मालेगाव (जि. नाशिक) : बानूबाईच्या चंदनपुरीत चंपाषष्ठीच्या मुहूर्तावर मल्हार भक्तांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा गजर केला. खोबरे-भंडाऱ्याची उधळण करत देवाला भरीत-भाकरीचा नैवेद्य दिला. पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. महापूजा, अभिषेक, आरती आदी धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. भाविकांनी चंदनपुरी गजबजून गेली होती. रात्री उशिरापर्यंत श्रद्धाळूंची गर्दी होती. (Champa Shashti 25000 devotees indulged in khandoba temple at Chandanpuri Distribution of Mahaprasad of Bharit Bhakri nashik news)
कोरोना नियंत्रणात आल्यानंतर दोन वर्षांत प्रथमच चंपाषष्ठीचा उत्सव उत्साहात झाला. वाघ्या-मुरळीनी काल सायंकाळीच चंदनपुरी गाठली होती. मल्हार भक्तांचे पाय सकाळपासूनच चंदनपुरीकडे वळत होते. सकाळी मंदिरात श्री खंडेराय, म्हाळसादेवी, बानाई यांची महापूजा करण्यात आली. अभिषेक व आरती झाली. देवाला भरीत- भाकरीचा नैवेद्य देण्यात आला.
भाविकांनी तोबा गर्दी केल्याने दर्शनासाठी एक ते दीड तासाचा कालावधी लागत होता. श्रद्धाळूंना दर्शनरांगेतून टप्प्या टप्प्याने सोडण्यात येत होते. यासाठी स्वयंसेवक व पोलिस मदत करीत होते. खोबरे-भंडाऱ्याची उधळण करत श्री खंडेराय, म्हाळसादेवी व बानाईमातेचा जयजयकार करण्यात येत होता. मंदिर परिसरात तसेच बानाई मंदिराजवळ भरीत-भाकरीचा प्रसाद वाटण्यात येत होता.
कसमादेसह खानदेशमधील हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. अनेक कुटुंबीयांनी चंदनपुरीत चुली मांडून देवाला भरीत-भाकरीचा व पुरणपोळीचा नैवेद्य दिला. तसेच भरीत-भाकरीचा कोटम भरत ‘जय मल्हार’चा गजर केला. अवघ्या चंदनपुरीत भरीत-भाकरीचा सुगंध दरवळत होता. मंदिर परिसरात श्रीफळ, फुलहार, भंडारा, पेढे, सौंदर्यप्रसाधने, खेळणी, उपाहारगृह आदींची शेकडो दुकाने लावण्यात आली होती.
हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...
चंदनपुरीला यात्रेचे स्वरूप आले होते. गर्दीमुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला. वाहनांच्या गर्दीने वाहनतळ हाउसफुल होते. भाविकांना जय मल्हार ट्रस्ट व ग्रामपंचायतीने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. किल्ला पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
यात्रोत्सवाचे वेध
चंदनपुरीत श्री खंडेराव महाराजांचा यात्रोसाव पौष पौर्णिमेला सुरू होतो. पंधरा दिवस यात्रा भरते. यात्रेत खानदेशसह राज्यातील मल्हार भक्त हजेरी लावतात. कोरोनामुळे दोन वर्ष यात्रा भरली नाही. या वर्षी यात्रा भरणार आहे. मालेगाव शहरासह कसमादेवासीयांना यंदा यात्रेचे वेध लागले आहेत.
"चंपाषष्ठीनिर्मित पंचवीस हजारांवर मल्हार भक्त चंदनपुरीत आले होते. पिंपळगाव बसवंत येथील पायी यात्रेने आलेल्या भाविकांचे स्वागत करण्यात आले. श्री खंडेरायाचा चंदनपुरीतील पौष पौर्णिमेला सुरू होणारा यात्रोत्सव देखील उत्साहात होईल."
- सतीश पाटील, अध्यक्ष, जय मल्हार ट्रस्ट, चंदनपुरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.