नाशिक : उत्तम हवामान व सुसंस्कृत राहणीमान ही ओळख टिकवून नाशिकमध्ये वैद्यकीय पर्यटनाचे हब निर्माण करण्याचा मानस आहे. तसेच आज सर्वांनी जात, धर्म, प्रांत, लिंगभेद विसरुन कोरोनासारख्या विषाणूचा एकजुटीच्या भावनेने सामना करण्याचे आवाहन, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी केले आहे.
नाशिक रोडच्या विभागीय आयुक्त कार्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते संपन्न झाले, त्यावेळी पालकमंत्री भुजबळ बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार सरोज अहिरे, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या संचालिका अश्वती दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, माजी मंत्री शोभा बच्छाव उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, क्रांतीकारक, स्वातंत्रसैनिकांनी जसे देशाला ब्रिटीशांच्या तावडीतून मुक्त करुन स्वरुन स्वातंत्र्य मिळवून देण्याचा चंग बांधला होता. त्याप्रमाणे आज स्वातंत्र्यदिनी सर्वांना एकजूट व ऐक्यातून देशाला राज्याला, जिल्ह्याला कोरोनामुक्त संकल्प करण्याचे आवाहन पालकमंत्री भुजबळ यांनी सर्व नागरिकांना केले आहे. नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व पदव्यूत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था देशात रोल मॉडेल ठरेल अशा पध्दतीने विकसित करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.
सर्व यंत्रणेच्या अहोरात्र मेहनतीने जिल्ह्यातील कोरोनारुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. कोरानाकाळात आपली आरोग्य व्यवस्था बळकटीकरणावर भर देवून नवीन ऑपरेशन थिएटर्स, ऑक्सिजन प्लांट, सर्व सुविधांनी युक्त प्रयोगशाळा कमी कालावधीत पुर्ण करण्यात येत आहे. तसेच म्युकरमायकोसिस सारख्या आजाराला प्रशासन व आरोग्य विभागाने प्रभावीपणे नियंत्रणात आणले असल्याचे सांगत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले.
कोरानासारख्या संकटकाळात कुणाचीही उपासमार होवू नये यासाठी अन्न्, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यात 1 हजार 167 शिवभोजन केंद्रामार्फत 5 कोटी थाळी वाटपाचा टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर 15 एप्रिल 2021 पासून गरीब व गरजू जनतेला शिवभोजन थाळी नि:शुल्क उपलब्ध करुन दिली जात असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
आज स्वातंत्र्यदिनी ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्प राज्यभर सुरु करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन पीक कर्ज, पीक विमा अशा योजनांचा लाभासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईल ॲपच्या आधारे स्वत: पीक पेरणीची माहिती तलाठ्याकडे पाठविता येणार आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सातबारा व खाते उतारा थेट वेब पोर्टलवरून ऑनलाईन उपलब्ध करून देण्याची सुविधा महसूल प्रशासनाने विकसित केली आहे. तसेच ई-फेरफार प्रणालीमध्ये अनोंदणीकृत व नोंदणीकृत फेरफार यांची प्रलंबित संख्या कमी करण्याच्या कामात नाशिक महसूल विभाग आघाडीवर असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
नाशिक विभागातील आत्महत्याग्रस्त पात्र शेतकरी कुटुंबियांच्या वारसांना सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून उभारी योजनेच्या माध्यमातून मदत करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षामार्फत 1 हजार 341 अर्जांचे निराकरण करण्यात आले आहे. डिजिटल इंडिया आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात अभिलेखांच्या स्कॅनिंग प्रकल्पाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.
कोरोना काळात कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या 24 बालकांना प्रत्येकी पाच लाख रुपये सहाय्य मंजुर करण्यात आले आहे. संगोपन योजनेंतर्गत एकूण 531 बालकांना दरमहा अकराशे रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. लोकसेवा हक्क अधिनियम कायद्याद्वारे 100 सेवा देणारा नाशिक हा राज्यातील एकमेव जिल्हा असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
माझी वसुंधरा अभियांनांतर्गत विभाग, जिल्हा, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद या चारही गटात नाशिक जिल्ह्यासह विभागाची कामगिरी राज्यात उत्कृष्ट राहिली आहे. नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तांनी सुरु केलेल्या गुन्हेगार सुधार योजनामुळे गुन्हेगारांना रोजगारासोबत समाजाच्या मुख्य प्रवाहात स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मार्ग मिळणार आहे असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. तसेच केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने देशभरातील पोलिस दलात उत्कृष्ट अन्वेषण करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांना पदक जाहिर झाले असल्याने व नाशिक जिल्ह्यातील विविध खेळाडूंनी विविध राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केल्यामुळे पालकमंत्री यांनी यावेळी अभिनंदन यावेळी केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.