Chandrashekhar Bawankule News : दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या जी-२० परिषदेत १९ देशांबरोबर भारताचा करार झाला, त्या कराराचे नाव काय? या प्रश्नाचे उत्तर भारतीय जनता पक्षाच्या एकाही पदाधिकाऱ्याला देता न आल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर डोक्याला हात लावण्याची वेळ आल्याचे समजते.
नाशिक पूर्वचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी जैव इंधन करार असे उत्तर दिल्यावर बावनकुळे यांचा चढलेला पारा खाली आल्याने दिलासा मिळाला. बावनकुळे यांनी भारत २०२९ पर्यंत इंधनावर अवलंबून राहणार नाही, अशी जोड देताना विकासाच्या मुद्द्यावर २०४७ पर्यंत भाजपची सत्ता ठेवण्यासाठी गुजरात पॅटर्न अमलात आणण्याचा सल्लाही दिला.
भाजपच्या बूथप्रमुखांच्या आजच्या मेळाव्यातील काहीही बाहेर पडू नये, अशी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, बैठकीत अनेक खुमासदार किस्से बाहेर आलेच... (chandrashekhar bawankule news gathering of BJP booth chiefs nashik news)
श्री. बावनकुळे यांच्या उपस्थितीत गंगापूर रोडवरील प्रसाद मंगल कार्यालयात लोकसभा महाविजय अभियानांतर्गत तीन विधानसभा मतदारसंघांतील ३०० बूथप्रमुखांचा मेळावा झाला. या वेळी बावनकुळे यांनी आत्मनिर्भर भारत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी २०४७ पर्यंत देशात भाजपची सत्ता राहायला हवी.
२०२४ च्या निवडणुका जिंकण्यासाठी राज्यात गुजरात पॅटर्न वापरण्याचा सल्ला दिला. नऊ वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या कामाचा आलेख वाचताना ‘जी २०’ परिषदेवरून बूथप्रमुख व व्यासपीठावर बसलेल्या पदाधिकाऱ्यांची परीक्षा श्री. बावनकुळे यांनी घेतली. मात्र, या परीक्षेत आमदार ढिकले यांच्या व्यतिरिक्त सर्वच अनुत्तीर्ण झाल्याचे दिसून आले.
जी-२० परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी २१ देशांबरोबर भारताचा एक महत्त्वाचा करार केला, त्या कराराचे नाव काय? असा प्रश्न बूथप्रमुखांना केला, मात्र त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर मिळाले नाही. व्यासपीठावरील पदाधिकाऱ्यांकडे पाहताना हाच प्रश्न बावनकुळे यांनी विचारला. एकाही पदाधिकाऱ्याला कराराचे नाव सांगता न आल्याने बावनकुळे यांनी डोक्याला हात लावला. आमदार ढिकले यांनी जैविक इंधन करार नाव सांगितल्यावर बावनकुळे यांनी त्यात अधिक माहितीची भर घालून लोकसभा निवडणुकीचे धडे पदाधिकाऱ्यांना दिले.
जी-२० परिषद व चांद्रयान अभियान ही भारताची मोठी उपलब्धी आहे, ती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदी हे जागतिक नेते झाले असून, १९८ पैकी १५० देशांचे नेते त्यांना नेता मानत आहेत.
मोदी यांच्यामुळे देशाचा झपाट्याने विकास होत असून, भाजपच्या सत्ताकाळात मोठी क्रांती झाल्याचा दावा त्यांनी केला. दूरसंचार क्षेत्रात भारत आत्मनिर्भर झाला आहे. गुजरात पॅटर्नमुळे तेथे भाजपने एकहाती सत्ता मिळवली, हाच पॅटर्न राज्यातील निवडणुकीत वापरण्याचा सल्लाही त्यांनी बूथप्रमुखांना दिला.
मीडियासाठी चोख बंदोबस्त
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना निवडक लोकांकडे मोबाईल होता. आता मजुराच्या हातातही मोबाईल आहे. दूरसंचार क्षेत्रात भारताने मोठी क्रांती केल्याचा दावा भाषणात बावनकुळे यांनी केला. मात्र, याच बूथप्रमुखांच्या बैठकीत उपस्थितांना मोबाईल बंदी केल्याने बावनकुळे यांचा दावा चांगलाच चर्चेत आला.
नगर येथील बैठकीत पत्रकारांना ढाब्यावर घेऊन जा, असे वक्तव्य बावनकुळे यांनी केले. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका झाली. त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या बूथप्रमुखांच्या बैठकीत भाषण बाहेर पडू नये, यासाठी बूथप्रमुखांना मोबाईल ‘स्विच ऑफ’ करणे बंधनकारक करण्यात आले. माध्यमांच्या एकाही प्रतिनिधीला आत येऊ न देण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शेला काढला तर किंमत शून्य
भाजपच्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर असलेला पक्षाचा शेला हीच किंमत आहे. शेला काढल्यावर तुम्हाला शून्य किंमत आहे. तुमची प्रतिष्ठा हा कमळाचा शेला असून, ती जपण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला त्यांनी बूथप्रमुखांना दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.