सटाणा (जि. नाशिक) : जिल्हा परिषदेची प्रारूप गट रचना जाहीर झाल्याने बागलाणमध्ये राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येनुसार प्रारूप गट रचनेत मुल्हेर हा एक गट वाढल्याने आता बागलाणमधील गट संख्या आठ, तर पंचायत समिती गणांची संख्या १६ झाली आहे. मात्र, प्रारूप गट रचनेत अनेक गावांची तोडफोड झाल्याने अनेक इच्छुकांची मोठी पंचाईत, तर काहींची सोय होणार आहे. त्यानुसार इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली असून, इच्छुकांची संख्या पाहता महाविकास आघाडीची बिघाडी होऊन सर्वच पक्ष आमनेसामने येणार असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.
बागलाण तालुक्यात यापूर्वी सात जिल्हा परिषद गट आणि चौदा पंचायत समिती गण होते. त्यामध्ये पठावे दिगर, ताहाराबाद, जायखेडा, नामपूर, ब्राह्मणगाव, ठेंगोडा, विरगाव या सात गटांचा, तर पठावे दिगर, मानूर, ताहाराबाद, अंतापूर, जायखेडा, आसखेडा, नामपूर, अंबासन, ब्राह्मणगाव, लखमापूर, ठेंगोडा, मुंजवाड, विरगाव, कंधाणे अशा १४ पंचायत समिती गणांचा समावेश होता. आता वाढत्या लोकसंख्येनुसार तालुक्यात एका जिल्हा परिषद गटाची भर पडली आहे. तर पंचायत समितीच्या दोन गणांची भर पडली आहे. नव्याने झालेल्या गट रचनेत विरगाव, ताहाराबाद आणि पठावे दिगर या गटांची तोडफोड करण्यात आली आहे. नव्याने करण्यात आलेल्या रचनेत पठावे दिगर गटाऐवजी मुल्हेर आणि डांगसौंदाणे अशा दोन गटांची निर्मिती करण्यात आली आहे. या दोन गटात पेसा क्षेत्रातील गावे विभागली गेली आहेत.
इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु
गट व गणाचे आरक्षण जाहीर न झाल्याने अनेक प्रस्थापित इच्छुकांनी व नवोदितांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. असे असले तरी ‘सेफ झोन’ म्हणून अनेकांनी आपली छुपी रणनीती तयार करण्याचे काम सुरु केले आहे. सुरक्षित मतदारसंघ ‘सेफ झोन’ म्हणून वीरगाव, ताहाराबाद, डांगसौंदाणे, नामपूर या चार गटांकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत. हे चार गट चक्राकार पद्धतीनुसार खुले होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे आज तरी या गटांमध्ये मातब्बर इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केल्याने या गटामध्ये चुरस होणार आहे. नव्याने झालेला डांगसौंदाणे गट खुल्या प्रवर्गासाठी निघावा म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. या गटात सटाणा बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे, पंकज गायकवाड, सुभाष सावकार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. अनिल पाटील, बाजार समितीचे संचालक संजय बिरारी, रमेश वाघ, अशोक गुंजाळ यांच्या नावाची चर्चा आहे. जर हा गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्यास खुल्या प्रवर्गातील इच्छुकांना आपला मोर्चा गणाकडे वळवून एकप्रकारे दुधाची तहान ताकावर भागवावी लागणार आहे.
राखीवमधून माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ सूर्यवंशी, तुकाराम देशमुख, गजानन ठाकरे यांची नावे समोर येत असली तरी बहुतांश पक्षांना उमेदवार शोधावे लागणार आहेत. ताहाराबाद गट हा चक्रकार पद्धतीने आरक्षण निघाल्यास खुला होण्याची दाट शक्यता असली तरी तो महिलांसाठी आरक्षित झाल्यास बहुतांश इच्छुकांना थांबावे लागेल. नाही तर आपल्या सौभाग्यवतींना रिंगणात उभे करावे लागणार आहे. या गटामधून पिंपळकोठेचे सरपंच किशोर भामरे, त्यांच्या सौभाग्यवती माजी जिल्हा परिषद सदस्या सीमा भामरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुभाष नंदन, गिरीश भामरे, नामपूर बाजार समितीचे सभापती कृष्णा भामरे, संचालक संजय भामरे, भाऊसाहेब भामरे, नानासाहेब भामरे, डॉ. नितीन पवार, डॉ. प्रशांत सोनवणे, सुरेश महाजन, नितीन भामरे, सुनील गवळी, ज्ञानेश नंदन ही नावे चर्चेत आहेत. वीरगाव गटात माजी सभापती यशवंत पाटील, वीरगावचे सरपंच ज्ञानेश्वर देवरे, सटाणा बाजार समिती सभापती पंकज गायकवाड, संचालक प्रभाकर रौंदळ, केशव मांडवडे, वसंत भामरे, किशोर खैरनार, राकेश देवरे, सुरेश पवार, गौरव निकम, जिभाऊ मोरकर ही नावे चर्चेत आहेत. नामपूर गटात विद्यमान जिल्हा परिषद सदस्य यतीन पगार, नामपूर बाजार समिती संचालक दीपक पगार, जिभाऊ कापडणीस, काकडगावचे सरपंच संजय पवार, भाऊसाहेब अहिरे, डॉ. सी. एन. पाटील, नकुल सावंत, विलास सावंत, अविनाश सावंत, रेखा शिंदे यांची नावे घेतली जात आहेत.
हे गट येणार डेंजर झोनमध्ये
जायखेडा, ब्राह्मणगाव, ठेंगोडा, मुल्हेर हे गट अनुसूचित जमातीसाठी राखीव होण्यार असल्याचे बोलले जात आहे. हे गट राखीव झाल्यास विद्यमान जिल्हा परिषद सदस्य यतीन पगार, लता बच्छाव, मीना मोरे, गणेश अहिरे यांची मात्र पंचाईत होणार आहे. हे गट राखीव झाल्यास उमेदवार शोधण्यासाठी सर्वच पक्षांना दमछाक करावी लागणार आहे.
गटनिहाय (सध्याचे आरक्षण)
पठावे दिगर (खुले), ताहाराबाद (अनु. जमाती, महिला), जायखेडा (खुले), नामपूर (अनु. जमाती), ब्राह्मणगाव (खुले, महिला), ठेंगोडा (ओबीसी, महिला), वीरगाव (अनु. जमाती, महिला).
संभाव्य आरक्षण सोडत
मुल्हेर (अनु. जमाती), ताहाराबाद (खुले), जायखेडा (अनु. जमाती), नामपूर (खुले), ब्राह्मणगाव (अनु. जाती/ जमाती), ठेंगोडा (अनु. जमाती), वीरगाव (खुले), डांगसौंदाणे (खुले).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.