नाशिक : दररोज हजारो प्रवाशांचा राबता असलेल्या शहरातील जुन्या मध्यवर्ती बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे चार वर्षांपासून बंद असल्याने हजारो प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. बंद सीसीटीव्ही चोरट्यांच्या पथ्यावर पडत असून, सततच्या चोऱ्यांनी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत एसटीचे दुर्लक्ष का होत आहे, हेही न उकलणारे कोडे असल्याचे पोलिसांच्या पाठपुराव्यावरून दिसून येते. (CCTV of central bus station closed for 4 years Passenger safety at stake Nashik Latest Marathi News)
येथील मध्यवर्ती बसस्थानकाची चार वर्षांपूर्वी रंगरंगोटी करण्यात आली. विविध संदेश देणारे चित्रही रेखाटण्यात आल्याने स्थानकाचे रुपडे पालटले आहे. परंतु येथे बसविण्यात आलेले सीसीटीव्ही बंद असल्याने चोरीच्या घटना वाढतच आहे. या स्थानकात नंदुरबार, सटाणा, नवापूर, अक्कलकुवा, साक्री, लासलगाव, पिंपळगाव, कळवण, पेठ या आगारातील बसची ये-जा असते.
त्यामुळे दररोज हजारो प्रवाशांची चढ-उतार होते. गर्दीचा फायदा घेत चोरटे आपला कार्यभाग साधतात. चोरी झाल्याचे प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर तक्रार केली जाते. पोलिसही घटनास्थळी येतात. परंतु सीसीटीव्ही बंद असल्याने चोरट्यांचा शोध घेण्यात अडचणी येतात.
सीसीटीव्ही सुरू करण्याबाबत वेळोवेळी वरिष्ठांना सांगितले आहे. मात्र अद्याप कुठलीच कार्यवाही झाली नसल्याचे स्थानकातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने याप्रश्नी लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
"जुन्या बसस्थानकातील सीसीटीव्ही बंद असल्याबाबत आपल्याला कल्पना नाही. आगारप्रमुखच सांगू शकतील. याबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल."
- अरुण सिया, विभागीय नियंत्रक, नाशिक
"जुन्या बसस्थानकातील सीसीटीव्ही सुरू करण्याबाबत एसटीच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. परंतु कुठलीही दखल घेतली जात नाही. चोरीच्या घटनांचा उलगडा यामुळे होत नाही." - साजन सोनवणे, पोलिस निरीक्षक, सरकारवाडा
"जुन्या बसस्थानकात नेहमीच चोरीच्या घटना घडतात. परंतु चोरट्यांचा शोध लागत नसल्याने मानसिक त्रास सहन करावा लागतो. सीसीटीव्ही सुरू केल्यास या घटनांना आळा बसेल."
- योगेश पाटील, प्रवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.