Nashik News : खरीप कांद्यासाठी देशामध्ये कर्नाटकमधील चित्रदुर्ग-विजापूर-बागलकोट हा पट्टा निम्म्यापेक्षा अधिक पुरवठादार म्हणून ओळखला जातो. शिवाय राजस्थानमधील अलवर, मध्य प्रदेशातील खंडवा, आंध्र प्रदेशातील कर्नुल, तेलंगणामधील अनंतपूर हे खरीप कांद्याचे आगर म्हणून ओळखले जाते.
आता त्यात कांद्याचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील चांदवड, देवळा, येवला, मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील सीमेवरील गावांच्या पट्ट्याचा समावेश होऊ पाहत आहे.
देशातील एकूण खरीप कांद्याच्या क्षेत्राच्या तुलनेत चांदवडपट्ट्याचे क्षेत्र दहा टक्के झाले असून, यंदा मॉन्सूनचे वेळापत्रक बिघडल्याने खरीप क्षेत्रात १० ते १५ हजार हेक्टरची भर पडण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत. (Chandvadpatta becoming place like Chitradurg for kharif onions Including border villages of Devla Yeola Nandgaon Malegaon talukas nashik)
जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये उन्हाळ कांद्याची दोन लाख २० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर लागवड झाली होती. त्यात निफाड, सिन्नर, येवला, चांदवड, मालेगाव, बागलाण, नांदगाव, कळवण, दिंडोरी, देवळा या तालुक्यांतील क्षेत्र अधिक आहे.
नाशिक, इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा या तालुक्यांतही उन्हाळ कांद्याची लागवड झाली होती. त्यातच आता देशात खरीप कांद्यासाठी चांदवड, देवळा, नांदगाव, मालेगाव, येवला तालुक्यांतील गावे पुढे येत आहेत.
गेल्या वर्षी जिल्ह्यात खरीप कांद्याची २७ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर लागवड झाली होती. त्यात एकट्या चांदवड तालुक्याचे क्षेत्र ११ हजार हेक्टरच्या आसपास राहिले.
तसेच लेट खरीप कांद्याच्या जिल्ह्यात लागवड झालेल्या ५१ हजार हेक्टर क्षेत्रात येवला तालुक्यातील दहा हजारांहून अधिक चांदवडमधील दहा हजारांहून अधिक, मालेगावमधील १५ हजारांहून अधिक, नांदगावमधील साडेसात हजार, देवळ्यातील तीन हजार २०० हेक्टर क्षेत्राचा समावेश होता.
कृषी अभ्यासक आणि अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मनमाड हे केंद्रस्थानी धरल्यास खरीप कांद्याचे क्षेत्र ६० ते ७० किलोमीटर परिघात विस्तारत आहे. दरम्यान, खरीप कांद्याची जिल्ह्याची सरासरी हेक्टरी उत्पादकता १५ टन असून, गेल्या वर्षी चांदवड पट्ट्यातील २१ हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रातून ३.१९ लाख टन खरीप कांद्याचे उत्पादन मिळाले होते.
गेल्या वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दिंडोरी तालुक्यात ८५, देवळ्यामध्ये १४९, सिन्नरमध्ये २९, येवल्यामध्ये २३०, चांदवडमध्ये ८६३, मालेगावमध्ये ५, बागलाणमध्ये ३० हेक्टरवर खरीप कांद्याची रोपे टाकण्यात आली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
चांदवड पट्ट्यात रोपे टाकण्यास सुरवात
खरीप कांद्याच्या चांदवड पट्ट्यात आता रोपे टाकण्यास सुरवात झाली आहे. पुरेसा पाऊस होऊन जमिनीत ओल उतरावी आणि विहिरीच्या पातळीत वाढ व्हावी मग खरिपासाठी रोपे टाकण्याच्या कामाला वेग द्यावा, असा सल्ला कृषी विभागाचा आहे.
मात्र शेतकऱ्यांनी रोपे टाकताना शाश्वत पाण्याचा विचार केलेला दिसतो. म्हणजेच काय, तर देशात कांद्याचा तुटवडा उद्भवेल तेव्हा पुरवठा करण्याची तयारी या पट्ट्यातील शेतकऱ्यांनी केलेली दिसते.
यंदा उन्हाळ कांद्याचे नुकसान अधिक झाले. शिवाय चाळीत ठेवलेला कांदा टिकण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत उन्हाळ कांदा बाजारात आणण्यासाठी शेतकरी किती प्रतीक्षा करतील, हा प्रश्चन आहे.
जूनमध्ये लाल कांद्याचे बी कमी प्रमाणात विकल्याचे व्यापारी सांगताहेत. त्यावरून लाल कांद्याचा हंगाम लांबला आहे.
शिवाय पाऊस लांबल्याने इतर पिके घ्यायची म्हटल्यावर लेट खरिपाच्या कांद्यासाठी क्षेत्र कसे उपलब्ध होणार, अशी चिंता शेतकऱ्यांपुढे आहे. त्यामुळे चांदवड पट्ट्यात यंदा खरिपासह लेट खरिपाचे क्षेत्र वाढणार हे स्पष्ट झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.