Nashik Farmer Protest: निळवंडे धरणाचे आवर्तनाचे पाणी सिन्नर तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांना नदी मार्गाने मिळावे या मागणीसाठी मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर शनिवारी रस्ता रोको आंदोलन करणाऱ्या सुमारे १०० आंदोलक शेतकऱ्यांविरोधात वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वतःचा जीव धोक्यात घालून समृद्धी महामार्गावरील वाहतूक रोखून धरत प्रवाशांना वेठीस धरणे व जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case has filed against farmers protesting at Samruddhi mahamarg nashik news)
समृद्धी महामार्गावर सोमवारी सकाळी साडेअकरा वाजल्यापासून निळवंडे आवर्तनाचे पाणी सिन्नर तालुक्यातील लाभक्षेत्रात येणाऱ्या मलढोन, सायाळे, पाथरे खुर्द व बुद्रुक, वारेगाव या गावांसाठी, संगमनेर तालुक्यातील देवकवठे कोपरगाव तालुक्यातील बहादरपुर या गावांसाठी पुन्हा सोडावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे तासभर शेतकऱ्यांनी रोखून धरली होती.
यावेळी शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ तसेच घोषणाबाजी केली. समृद्धी महामार्गावर बेकायदेशीर प्रवेश करत शेतकऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला तसेच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील वेठीस धरले असे फिर्यादीत म्हटले आहे.
जलसंपदा विभाचे कनिष्ठ अभियंता (पालखेड कालवा उपविभाग, तळेगाव दिघे) यांचे फिर्यादीवरून वावी पोलीस ठाण्यात भा.दं. वि कलम ३४१,१४३,१४५,१४७, १४९, ५०४ प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहेब पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पारस वाघमोडे याप्रकरणी तपास करीत आहेत.
यांचे विरोधात दाखल झाला गुन्हा....
नाशिक महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक भागवत आरोटे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय रामराव शिंदे , पंडित चासकर, विकास शेंडगे, चिंटू लांडगे, शिवाजी चासकर , सुभाष चासकर, सोमा लांडगे, बाळासाहेब मोटे, प्रकाश जाधव, शिवाजी शिंदे, वामन शिंदे , दिलीप चासकर, संतोष शिंदे, संजय कोरडे, सुभाष शिंदे, अशोक मोटे, नवनाथ शेंडगे, संजय जाधव, हरीश गोसावी, सोनू चासकर सर्व रा. सायाळे ता. सिन्नर, अण्णा गेठे, शिवाजी हलवर, नारायण गेठे, विठ्ठल गेठे सर्व रा. मलढोण ता. सिन्नर, भगीरथ वाणी, सुनील चिने रा. वारेगाव, कैलास राहणे, गंगाधर राहणे, गोपीनाथ राहणे रा. बहादुरवाडी ता. कोपरगाव, ज्ञानेश्वर मुंगसे, राजेंद्र कहांडळ रा. देवकवठे ता. संगमनेर यांचे सह ९० ते १०० ग्रामस्थ यांचे विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
"शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणखी गुन्हे दाखल झाले तरी आम्ही कारवाईला सामोरे जाऊ. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची केवळ एकच बाजू बघितली. आम्हाला आमचे हक्काचे पाणी हवे आहे. ते सरळ मागणीने मिळाले नाही म्हणून आंदोलन करावे लागले.
पाटबंधारे विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांशी तुच्छतेने वागले त्याचा जाब या पुढच्या काळात विचारला जाईल. धरणात पाणी असूनही आमच्या हक्काचे पाणी मिळत नव्हते म्हणून रस्त्यावर उतरलो. या पुढच्या काळात हक्काच्या पाण्यासाठी मोठ्या स्वरूपाची आंदोलने करण्यात येतील." - भागवत आरोटे (नगरसेवक नाशिक मनपा तथा भूमिपुत्र देवकवठे)
"निळवंडे कालव्याला पाणी सोडले म्हणून अकोले तालुक्यातील शेती खराब होते असे धुळफेक करणारे उत्तर जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी दिले. आवर्तन थांबवायचे होते तर ते थेट धरणातून थांबवायला हवे होते. मात्र तसे न करता सिन्नरच्या वाट्याचे पाणी राहता तालुक्यात वळवण्यात आले.
यासंदर्भात जलसंपदा विभागाच्या संगमनेर कार्यालयात तसेच सिन्नर तहसीलदारांना लेखी निवेदन दिल्यानंतरच शेतकऱ्यांनी समृद्धीवर आंदोलन केले. जलसंपदा विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांची व शासनाची देखील दिशाभूल करत आहेत. आंदोलकांवर गुन्हे दाखल करून त्यांनी त्यांचे काम केले. आता हक्काच्या पाण्यासाठी शेतकरी जिवाचे रान करतील." - डॉ. विजय शिंदे (सायाळे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.