Nashik News : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीला बेशिस्त वाहने जसे कारणीभूत आहेत. त्याचप्रमाणे, शहरातील अनेक मार्गांवर सिग्नलपासून हाकेच्या अंतरावरील बसथांबेही अडथळे ठरत आहेत.
शहर बस प्रवाशांसाठी थांबताच, पाठीमागे वाहनांची रांग लागून वाहतूक यंत्रणा कोलमडून पडते. त्यामुळे सिग्नलनजीकचे बसथांबे हलविण्याची नितांत आवश्यकता व्यक्त होत आहे. (Bus stops near signal have become obstacles Traffic congestion at various places Nashik News)
वाहतूक सुरळीत होण्यासाठी सातत्याने सिग्नल यंत्रणाही वाढविली जात आहे. असे असतानाही वाहतूक कोंडीची समस्या सुटलेली नाही. त्यात भर पडते आहे, ती वाहतूक सिग्नलपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बसथांब्याची.
नाशिक- पुणे महामार्गावरील उपनगर नाकावर नाशिक रोडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील सिग्नलपासून अवघ्या शंभर मीटरच्या आत बसथांबा आहे.
रस्ता मोठा असला तरी या रस्त्यावरच नाशिक रोड रेल्वे स्टेशन असल्याने पंचवटी वा नाशिकच्या उपनगरी भागातून नाशिक रोडकडे जाणाऱ्या शहर बसही मोठ्या संख्येने आहे.
त्यामुळे उपनगर नाक्यावरील बसथांब्यावर बस प्रवाशांसाठी थांबते, त्यावेळी पाठीमागून आणखी बस, अवजड वाहनेही येत असतात.
एक शहर बस थांबल्याने पाठीमागील वाहनांना पुढे जाण्यास पुरेसा रस्ता नसेल तर वाहने थांबतात. परिणामी उपनगर नाका सिग्नलची यंत्रणा वाहतूक कोंडीमुळे कोलमडून पडते.
असा प्रकार सिडकोतील त्रिमूर्ती चौकात पहावयास मिळतो. उंटवाडीकडून सिडकोकडे जाणारी बस भाजी मार्केटसमोर थांबते. भाजी मार्केटमधील व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमणामुळे आधीच रस्त्यावर वाहतूक कोंडी असते, त्यात जर शहर बस थांबली तर वाहनांची रांग दत्तमंदिरापर्यंत लागते.
तर, सिडकोकडून उंटवाडीकडे येताना त्रिमूर्ती चौकातील सिग्नलवरच बसथांबा आहे. सिडको, कामटवाड्याकडून एकजरी शहर बस आली, तरी सिग्नल यंत्रणा कोलमडून पडते. त्याचा मोठा मनस्ताप वाहनचालकांना सहन करावा लागतो.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अशीच परिस्थिती पंचवटीतील काटया मारुती चौकात असते. या चौफुलीवर पंचवटीतून, निमाणीकडून आणि हिरावाडीकडून वाहतूक येते. चौकापासून अवघ्या ५० मीटरवर शहर बसथांबा आहे.
या बसथांब्याला आधीच रिक्षाचा गराडा. त्यात बस थांबल्यानंतर पाठीमागे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे सिग्नल असूनही काहीही उपयोग होत नाही. असे सिग्नलनजीकचे बसथांबे शहरात अनेक मार्गांवर आहेत.
स्मार्ट रोडवरील मेहेर सिग्नलपासून हाकेच्या अंतरावर अशोकस्तंभ/मेहेर बसथांबा आहे. त्र्यंबक रोडवरील इदगाह मैदानासमोरचा बसथांबाही चौकापासून काही अंतरावर आहे.
रस्ता मोठा असला तरी बऱ्याचदा येथेही वाहतूक कोंडी होते. अशी कोंडी सोडविण्यासाठी सिग्नलनजिकचे बसथांबे हलविण्याची नितांत आवश्यकता वाहनचालकांकडून व्यक्त होते आहे.
हे शहर बसथांबे अडथळ्याचे
उपनगर नाका, काट्या मारुती चौक, त्रिमूर्ती चौक, मेहेर, उत्तमनगर (सिडको), तारवालानगर (दिंडोरीकडून येताना), नाशिक रोड (उड्डाणपुलाखालचा).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.