नाशिक : एरवी विनाहेल्मेट, विना सिटबेल्ट, ओव्हर स्पीड असल्यास वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या नावाखाली दररोज लाखोंचा दंड वाहनचालकांकडून शहर वाहतूक पोलिस दंड वसुल करतात. मात्र, त्र्यंबकरोडवर एक पोलिस ठाणे व पोलिस चौक्या असताना रात्रीच्या वेळी धूमस्टाईल भरधाव वेगात अन् बूम... बूम... कर्णकर्कश आवाजात सुसाट बाईक राईडस् होत असल्याचे आश्चर्य व्यक्त होते आहे.
विशेषत: सातपूर पोलिस ठाणे याच रोडवर असताना, धूमस्टाईल अन् बूम-बूम करीत धावणाऱ्या या स्पोर्ट्स बाईकमुळे अन्य वाहनचालकांना त्रास होतो. मात्र कर्णकर्कश आवाज सातपूर ठाण्यातील पोलिसांना ऐकू जात नसावा का, की पोलिस ठाणे साउंडफ्रुप आहे असा सवालही त्रस्त वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. (Citizens including motorists suffer from noise Possibility of serious accident at trambakroad nashik news)
धूम स्टाईलने भरधाव वेगात धावणाऱ्या आणि कर्णकर्कश आवाज करणाऱ्या स्पोर्टस् बाईक बाजारात दाखल झाल्या आहेत. या स्पोर्टस् बाईक अत्यंत महागड्या असल्याने त्या काही मोजक्याच तरुणांकडे आहेत. शहरातील असेच काही स्पोर्टस् बाईक चालविणाऱ्या तरुणांनी शनिवारी (ता. १२) रात्री साडेनऊच्या सुमारास मायको सर्कलकडून त्र्यंबकरोडने सातपूर गावाच्या दिशेने धूम स्टाईल बाईक राईड केली.
एका पाठोपाठ एक असा तीन-चार बाईक भरधाव वेगात बूम-बूम आवाज करीत धावत सुटल्या. या बाईकच्या आवाजाने याच त्र्यंबकरोडने वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अत्यंत भरधाव वेगात हे बाईकस्वार दुचाक्या तिरक्या करीत सुसाट वेगात सुटल्याने आजूबाजूच्या वाहनचालकांमध्ये अक्षरश: धडकीच भरली होती. काही वाहनचालकांजवळून हे बाईकस्वार गेल्याने ते दचकलेच.
दरम्यान, याच त्र्यंबकरोडवर शरणपूर पोलिस चौकी तर काही अंतरावर सातपूर पोलिस ठाणे आणि सातपूर गावात पोलिस चौकी आहे. असे असतानाही बाईकस्वारांनी धाडस करीत धूमस्टाईल बाईक राईड केल्याचे आश्चर्य वाहनचालकांनीच व्यक्त केले आहे. विशेषत: सातपूर पोलिस ठाण्यासमोरील चौक हा अपघाती ब्लॅक स्पॉट आहे.
तसेच, पोलिस ठाण्यात सातत्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती असते. असे असतानाही सातपूर पोलिसांकडून धोकादायकरीत्या वाहन चालविणे व दुसऱ्याच्या जीविताला धोका उत्पन्न करणाऱ्या मुजोर बाईकस्वारांविरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली जात आहे.
पोलिस ठाणे साऊंडफ्रुप आहे का?
त्र्यंबकरोडलगतच सातपूर पोलिस ठाणे आहे. याठिकाणी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची रात्रंदिवस उपस्थिती असते. याशिवाय सतत तक्रारदारांचीही वर्दळ असते. असे असताना, त्याच रोडवरून बूम-बूम करीत सुसाट वेगात धावणाऱ्या स्पोर्टस् बाईकचा आवाज पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना गेला नसावा का, असा प्रश्न जागरुक नागरिकांना पडला आहे.
तर काहींनी पोलिस ठाणेच साऊंडफ्रुप असावे, त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना रस्त्यावर गाड्यांचा गोंगाट ऐकायला जात नसावा याचीही शक्यता व्यक्त केली आहे. परंतु, यातून भीषण अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा मुजोर बाईक राईडर्सवर कारवाईची मागणी त्रस्त नागरिक वाहनधारकांकडून होते आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.