Nashik News : महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीमुळे विकासाचा गाडा हळूहळू धावत आहे. उत्पन्न वाढीसाठी मनपाच्या मालमत्तांचा पुरेपुर व योग्य वापर आवश्यक आहे. शहरात १३८ हून अधिक झोपडपट्ट्या आहेत. (change in municipal reservation is necessary nashik nmc news)
शहरात झोपडपट्टीची संख्या जास्त असल्याने शहरात पूर्वी मोठ्या संख्येने सार्वजनिक शौचालये झाली. यातील २५ पेक्षा अधिक सार्वजनिक शौचालयांच्या जागा मोक्याच्या भागात आहेत. येथे व्यापारी संकुलांना मोठा वाव आहे.
राज्य शासनाच्या हागणदारीमुक्तीच्या घोषणेनंतर शहरातील हजारो नागरीकांनी वैयक्तिक शौचालय अनुदानाचा लाभ घेतला. ही स्थिती पाहता काही भागात मोजके शौचालये असल्यासही काम मार्गी लागू शकते. यासाठी तसेच तरण तलाव, नाट्यगृह, उद्यान अशी काही प्रमुख विकासकामे मार्गी लावण्यासाठी आरक्षणात बदल होणे ही उत्पन्न वाढीसाठी गरजेचे आहे.
महानगरपालिकेची सोमवार बाजार भागातील मराठी शाळा सर्वाधिक मोठी आहे. मनपाची ही शाळा सव्वादोन एकर परिसरात आहे. येथील दुमजली इमारतीत शेकडो खोल्या आहेत. शाळा बंद पडल्यानंतर इमारत व अब्जावधी रुपयांची जागा निकामी ठरली आहे. शेजारी बालगंधर्व नाट्यगृह आहे. शहराच्या लोकसंख्येच्या मानाने हे नाट्यगृह परिपूर्ण नाही. आसन क्षमताही तोकडी आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या शाळेच्या जागेच्या आरक्षणात बदल केल्यास अनेक विकासकामे मार्गी लागू शकतील. शाळेच्या दोन्ही बाजूला व्यापारी संकुल करुन महापालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढही होवू शकेल. अशा असंख्य शाळा आहेत. या शाळांच्या खोल्या जुन्या काळात अनेक संस्था, संघटनांना नाममात्र दराने भाडेतत्त्वावर दिल्या आहेत.
सुधारित नियमानुसार महासभेत संस्था, संघटनेला जागा द्यावयाची असल्यास रेडीरेकनर प्रमाणे भाडे आकारणी केली जात असल्याने या दराने खोल्या स्वीकारण्यास फारसे कोणी धजावतही नाहीत. त्यादृष्टीने नवीन विकास आराखड्यात या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
शहरातील मनपा शाळांची जी स्थिती आहे तीच स्थिती येथील प्रमुख सार्वजनिक शौचालयांची आहे. संगमेश्वरातील भवानी चौक, कॅम्प भागातील मोची कॉर्नर, नयापुरा, आझादनगर, नया आझादनगर अशा अनेक भागात मोक्याच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालयांसाठी मोठ्या जागा अडलेल्या आहेत.
एखाद्या संस्थेला किंवा विकसकाला या जागा देऊन आधुनिक शौचालय बांधून अतिरिक्त जागेवर व्यापारी संकुल करूनही मनपा उत्पन्न वाढीस हातभार लावता येईल. बीओटी तत्त्वावरही अशा जागा विकसित करण्यास वाव आहे. याच पद्धतीने लल्ले चौकातील सार्वजनिक शौचालयाची जागा बीओटी तत्त्वावर विकसित करण्यात आली.
विकसकाने ४० लाख रुपये खर्चून शौचालय बांधले. दर्शनी भागात व्यापारी संकुलाची निर्मिती केली. मनपाला बीओटीचा दोन कोटीचा हप्ता आला. व्यापारी संकुलांचे भाडेही सुरु झाले. याच पद्धतीने अन्य शौचालयांच्या जागा विकसित करता येतील.
शहरात दहापेक्षा अधिक जागा मोक्याच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालयांसाठी अडकलेल्या आहेत. त्या विकसित केल्यास सोयी सुविधांबरोबरच उत्पन्न वाढीस हातभार लागेल.
आरक्षण बदलाऐवजी सुधारीत विकास आराखड्यात व्हावा समावेश
मनपा कार्यक्षेत्रात पूर्वीच्या आरक्षित जागा विकसित झाल्या आहेत. सद्य:स्थितीत त्या निकामी ठरत असल्यास आरक्षण बदलण्याची तरतूद आहे. मात्र त्यासाठी महासभेचा ठराव, सूचना, हरकती, अंतिम शासन निर्णय यात मोठा कालावधी वाया जाऊ शकतो.
त्याऐवजी सुधारित विकास आराखड्यात अशा प्रस्तावित जागांचा विकास करण्याचे नियोजन करण्यास वाव आहे. शहरातील गिरणा पुलाजवळ महापालिकेने स्मशानभूमी व दफनभूमीसाठी जागा खरेदी केली आहे.
मात्र याच जागे नजीकच्या आरक्षित जागेवर सर्रासपणे बांधकामे व भूखंडांची विक्री सुरु आहे. अशा अवैध बांधकामे व भूखंड विक्रीला सर्व प्रशासन यंत्रणांनी समन्वय साधून चाप लावणे गरजेचे आहे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.