नाशिक : महापालिकेकडून सुरू होणाऱ्या शहर बससेवेला डबल बेल देण्याची तयारी पूर्ण झाली आहे. बुधवारी (ता. ३०) रस्त्यावर नऊ बस ‘ट्रायल रन’साठी उतरविल्या जाणार आहेत. ट्रायल रनच्या माध्यमातून संगणकीय प्रणालीसह जीपीएस यंत्रणेची चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (City-bus-service-trial-run-start-in-nashik-marathi-news)
शहरात डिझेल व सीएनजी बस धावणार
२०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बससेवा महापालिकेने चालविणे बंधनकारक असल्याच्या सूचना दिल्यानंतर सत्ताधारी भाजपने शहर बससेवेसाठी हालचाली गतिमान केल्या. सप्टेंबर २०१८ मध्ये ग्रॉस कॉस्ट कटिंग तत्त्वावर बससेवा सुरू करण्याचा ठराव महासभेत केला. त्यानंतर मे. ट्रॅव्हल टाइम कार रेन्टल प्रा. लि. पुणे व मे. सिटी लाइफलाइन ट्रॅव्हल्स प्रा. लि. दिल्ली या ऑपरेटर्सची नेमणूक केली. बस ऑपरेटर सोबतच बसची खरेदी, व्यवस्थापन, संचालन व देखभालीसाठी दहा वर्षांचा करारनामा झाला. तीस मिडी डिशेल व १२० सीएनजी, वीस डिझेल व ८० सीएनजी बसचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. बस डेपोसह शेल्टर उभारणीचे काम सुरू असताना दुसरीकडे शासनाकडे ना हरकत दाखल्यासाठी प्रस्ताव सादर केला. फेब्रुवारी २०२१ शासनाने परवानगी दिली. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीसमोर १४६ विविध मार्गांवर टप्पा वाहतुकीला परवानगी मिळण्याबरोबरच टप्पा दर मंजुरीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानुसार आता बससेवा सुरू करण्याचा भाग म्हणून बुधवारी (ता. ३०) ट्रायल रन घेतला जाणार आहे.
तपोवन, नाशिक रोड येथून सुरवात...
सकाळी सव्वाआठपासून तपोवन व नाशिक रोड बस डेपो येथून ट्रायल रनला सुरवात होईल. तपोवन डेपोतून पाच, तर नाशिक रोड डेपोतून चार बस, अशा नऊ बस रस्त्यावर उतरविल्या जाणार आहेत. सीएनजी व डिझेल स्वरुपातील या बस राहतील. प्रवाशांना बसमध्ये प्रवास करू दिला जाणार आहे. त्यांच्याकडून तिकिटेदेखील फाडली जाणार आहे, मात्र भाडे आकारले जाणार नाही. तिकीट मशिन, संगणकीय प्रणाली, थांबे, जीपीएस नियंत्रण आदी बाबी तपासल्या जाणार आहेत.
या मार्गावर ट्रायल रन
तपोवन डेपो :
- मार्ग क्रमांक १०१- तपोवन तर बारदान फाटामार्गे सीबीएस, सिव्हिल हॉस्पिटल, सातपूर, अशोकनगर.
- मार्ग क्रमांक १०३- तपोवन ते सिम्बॉयसिस कॉलेज मार्गे, सीबीएस, सिव्हिल, पवननगर, उत्तमनगर.
- मार्ग क्रमांक १०४- तपोवन ते पाथर्डी गावमार्गे द्वारका, नागजी, इंदिरानगर, वनवैभव.
- मार्ग क्रमांक १५२- सिम्बॉयसिस कॉलेज ते बोरगड मार्गे शिवाजी चौक, लेखानगर, महामार्ग, म्हसरुळ.
- मार्ग क्रमांक १५६- तपोवन ते भगूरमार्गे द्वारका, बिटको, देवळाली कॅम्प.
नाशिकरोड डेपो :
- मार्ग क्रमांक २०२- नाशिक रोड ते बारदान फाटामार्गे द्वारका, कॉलेज रोड, सातपूर, व्हीआयपी, कार्बन नाका.
- मार्ग क्रमांक २०७- नाशिक रोड ते अंबड गावमार्गे द्वारका, महामार्ग, लेखानगर, गरवारे.
- मार्ग क्रमांक २५७- नाशिक रोड ते निमाणीमार्गे, जेल टाकी, सैलानी बाबा, नांदूरगाव, नांदूर नाका, तपोवन.
- मार्ग क्रमांक २७३- नाशिक रोड ते तपोवनमार्गे बिटको, द्वारका, शालिमार, सीबीएस, पंचवटी.
(City-bus-service-trial-run-start-in-nashik-marathi-news)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.