पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : महावितरणच्या कृषी धोरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने केली जाणारी वीजबील वसुली अन्यायकारक आहे. त्या वसुलीतून शासन निर्णयाप्रमाणे पिंपळगाव परिसरातील वीजयंत्रणेचे कोणतेही सक्षमीकरण झालेले नाही. शिवाय शेतकऱ्यांकडून वीज जोडणीचा कर आकारला जातो. यावरून निफाड तालुका भाजप आक्रमक झाली आहे. ठेकेदाराकडून होणाऱ्या वीजबील वसुलीविरोधात भाजपचे तालुकाध्यक्ष भागवत बोरस्ते, निफाड विधानसभा प्रमुख यतीन कदम यांच्या नेतृत्वाखाली महावितरणवर धडक मोर्चा काढण्यात आला.
शेतकऱ्यांची महावितरणकडून फसवणूक...
भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वीजबील वसुली थांबलीच पाहिजे, अशी घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडला. यतीन कदम यांनी वीजबील वसुली अन्यायकारक असल्याची भूमिका मांडली. महावितरणचे कार्यकारी अभियंता एकनाथ कापसे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने कृषी धोरण योजनेतून वीजबील वसुलीतून स्थानिक गावातील वीज यंत्रणेच्या सक्षमीकरणाचा निर्णय घेतला. त्यात नवीन कृषीपंप जोडणी, रोहित्रांची क्षमता वाढविणे, वीज यंत्रणा बळकटीकरणाचे शासनाचे निर्देश होते. त्यानुसार पिंपळगाव विभागातून १२ कोटी रूपये वीजबील वसुली झाली आहे. त्यातील ३३ टक्के म्हणजे ४ कोटी रूपये वीज यंत्रणेच्या सक्षणीकरणासाठी वापरणे अपेक्षीत होते. पण, तसे झालेले नाही. शिवाय शेतकऱ्यांकडून वीज जोडणीचा कर आकारला जात आहे. शेतकऱ्यांची महावितरणकडून फसवणूक होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शासनाने गाजर फक्त दाखविले...
कृषी धोरण योजनेत विभागात कोणते वीज सक्षमीकरण झाले, असा सवाल भाजपचे किसान मोर्चा राज्य सरचिटणीस बापूसाहेब पाटील यांनी कार्यकारी अभियंता कापसे यांना केला. याबाबतची सविस्तर माहिती पंधरा दिवसांच्या आत न दिल्यास परिसरातील शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. कृषीपंपाचा वापर नसतानाही भरमसाठ बिले, वारंवार वीजपुरवठा खंडीत होण्यावरून भाजपचे जिल्हा चिटणीस सतीश मोरे यांनी खडेबोल सुनावले.
''कृषी धोरण योजनेतून वीज यंत्रणा सक्षमीकरणाचे शासनाने गाजर दाखविले. पण, फक्त शेतकऱ्यांकडून वसुली होत आहे. याविरोधात भाजप शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे.'' - यतीन कदम, माजी सदस्य, जिल्हा परिषद
या वेळी भाजपचे शहराध्यक्ष गोविंद कुशारे, अल्पेश पारख, प्रशांत घोडके, नंदलाल नांवदर, रिद्धेश सोनी, दिनकर कुयटे, चिंधू काळे आदी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.