नाशिक : राजकारणात प्रतिस्पर्ध्यांचा आदर करणे महत्त्वाचे आहे; पण संधी मिळेल तेव्हा कुरघोडी करत विरोधकांची फिरकी घेणे मातब्बर नेत्यांचे गुण समजले जातात. असेच, दोन मातब्बर नेते पालकमंत्री दादा भुसे आणि माजी पालकमंत्री छगन भुजबळ शुक्रवारी (ता. १०) सत्कार सोहळ्याच्या व्यासपीठावर एकत्र आले अन् दोघांमध्ये अनोखी जुगलबंदी रंगली.
सत्काराप्रसंगी एकमेकांना मान देताना भाषणातून मात्र पाय खेचताना या नेत्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. (chhagan Bhujbal versus dada bhuse during felicitation ceremony at nashik news)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या वेळी झालेली राजकीय आतषबाजी उपस्थितांमध्ये लक्षवेधी ठरली. अगदी कार्यक्रम सुरू झाल्यापासून समारोपापर्यंत रस्सीखेच सुरू राहिली.
झाले असे, की निर्धारित वेळेप्रमाणे कार्यक्रम सुरू झाला असताना पालकमंत्री दादा भुसे काही मिनिटे उशिरा आले. शिष्टाचार पाळत त्यांनी श्री. पवार यांना अभिवादन करत सर्वांशी हस्तांदोलन केले. यानंतर आला सत्काराचा क्षण.
भुसे यांच्या सत्काराची घोषणा निवेदक करत असताना राजकारणातील ज्येष्ठ म्हणून आधी श्री. भुजबळांचा सत्कार करावा, असे त्यांनी इशाऱ्यातून सुचविले. पण श्री. भुजबळांनीही त्यांच्या पाठीवर हात मारत सत्कार स्वीकारण्यास सांगितले.
मग आली भाषणाची वेळ. आधी भाषण होते श्री. भुजबळ यांचे. या वेळी ते श्री. भुसेंकडे पाहून म्हणाले, तुम्ही भु (भुसे) आणि मी भु (भुजबळ), आपण दोघांनी आवाज काढला तर मविप्र संस्थेच्या डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयाचे थकीत अनुदान लगेच मिळेल.
त्यांच्या या वाक्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यानंतर आली श्री. भुसेंच्या भाषणाची वेळ.. ते म्हणाले, तसं तर बरेच देणे पाठीमागचे (महाविकास आघाडी सरकारचे) आहे. ज्याप्रमाणे मविप्र संस्थेवरील कर्ज ॲड. ठाकरे यांनी फेडायला घेतले आहे, तसेच मागच्या सरकारचे कर्ज आम्ही फेडतो आहोत.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
राहिला प्रश्न डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या थकीत अनुदानाचा, त्यासाठी आपण दोघे ‘भु.. भु..’ करू या, असे म्हणताच पुन्हा एकदा सभागृहात हास्यकल्लोळ माजला. अशाप्रकारे नाशिकचे विद्यमान पालकमंत्री दादा भुसे आणि माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यातील भाषणाची जुगलबंदी शुक्रवारी नाशिककरांनी अनुभवली.
एकाच पुस्तकाला दोघांचे हात
समारंभात गौरवग्रंथाचे प्रकाशन पार पडले. व्यासपीठावर मान्यवरांची संख्या अधिक असल्याने पुस्तकाच्या प्रति कमी पडल्या. या वेळी श्री. भुसे आणि श्री. भुजबळ यांनी एकाच पुस्तकाला हात लावताना पुस्तक प्रकाशनासाठी छायाचित्रकारांना पोज दिली.
राजकारणातील विरोधी असले तरी एकमेकांविषयी असलेला आदरभाव उपस्थित प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. तत्पूर्वी दोघांमध्ये गहन गप्पा रंगल्या असताना, नेमके कशावर चर्चा सुरू असावी, याबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.