनग : पं. हृदयनाथ मंगेशकर

Pandit Hridaynath Mangeshkar
Pandit Hridaynath Mangeshkaresakal
Updated on

चंद्रासी अमृत घातले ।

तें तयाचि काई येतुले ।।

कीं सिंधु मेधा दिधलें ।

मेघाची भागू ।।

ज्ञानेश्वर माउलीरचित ‘अमृतानुभव’ या ग्रंथात दिलेल्या या ओवीचा अर्थ आहे, ईश्वराने चंद्रामध्ये अमृत घातले ते काय चंद्रापुरतेच? तर नाही, त्या अमृताच्या योगाने चकोर, वनस्पती वगैरे तृप्त होतात. सिंधूने आपले पाणी मेघांना दिले, ते काय मेघापुरतेच? तर नाही, ते पर्जन्यरूपाने सर्व जगास उपयोगी पडते.

म्हणजे एखादी उत्तम कलाकृती मनुष्य स्वरूपात ईश्वर निर्माण करतो, तेव्हा ती कुणा एकासाठी करत नाही, तर तिचा लोभ अवघ्या जगाला मिळावा, यासाठीच त्या उत्तम, श्रेष्ठ व्यक्तीचे प्रकटन या विश्वात झालेले असते. ज्ञानेश्वर माउलींनी सांगितलेली ही ओवी व त्यातील गर्भीतार्थ पं. हृदयनाथजी मंगेशकर यांना बरोबर लागू होतो.

त्यांचा गेल्या ८६ वर्षांचा जीवनप्रवास पाहता असे लक्षात येते, की अगदी बालवयापासूनच सुवासिक फुलाप्रमाणे स्वतःच्या स्वरांचा परिमळ सभोवार पसरवत कलारसिकांना आकर्षित करणं, हा त्यांचा गुण आपोआपच त्यांच्याही नकळत प्रकट होत होता. ८७ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा - विजयालक्ष्मी मणेरीकर (लक्ष्मीमंगेश), नाशिक

(birthday special article on Pandit Hridaynath Mangeshkar by Vijayalakshmi Manerikar)

वयाच्या दहाव्या वर्षीच ‘सुरेल बाल कला केंद्र’ या लहान मुलांच्या वाद्यवृंदाची निर्मिती करून उषा मंगेशकर, लक्ष्मीकांत प्यारेलाल, जयवंत कुलकर्णी अशा बालकलाकारांना एकत्रित करून गणपती मेळा, दिवाळी व सण-समारंभात संगीत कार्यक्रम प्रस्तुत करून स्वतःचे व स्वतःबरोबरच इतरांचे मनोरंजन करणे त्यातून संगीतनिर्मिती, प्रसार-प्रचार अशी विविध उद्दिष्टे साध्य करणे आणि आर्थिकदृष्ट्या स्वतः सक्षम होणे. कोणापुढेही हात पसरावा लागू नये, हा बाणेदारपणा इतक्या बालवयापासूनच जपणे, असे सगळे गुण-लक्षणे दिसतात.

मै अकेला ही चल पडा

जानिबे मंझिल मगर

लोग साथ आते गये

और कारवा बनता गया

-मजरूह सुलतानपुरी

हे त्यांच्या बाबतीत तंतोतंत खरे ठरते. त्यांचा सांगितिक परिवार असीमित आहे. जो कोणी कला, संगीत, साहित्य याबद्दलची याचना घेऊन त्यांच्यापर्यंत पोचला तो त्यांचाच झाला. त्यांच्या संगीताचा अभ्यास करताना लक्षात आले, की त्यांचे लोकप्रिय संगीत म्हणजे हिमनगाचा वर आलेला फक्त एक छोटासा सुळका आहे.

तळ शोधण्यास जितके खोल जावे, तितकी गहराईच हाती येते आणि त्यासोबत उलगडत जाते त्यांच्या कार्यशक्तीचे विविध पैलू! संगीतकार म्हणून त्यांच्याकडून काही स्वररचना समजून घेत असताना अचानक ते जेव्हा त्या शब्दांचा अर्थ सांगू लागतात, तेव्हा ते एक सर्वोत्तम साहित्यिक आहेत, हे जाणवते.

Pandit Hridaynath Mangeshkar
Lata Mangeshkar Birth Anniversary: लतादीदींच्या हातून टकमक टोकावरून कॅमेरा पडला आणि...

एकदा त्यांनी सांगितले होते, की लहानपणी जेव्हा दीदीकडे किंवा कोणाकडेही पैसे मागायचे नाही, असे त्यांनी ठरवले होते, तेव्हा संगीतरचना करण्याबरोबरच विविध वर्तमानपत्रे, मासिके, साप्ताहिक यांच्यासाठी लेख लिहून देण्याचा एक मार्ग त्यांना सापडला होता, ज्यायोगे त्यांना अर्थार्जन करणे शक्य होते आणि ते मासिकांसाठी वगैरे रोज भरपूर लिखाण करू लागले.

ही गोष्ट असेलस साधारणतः १९५५-५६ ची. त्या वेळी हृदयनाथजींचे फार हलाखीचे दिवस होते. कारण हाती कुठलेही काम नव्हते. पैशासाठी कोणाकडेही हात पसरायला त्यांना आवडत नसे. त्यांचा आकाशवाणीचा करार संपुष्टात आला होता. खिशात दहा रुपयेही नसायचे. स्वतःचा खर्च तरी कसा भागवायचा? वयात आल्यापासून त्यांनी कधीही त्यांच्या मोठ्या बहिणींकडे पैसे मागितले नाहीत. त्यांना पुरुषत्वाची जाणीव जरा जास्तच लवकर म्हणजे १३-१४ व्या वर्षीच झाली.

म्हणून आपण कष्ट करून अर्थार्जन केलेच पाहिजे, यावर ते ठाम होते. त्या वेळी ते त्यांच्या मित्राच्या मदतीने कुठे काम मिळते का, या शोधात असायचे. कारण त्यांना त्यांची थोरली बहीण लतादीदी यांच्या शिफारशीने काम नको होते आणि तसेही ते वयाने खूपच लहान होते. त्यांना गिरगावातील देसाई हा त्यांचा मित्र एकदा भेटला होता, तेव्हा त्याला त्यांनी आर्थिक चणचणीबद्दल सांगितले. तो

हृदयनाथजींना चिंतामणी प्रेसमध्ये घेऊन गेला. तिथे त्याकाळचे प्रसिद्ध संपादक बदरी कांचवाला भेटले. (गिरगावच्या चिंतामणी प्रेसच्या ‘वेणी’ या चित्रपट मासिकाचे मालक) ते मुस्लिम होते. पण मराठी मासिक छापायचे. त्यांना मराठी लिहिणारा लेखनिक म्हणून शंभर रुपये पगारावर त्यांनी हृदयनाथजींची नेमणूक केली. त्या वेळी त्यांचे वय सतरा-अठरा वर्षांचे होते. त्या वेळी त्यांनी काही लेख लिहून दिले होते.

Pandit Hridaynath Mangeshkar
Hridaynath Mangeshkar : पंडित हृदयनाथ मंगेशकरांची विनंती , लतादीदींच्या स्मारकावरून राजकीय वाद नको |

पण त्या संपादकांना अतिशय सुमार दर्जाचे आणि शृंगारिक शैलीतील लेख व कथा हव्या असायच्या. त्यातल्या साऱ्या कथा संपादकांच्या नावावर छापल्या जायच्या. असे लेख लिहिण्याचा त्यांचा पिंडच नव्हता. चिंतामणी देसाईंच्या प्रेसमध्ये अनेक मासिके छापली जायची. तेथे मिळेल त्या पैशावर त्यांनी लेखन केले होते. लेखक म्हणून त्यांनी स्वतःचे नाव कधीही छापले नाही. कारण लिहिण्याचा उद्देश लेखक म्हणून प्रसिद्धी मिळविणे हा नव्हताच.

त्यामुळे त्यांनी ते लिखाण लवकरच बंदही केले. त्याच कालावधीत त्यांनी आकाशवाणीसाठी केलेली गाणी म्हणजे ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या’, ‘कशी काळ नागिणी’, ‘चांदणे शिंपीत जाशी’, ‘सागरा प्राण तळमळला’ म्हणजे या गीतांच्या काव्याकडे पाहता लक्षात येते, की त्यांची साहित्याची आवड-निवड अतिशय दर्जेदार होती. मजबुरी नसती, तर त्यांना अशा प्रकारचे लेखन करायला कसे आवडले असते?

त्यांचे सगळेच कार्य पाहता लक्षात येते, की त्यांनी जे काही निर्माण केले, ते कला-साहित्याची उच्चतम जाण असणाऱ्यांसाठीच. त्यांच्या कुटुंबात कोणी रिकामे बसून वेळ वाया घालवणारे नव्हतेच. सगळेच उद्योगी, थोरल्या बहिणी सतत व्यस्त. त्या वेळी त्यांच्या घरात चित्रपट निर्मितीचेही फार वातावरण होते.

मा. विनायक यांची चित्रपटनिर्मिती कंपनी बंद पडल्यामुळे लतादीदी व इतर कलाकारांवर बेरोजगारीचे दिवस आले होते. काही वर्षांतच जेव्हा लतादीदींची परिस्थिती सुधारली, तेव्हा त्यांनी अनेक मराठी चित्रपट निर्मात्यांना सवलतीत जयप्रभा स्टुडिओ उपलब्ध करून दिला. हृदयनाथजी साधारण विशीत असतील, त्या वेळी जयप्रभा स्टुडिओतील चित्रपटांमध्ये ते कधी संगीत संयोजक, कधी चित्रपट सहाय्यक निर्माता, कधी एडिटर, संगीत दिग्दर्शक, गायक अशा विविध भूमिकांमध्ये काम करायचे.

Pandit Hridaynath Mangeshkar
Lata Mangeshkar: बॉलीवुडने लता दिदींवर केले होते 'हे' गंभीर आरोप.. पण दिदी म्हणाल्या.. video viral..

त्यातून ते चित्रपट निर्मितीबद्दल शिकले असावेत. तशीही त्यांच्या वडिलांनी ‘बलवंत संगीत नाटक मंडळी’ व ‘बलवंत पिक्चर्स’ चित्रपट निर्माण कंपनी काढली होती. जरी हृदयनाथजींना त्यात कधीही प्रत्यक्ष सहभागी होता आले नव्हते, तरी वडिलांकडून आलेला चित्रपटनिर्मितीचा तोही गुण त्यांच्यात होताच. हृदयनाथजींनी वयाच्या २३ व्या वर्षी म्हणजे १९६० मध्ये स्वतःचा पहिला चित्रपट ‘अंतरीचा दिवा’ निर्माण केला होता.

माधव शिंदे त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते व स्वतः हृदयनाथजी संगीतकार होते. लेखक व संगीतकार म्हणून सुरू झालेली कारकीर्द पुढे चित्रपटनिर्माते म्हणूनही वळण घेऊ लागली होती. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त पं. हृदयनाथजींना महाराष्ट्रातल्या तमाम रसिकांतर्फे साष्टांग नमस्कार. त्यांना उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

Pandit Hridaynath Mangeshkar
Lata Mangeshkar: लता मंगेशकरांची शेवटची इच्छा कुटुंबाने पूर्ण केली, या मंदिराला दिली १० लाखांची देणगी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()