अंदरसूल (जि.नाशिक) : येवला तालुक्याच्या राजकारणात सर्वांत महत्त्वाची अन् किंगमेकरची भूमिका बजावणाऱ्या सर्वांत मोठ्या अंदरसूल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा फड कडाक्याच्या थंडीतही चांगलाच तापू लागला आहे. मात्र पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या शब्दांवर ग्रामपंचायतीत बिनविरोधाचे वारे वाहू लागले आहेत.
छगन भुजबळ यांच्या शब्दांवर ग्रामपंचायतीत बिनविरोधाचे वारे
यंदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने येवला तालुक्यातील सर्वांत मोठ्या अन् प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या अंदरसूल ग्रामपंचायतीच्या गावगाड्याचा कारभारी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना आताच सरपंचपदाचे डोहाळे लागले आहेत. यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संख्या वाढली असून, गटप्रमुखांची डोकेदुखी वाढली आहे. मात्र हायकमांडने दिलेल्या आदेशानुसार दोन्ही गटांतील गटप्रमुख नेत्यांनी बिनविरोधासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बिनविरोधाच्या या नव्या फॉर्म्युल्याने तालुक्यात एक नवा इतिहास होऊन एक आदर्श निर्माण होऊ शकतो.
राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
परंतु सरपंचपदाचे आरक्षण जाहीर नसल्याने ‘गावकी’ आणि ‘भावकी’ या दोन शब्दांभोवती राजकारण फिरत असल्याने गावाचा कारभारी होण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची धावपळ होताना दिसत आहे. ग्रामस्थही जो-तो इतरांचे जाणून घेण्यात इच्छुक असल्याने ‘काय म्हणतो गावगाडा’ अशा मिश्कील शब्दातील चर्चेला उधाण येऊन प्रत्येकाच्या अंतरमनाचा ठाव घेतला जात असल्याचे दिसते. अंदरसूलला १७ ग्रामपंचायत सदस्य असल्याने निवडणूकही नेहमी ‘खाल’चा गट आणि ‘वर’चा गट अशा दोन गटांतून लढविली जाते. मात्र या वेळी दोन्ही गटांतील गटप्रमुख पालकमंत्री छगन भुजबळांचे शिलेदार असल्याने यंदाची निवडणूक बिनविरोधच्या दिशेने सर्वांचेच प्रयत्न सुरू आहेत. परंतु १७ जागांपैकी कोणत्या गटाला किती किती जागा मिळणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली असून, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सत्ताधारी गटाला मिळाल्याने कोणाला किती जागा मिळणार हे उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा - वडिलांसोबतची लेकीची 'ती' ड्राईव्ह शेवटचीच; पित्याचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश
भुजबळांचा गटप्रमुखांना सल्ला
मागील आठवड्यात झालेल्या मतदारसंघाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ यांनी गावपातळीवर सर्वांनी एकत्र येऊन गटतट व पक्षभेद विसरून गावविकासासाठी प्रयत्नशील राहा. यासाठी शिवसेना, काँग्रेस पक्षाला बरोबर घेऊन राष्ट्रवादीने मोठ्या भावाप्रमाणे भूमिका बजावा. गावात होईल तितक्या शांततेत निवडणूक पार पाडून बिनविरोधसाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दोन्ही गटप्रमुखांना दिला आहे.
------चौकट---------
वॉर्डनिहाय मतदारसंख्या
वॉर्ड क्रमांक स्त्री पुरुष एकूण
१) ५४७ ६५८ १,२०५
२) ६४९ ७५७ १,४०६
३) ७८० ९०७ १,६८७
४) ७२१ ९०७ १,६२८
५) ७०३ ७८९ १,४९२
६) ७७३ ८३८ १,६११
------------------
एकूण ४,१७३ ४,८५६ ९,०२९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.