कसबे सुकेणे (जि.नाशिक) : दीड ते दोन महिन्यांपूर्वी ज्या नागरिकांनी कोविड लशीचा (covid vaccination) पहिला डोस (first dose) घेतला आहे, त्यांच्या दुसऱ्या डोसची (second dose) तारीख उलटून गेल्यानंतरही त्यांना दुसऱ्या डोसपासून वंचित राहावे लागत आहे.
रात्री अडीचपासूनच डॉक्टरांच्या घराबाहेर गोंधळ
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्यामुळे मृतांची संख्या लक्षात घेता कोविड प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी नागरिक विविध मार्गाचा अवलंब करीत आहेत. यात शासनाकडून पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस दिला गेला नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, उपलब्ध होणाऱ्या लशीचे वितरण व्यवस्थित व्हावे, यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना कूपन देण्याचा मार्ग अवलंबविला. मात्र, हा पर्याय त्यांच्याच अंगलट आल्याचा प्रकार गुरुवारी (ता. १३) घडला. गुरुवारी सकाळी हे कूपन घेण्यासाठी नागरिकांनी पहाटे अडीचपासूनच डॉक्टरांच्या घराबाहेर गोंधळ घातला.
दुसऱ्या डोसपासून वंचित
दोन आठवड्यांपासून कसबे सुकेणे येथे कोविड लस उपलब्ध होत नसल्याने ४५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक लशीपासून वंचित आहेत. तसेच दीड ते दोन महिन्यांपूर्वी ज्या नागरिकांनी कोविड लशीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांच्या दुसऱ्या डोसची तारीख उलटून गेल्यानंतरही त्यांना दुसऱ्या डोसपासून वंचित राहावे लागत आहे. गेल्या आठवड्यात केवळ २५० दुसऱ्या डोसच्या लस उपलब्ध झाल्या. पहाटे पाचलाच रांगा लागल्यानंतर तीनशे जणांना कूपनअभावी परत जावे लागले. दरम्यान, आज २३० लस उपलब्ध झाल्या. याची माहिती नागरिकांना कळाल्यानंतर ते पहाटे अडीचपासूनच कोविड लस केंद्रावर उपस्थित राहिले. पर्यायाने लोकांची गर्दी विचारात घेता काही लोकांनी कसबे सुकेणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील यांना थेट आरोग्य केंद्रातून उठवून लस केंद्रावर कूपन वाटण्यास भाग पाडले.
दुसऱ्या डोसच्या २३० लशीचे कूपन संपले
पहाटे तीनलाच दुसऱ्या डोसच्या २३० लशीचे कूपन संपले. पर्यायाने पहाटे चार व पाचला आलेल्या नागरिकांना कूपनअभावी परत जावे लागले. त्यामध्ये काही दूरवरून आलेल्या महिलादेखील होत्या. ही बाब सकाळी लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते दत्ता पाटील व काही युवक एकत्र येत झालेल्या प्रकाराबाबत डॉक्टरांना विचारणा केली, तेव्हा डॉक्टरांनी संभाव्य गर्दीचा विचार करता आपण पहाटे तीनलाच लोकांच्या सांगण्यावरून कूपन वाटल्याचे सांगितले.
पहाटे तीनलाच डॉक्टरांना उठून लस केंद्रावर नेणे चुकीचे आहे. सकाळी सातला लशीचे कूपण वाटावे, ही अपेक्षा.
- दत्ता पाटील, सामाजिक कार्यकर्ते, कसबे सुकेणे
येथून पुढे लस केंद्रावर कितीही गर्दी झाली, तरी सकाळी सातलाच कूपन वाटले जातील. प्रत्येक व्यक्तीस फक्त दोन कूपन आधारकार्ड बघूनच दिले जातील.
- डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.