सिडको (जि. नाशिक) : बुधवारी (ता. १२) नाशिक पश्चिम विभागाच्या मतदार नोंदणी बैठकीत कर्तव्यात कसूर केल्याची शिक्षकांना नोटीस देत शिक्षकावर थेट कामचुकारपणाचा आरोप करून याबाबत तुमची वेतन वाढ रोखली जाईल. पगार रोखले जातील, कडक कारवाई केली जाईल यासह आरे, कारेची भाषा वापरल्याने संतप्त शिक्षकांनी देण्यात आलेल्या नोटिसा न स्वीकारता बैठकीतून निघून गेल्याचे शिक्षकांनी सांगितले. (Clashes between BLO teachers and officers Disputes after giving notice at cidco Nashik Latest Marathi News)
अतिरिक्त सहाय्यक नोंदणी अधिकारी राजेश शिंदे यांनी मतदार नोंदणी अधिकारी असलेल्या सुमारे १०० शिक्षकांची सिडको कार्यालयात बैठक घेतली. शासनाच्या नियमानुसार मतदार ओळखपत्रास आधार कार्ड नोंदणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. याची जबाबदारी शिक्षकांना देण्यात आली असून, त्यांची मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
बैठक सुरू होताच उपस्थित सर्वांच्या हातात राष्ट्रीय कर्तव्यात आपण कसूर करत आहात. त्यामुळे आपल्यावर कडक कारवाई केली जाईल, अशा आशयाच्या नोटिसा देण्यात आल्या आणि उपरोक्त भाषेत अधिकाऱ्यांनी सुनावण्यास सुरवात केली, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. इतर विभागातील तसेच ग्रामीण भागातील नोंद मोठ्या प्रमाणात होत असताना म्हणजे जवळपास ६० ते ८० टक्के काम झाले असताना या विभागात फक्त १७ टक्केच झाल्याने शिक्षकावर कामचुकारपणाचा ठपका ठेवण्यास सुरवात झाल्याने शिक्षक संतप्त झाले.
मोठ्या प्रमाणात वाद झाल्याने अखेर बैठक आटोपती घेण्यात आली. तर शिक्षकांनीदेखील आता आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. मतदान कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे हे केंद्र सरकारतर्फे ऐच्छिक ठेवले आहे. त्यामुळे नागरिक रस दाखवत नाहीत. आधार कार्ड बँक खात्याला तसे इतर महत्त्वाच्या खात्यांनादेखील लिंक केले असल्याने बहुतांश नागरिक थेट नाही म्हणून सांगत आहेत.
प्रत्येक शिक्षकांकडे साधारण हजार मतदार दिले आहेत. मात्र, यातील बहुतेक मतदार हे जागेवर मिळून येत नसल्याची तक्रार शिक्षक करत आहेत. हे सिद्ध करून देण्यासाठी अनेकांनी अधिकाऱ्यांनी आमच्यासोबत यावे आणि मतदार शोधून दाखवावेत, असे आव्हान दिले आहे.
वरिष्ठांच्या आदेशानुसारच नोटिसा
शिक्षकांना थेट कामचुकारपणाचा आरोप करत दिलेल्या नोटीस अन्यायकारक असल्याच्या भावना असल्याने आणि अधिकाऱ्यांनी वापरलेल्या चुकीच्या शब्दांमुळे शिक्षक संतप्त झाले आणि बैठक सोडून गेले, असे अनेकांनी सांगितले. तर इतर मतदारसंघांच्या तुलनेत या मतदारसंघातील हे काम इतक्या कमी प्रमाणात का झाले याची विचारणा वरिष्ठ पातळीवरून झाली असून, वरिष्ठांच्या आदेशानुसारच संबंधितांना या नोटीस बजावण्यात आल्याचे श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.