नाशिक : ब्रेकचा कर्कश आवाज, कुठे पत्रा फाटलेला, तर कुठे सीटचे कुशनच गायब, खिडक्यांना काचा नाही तर ब्रेकच्या धक्याने एकमेकांवर आदळणे अशा प्रकारच्या या समस्यांविरहीत प्रवासाला नाशिक शहरात सुरवात झाली. नऊ मार्गांवर सुरू झालेल्या बसमध्ये वाहकांकडून ‘नमस्कार..महानगर परिवहन महामंडळाच्या बसमध्ये आपले स्वागत' या आस्थेवाईक बोलीने प्रवासी भारावले. प्रवासाचा हा सुखद अनुभव दिवसभरात तीन हजार नऊशे प्रवाशांनी घेतला. यातून पहिल्याच दिवशी सांयकाळी सातपर्यंत परिवहन समितीला ८५ हजार ६५० रुपयांचा महसूल मिळाला.
महापालिकेच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंक बससेवेला आजपासून नियमित सुरवात झाली. तपोवन व नाशिक रोड डेपोतून पहिल्या टप्प्यात नऊ मार्गावर ५० बस सोडण्यात आल्या. तपोवन ते बारदान फाटा, तपोवन ते सिम्बायोसिस कॉलेज, तपोवन ते पाथर्डी गाव, सिम्बायोसिस कॉलेज ते बोरगड, तपोवन ते भगूर, नाशिक रोड ते बारदान फाटा, नाशिक रोड ते अंबड गाव, नाशिक रोड ते निमाणी, नाशिक रोड ते तपोवन या मार्गांवर सकाळी ४. ३५ वाजेपासून बससेवा सुरू करण्यात आली. नाशिक रोड डेपातून १४०, तर तपोवन डेपोतून १९० फेऱ्या झाल्या. बस मार्गावर सुरू असल्याचा पहिला संदेश कमांड कंट्रोल सेंटरला मिळाला. त्यानंतर सिटीलिंक कंपनीचे कामकाज नियमित सुरू झाले. दुपारी तीनपर्यंत २८३६ प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून ६२ हजार ५४० रुपये उत्पन्न मिळाले. रात्री साडे अकरापर्यंत बससेवा सुरू राहीली.
सिन्नर, त्र्यंबकपर्यंत सेवा
महापालिका हद्दीपासून वीस किलोमीटरपर्यंत शहर बससेवा पोहोचविता येणार असल्याने त्या अनुषंगाने त्र्यंबक, सिन्नर येथील वावी वेस, पिंपळगाव बसवंत, ओझर, दिंडोरीपर्यंत बससेवा पोहोचविली जाणार आहे. एकूण २४१ बस चालविल्या जाणार असून, पूर्ण क्षमतेने सेवा सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागापर्यंत सेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती महाव्यवस्थापक (वाहतूक) मिलिंद बंड यांनी दिली.
खासगी सेवा नाही
औद्योगिक वसाहतीमध्ये बससेवा दिली जाणार असली तरी कंपन्यांना खासगी सेवा पुरविली जाणार नाही. त्याला कारण म्हणजे एका बाजूने बसविना प्रवासी जाणार असल्याने तूर्त तोटा सहन करण्याची क्षमता नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कंपन्यांनी मासिक पासची हमी दिली तरच खासगी सेवा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला.
पहिल्याच दिवशी सेवा सुरळीत पार पडली. नऊ मार्गांवर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पूर्ण क्षमेतेने सेवा सुरू झाल्यानंतर प्रवासी वाढतील.
- मिलिंद बंड, महाव्यवस्थापक, सिटीलिंक.
अनेक दिवसांपासून खासगी वाहनाने प्रवास करावा लागत होता. बससेवा सुरू झाल्याने चांगल्या सेवेचा आनंद मिळण्याबरोबरच सुरक्षित वाहतुकीचा अनुभव घेत आहोत.
- बापूराव उगले, प्रवासी.
रिक्षांचा प्रवास आर्थिकदृष्ट्या परवडत नव्हता, परंतु नाइलाज होता. शहर बससेवा सुरू झाल्याने वाहतुकीची अडचण दूर झाली आहे.
- बाळासाहेब शिरसाट, प्रवासी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.