Chhagan Bhujbal : गंगापूर गाव परिसरात साकारत असलेल्या कलाग्रामच्या माध्यमातून महिला बचतगटांच्या उत्पादनास विक्रीसाठी हक्काचे स्टॉल्स उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले. (Chhagan Bhujbal statement Space for Savings Group Product Sale in Kalagram nashik)
नाशिक पंचायत समिती नाशिकच्या आवारात आयोजित उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत रानभाज्या महोत्सव व राखी महोत्सवास मंत्री भुजबळ यांनी सोमवारी (ता. २१) भेट देत बचतगटांच्या महिलांशी संवाद साधला.
त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, पंचायत समिती गटविकास अधिकारी सोनिया नाकाडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, कार्याध्यक्ष गोरख बोडके आदी उपस्थित होते.
मंत्री भुजबळ म्हणाले, की कलाग्रामसाठी सुमारे आठ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून, या कालाग्राममध्ये कायमस्वरूपी १०० स्टॉल्स उभारले जाणार आहेत.
येत्या दोन ते तीन महिन्यांत कलाग्रामचे काम पूर्ण केले जाणार असून, ते स्वयंसहाय्य बचतगट, महिला बचतगट, आदिवासी महिला उद्योजक यांच्यासाठी माफक दरात खुले केले जाणार आहे. तसेच येवल्याच्या पैठणी केंद्रातदेखील हक्काची जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
निसर्गाच्या सानिध्यात पिकलेल्या रानभाज्यांचे औषधी गुणधर्म आणि त्यांचा आहारातील समावेश आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. त्यामुळे नागरिकांनी या महोत्सवास भेट देऊन आरोग्यवर्धक रानभाज्या व वस्तू खरेदी कराव्यात.
त्यासोबतच रानभाज्या बनविण्याची पाककृतीसुद्धा जाणून घ्यावी, असे आवाहन भुजबळ यांनी या वेळी केले. रानभाजी महोत्सवातील विविध स्टॉल्सला मंत्री भुजबळ यांनी भेट दिली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या महोत्सवात सुरू करण्यात आलेले TATVA (तत्त्व) ब्रॅन्ड, Bonding Stories ब्रॅन्ड आणि Goda valley kart या पोर्टल यांच्या माहितीचे सादरीकरण या वेळी करण्यात आले. सीआयएफ फंडातून उन्नती बचतगट, त्र्यंबकेश्वर व सावित्रीबाई फुले बचतगट, पेठ यांना मायक्रोवेव्ह ओव्हन मंत्री भुजबळ यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
महोत्सवाचे भुजबळांकडून कौतुक
रानभाजी महोत्सवातून जनसामान्यांना रानभाज्यांची आवड निर्माण करण्याचा चांगला प्रयत्न उमेदच्या माध्यमातून होत आहे.
येथील प्रदर्शनात तृणधान्यांपासून बनविलेले विविध खाद्यपदार्थ, सेंद्रिय खतातून पिकविलेल्या भाज्या, रानभाज्या, पानवेलींपासून बनविलेल्या बहुपयोगी कलाकुसरीच्या वस्तू, वेगवेगळ्या डिझाइनच्या राख्या ठेवण्यात आल्या आहेत.
या वस्तू अस्सल व कमी खर्चात बनविलेल्या आहेत. तसेच Goda valley kart या पोर्टलच्या माध्यमातून या वस्तूंना ऑनलाइन मार्केट उपलब्ध होत आहे, ही कौतुकास्पद बाब असल्याचे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.