नाशिक : उत्तराखंडची पुनर्रावृत्ती टाळण्यासाठी त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वताच्या परिसरात ‘इको सेन्सेटिव्ह झोन’, ‘नो डेव्हलपमेंट झोन’ जाहीर करावा, अशी मागणी गुरुवारी (ता. ५) माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरीच्या परिसरातील अवैध उत्खननाची पाहणी श्री. भुजबळ यांनी केली. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. (Chhagan Bhujbal statement about Declare Brahmagiri Eco Sensitive Zone nashik news)
श्री. भुजबळ म्हणाले, की पर्यावरण आणि धार्मिक महत्त्व असलेल्या ब्रम्हगिरी परिसरात नदीचे स्रोत नष्ट केले जात आहेत. ब्रम्हगिरी पर्वताला पोखरून अवैध बांधकाम केले जात आहे. त्यामुळे परिणामी सर्वच घटकांचे मोठ नुकसान होणार आहे. त्यामुळे सरकारने त्याकडे विशेष लक्ष द्यावे.
पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि साधू- महंतांनी ब्रम्हगिरी परिसरातील अवैध उत्खननाबाबत आवाज उठविला जात आहे. या प्रश्नाची दखल घेत श्री. भुजबळ यांनी नागपूर येथील अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परिसरात उत्खनन करण्यात येणार नाही, उत्खनन केलेल्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.
महंत गोपालदास महाराज, ललिता शिंदे, राष्ट्रवादी कॉँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे, तालुकाध्यक्ष बहिरू मुळाने, शहराध्यक्ष मनोज कान्हव, अरुण मेढे, गोकुळ बत्तासे, समाधान जेजुरकर आदी उपस्थित होते.
श्री. भुजबळ म्हणाले, की २० डिसेंबर २०२२ ला रोजी त्र्यंबकेश्वर येथील नदीमध्ये पर्यावरणाला बाधा निर्माण करणाऱ्या बांधकामाची साधूच्या जत्थ्याने चिडून तोडफोड केली. ब्रम्हगिरी पर्वताचे उत्खनन आणि नदी पात्रातील अवैध बांधकामांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होऊ नये म्हणून आंदोलन करणाऱ्या पर्यावरणप्रेमी नागरिकावर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने २२ डिसेंबर २०२२ ला कलम ३५३ व ४२७ नुसार गुन्हा दाखल केला.
मुळातच, गोदावरीचे उगमस्थान, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला ब्रम्हगिरी पर्वत पोखरून मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरु आहे. या उत्खननामुळे पर्वताच्या कडा कोसळून त्र्यंबकेश्वर शहराला धोका निर्माण होणार आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील ब्रम्हगिरी संरक्षणासाठी कस्तुरीरंगन समितीच्या अहवालानुसार पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील ‘इको सेन्सेटिव्ह झोन' जाहीर करत परिसरातील जैव संपदेचे जतन केले जावे.
विकास कामात पर्यावरण महत्त्वाचे
विकासाला आपला विरोध नाही, मात्र पर्यावरणास धोका निर्माण न करता विकासकामे करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. निसर्गाचे संवर्धन करावे. परिसराचा विकास करताना सरकारने स्थानिक आदिवासी बांधवांना पर्यावरणपूरक घरे बांधून द्यावी.
परिसरात काँक्रिटीकरण न करता केवळ पायवाटा विकसित कराव्यात. कायद्याच्या मार्गाने प्रश्न सोडवावेत, असे सांगून श्री. भुजबळ म्हणाले, की त्र्यंबकेश्वरमधील मनमोहक वातावरणात व सृष्टी सौंदर्याला उत्खननामुळे बाधा निर्माण झाल्याने पर्यटनावर विपरीत परिणाम होणार आहे.
नदी पात्रात सुरू बेकायदेशीर बांधकामे आणि अवैध उत्खननामुळे नदीचे मुख्य जलस्रोत नष्ट होत आहे. गरज नसताना सिमेंटचा पूल बांधण्यात येत आहे. अहिल्या नदीपात्रात काँक्रिटीकरण करून नदीचा मुख्य स्रोत नष्ट केला जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात मोठी दुर्घटना घडू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.