Nashik News : क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचालक मंडळाच्या शेवटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आगामी निवडणुकीचे पडघम दिसले. सभेत संस्थेत झालेल्या कर्मचारी भरती प्रकरणी संचालक मंडळावर आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा आरोपावरून धक्काबुक्की होऊन थेट हाणामारी झाली.
सभासद मनोज बुरकुले यांनी केलेल्या आरोपावर त्यांच्यावर धावून जात सभासदांनी त्यांना मारहाण केली. या प्रकरानंतर पुन्हा सुरू झालेल्या सभेत संस्थेच्या आयटीआयमधील एक कोटी ९२ लाखांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणी पुन्हा गदारोळ झाला. साडेचार तासांच्या झालेल्या बैठकीत मृत सभासदांच्या वारसा सभासदांच्या मुद्द्यावर वादळी चर्चा झाली.
नाईक शिक्षण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. ३०) संस्थेच्या कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात झाली. ()
प्रारंभी दिवंगतांना श्रद्धांजली वाहून सभेच्या कामकाजास सुरवात झाली. सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी संस्थेच्या प्रगतीचा अहवाल मांडला. जे. डी. केदार यांनी नवीन सभासद व वार्षिक अहवालातच इतिवृत्त देण्याची मागणी केली.
त्यानंतर संस्थेचे मृत सभासद वारसांना सभासद करून घेण्याबाबत व नवीन सभासद करण्याबाबत चर्चा झाली. वारसास नवीन सभासद करून घ्यावे, अशी मागणी मनोज बुरकुले, सुनील केदार, नारायण काकड, प्रभाकर धात्रक, सुनील केदार, अशोक कातकाडे, अशोक सानप, मंजूषा दराडे, उदय घुगे, उल्हास कुटे, स्वाती बोडके, अॅड. अशोक आव्हाड आदींनी केली. मृत वारस सभासद वारसांना सभासद करून घेण्याबाबत मागील सभेत ठराव झाला होता. त्याची अंमलबजावणी न झाल्याने संतप्त सभासदांनी संचालक मंडळाला धारेवर धरले.
निवडणुकीत सभासद करण्याबाबतची खोटी आश्वासने देऊन आपण निवडून आला आहात. तेव्हा आपल्याला याची माहिती नव्हती का, अशी विचारणा सभासदांनी केली. यावर अध्यक्ष थोरे म्हणाले, की जे आजीव सभासद आहेत, त्यांच्या वारसांना सभासद करता येणार नाही. तशी घटनेत तरतूद नाही. यासाठी वकिलांची एक समितीही नेमली होती. त्यांनीही असे सभासद करता येणार नाही, असे सांगितले.
यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल, असे सांगत मृत सभासदांचा मृत दाखले आतापर्यंत केवळ ७७६ इतकेच आले असून, दोन हजार सभासद मृत झाल्याचेही थोरे यांनी निदर्शनास आणून दिले. सरचिटणीस धात्रक यांनीही, आजीव सभासद हे घटनेप्रमाणे झालेले असून, त्यांना आपण काढू शकत नाही. सभासद करण्याबाबत विशेष सभा बोलवावी लागेल, त्यावर हा एकच विषय ठेवावा लागेल, असे सांगितले.
धक्काबुक्की, हाणामारी
नियमित विषयांवर झालेल्या चर्चेत मनोज बुरकुले यांनी संस्थेत कथित नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप एका संचालकावर केला. हा आरोप होताच बुरकुले यांना काही पदाधिकाऱ्यांकडून जाब विचारत धक्काबुक्की करत, काही जण त्यांच्यावर धावून गेले. बुरकुले पळत असताना काहींनी त्यांना मारहाण केली, तर काहींनी त्यांच्यावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी मोठा गोंधळ झाला.
१५ ते २० मिनिटांच्या या प्रकारानंतर अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटविला. त्यानंतर सभेच्या नियमित कामकाजास पुन्हा सुरवात झाली. यात बुरकुले यांनी नातेवाइकांची कामे संचालक मंडळाकडून केली जातात. मात्र, ज्या बांधवांचे संचालक मंडळात कोणी नाही, त्यांची मात्र कामे केली जात नसल्याचा आरोप केला. विद्यमान संचालक मंडळातील एका संचालकाने कथित नोकर भरतीत साडेतेरा लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला.
हा प्रकार दोन वर्षांपूर्वीच्या दरम्यान घडलेला असून, याबाबत आपण या संचालकाची आर्थिक देवाणघेवाण केल्याबाबतची ऑडिओ क्लिप टाकताच संबंधित संचालकाने घेतलेले हे पैसे संबंधित व्यक्तीस चेक व रोख स्वरूपात परत केल्याचेही निदर्शनास आणून दिले. काही लोक चुकीचे कामकाज करत असल्याने हा विषय सभेत मांडल्याचे बुरकुले यांनी सांगितले.
संचालक मंडळात गैरवर्तणूक करणाऱ्या संबंधित संचालकाचे पद रद्द करावे, अशी मागणी या वेळी सभासदांनी केली. त्यानंतर सभेत पुन्हा बुरकुले यांनी आयटीआयमध्येही भ्रष्टाचार झाल्याचे सांगत त्यांना पाठीशी घालण्याचे काम केले जात असल्याचे सांगितले. त्यावर, पुन्हा काही सभासद दुसऱ्यांदा बुरकुले यांच्यावर धावून गेले व गदारोळ झाला. यातच राष्ट्रगीत होऊन सभा आटोपती घेण्यात आली.
सभेला उपाध्यक्ष अॅड. पी. आर. गिते, चिटणीस तानाजी जायभावे, विश्वस्त दिगंबर गिते, दामोदर मानकर, सुभाष कराड, बाळासाहेब वाघ, संचालक विलास आव्हाड, विष्णुपंत नागरे, सुरेश घुगे, विठोबा फडे, सुधाकर कराड, अशोक नागरे, अशोक भाबड, रामनाथ बोडके, उत्तम बोडके, दौलतराव बोडके, श्याम बोडके, भगवंत चकोर, तुळशीराम विंचू, विजय सानप, जयवंत सानप, विजय बुरकुले, शोभा बोडके, शिक्षणाधिकारी मोहन चकोर, राजेंद्र सांगळे यांसह सभासद, माजी आमदार अशोक धात्रक, बाळासाहेब सानप, कोंडाजीमामा आव्हाड, प्रकाश घुगे, बाळासाहेब गामणे, महेंद्र आव्हाड, संजय नागरे, उदय घुगे, प्रशांत आव्हाड, नंदू वराडे, बापू घुगे, शशिकांत आव्हाड, सागर विंचू, सागर सांगळे, सागर सोनवणे, गणपत हाडपे आदी उपस्थित होते.
होर्डिंगचा मुद्दा गाजला
संस्थेच्या नाशिक शहरातील मोकळ्या जागेवरील होर्डिंगबाबतचा विषय प्रा. वसंत वाघ व अशोक धात्रक यांनी उपस्थित करत संबंधित ठेकेदाराकडे मोठ्या प्रमाणात वसुली बाकी असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर अध्यक्ष थोरे यांनी सांगितले, की ठेकेदार दराडे व बोडके यांच्याशी याबाबत बोलणे सुरू असून, त्यांच्याकडून ९७ लाख रुपये येणे बाकी आहे. या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
सभेत झालेल्या घोषणा
- नाईक संस्थेच्या शैक्षणिक संकुलला लोकनेते ‘तु. स. दिघोळे शिक्षण संकुल’ नाव दिले जाणार
- सिन्नर येथील महाविद्यालयास (स्व.) तुकाराम दिघोळे, एन. एम. आव्हाड व सुदामदाजी सांगळे यांचे नाव देण्याची घोषणा
- संस्थेत समाज दिन साजरा करण्याचा निर्णय
- दोन महिन्यांत ओळखपत्र दिले जाणार
- पडताळणी करून योग्य निर्णय घेणार
"सभेचे कामकाज सुरळीतपणे सुरू होते. मनोज बुरकुले यांनी नोकर भरतीबाबत थेट पदाधिकाऱ्यांवर आरोप करत त्यांना जबाबदार धरले. त्यामुळे हा प्रकार घडला. त्यांनी संबंधित संचालकावर जो आरोप केला आहे, तो नक्की कोणाचा आवाज आहे, हे पाहून व त्याची पडताळणी केली जाईल. त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल. आयटीआयबाबत जो आरोप झाला त्यामध्ये एक कोटी ९१ लाखांपैकी आमचे संचालक मंडळ निवडून आल्यानंतर एक कोटी दहा लाख वसुली करण्यात आली आहे." - पंढरीनाथ थोरे, अध्यक्ष, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.