Nashik News : शेतकरी, कामगार, कष्टकरी व महिलांसाठी सर्वस्व अर्पण केलेल्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे सोन्यालाही फिके पाडणारे काम आहे. त्यांच्या आदर्शावर वाटचाल करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. राज्य सरकारदेखील त्याच समतेच्या आदर्शांवर चालत असून, समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (ता. २८) येथे केले. (Countrys largest statue of Phule couple unveiled in Nashik)
महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या देशातील सर्वांत मोठ्या अर्धाकृती ब्रांझ धातूपासून बनविलेल्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज मुंबई नाका येथे पार पडला, त्या वेळी झालेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
पालकमंत्री दादा भुसे, खासदार राजाभाऊ वाजे, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार प्रा. देवयानी फरांदे, ॲड. राहुल ढिकले, सीमा हिरे, नितीन पवार, किशोर दराडे, सरोज अहिरे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ आदी उपस्थित होते. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी प्रास्ताविक केले.
प्रारंभी मुंबई नाका येथे पुतळ्याचा लोकार्पण सोहळा झाला. त्यानंतर झालेल्या सभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, समतेचा संदेश देणाऱ्या फुले दांपत्याचा देशातील सर्वांत मोठा अर्धपुतळा नाशिकमध्ये उभा राहातो. हेवा वाटणारे हे शिल्प प्रत्येकाला प्रेरणादायी ठरेल. स्मारकाच्या माध्यमातून समाजाला नक्कीच दिशा मिळेल.
फुले दांपत्याच्या आदर्शावर वाटचाल करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. फुले दांपत्याने दाखविलेल्या मार्गावरच राज्यात सरकारची वाटचाल सुरू आहे. समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे फुले दांपत्याचे स्वप्न होते. ते काम राज्य सरकार पार पाडत आहे.
पुरंदर तालुक्यातील ज्योती-सावित्री आंतरराष्ट्रीय निवासी शाळा सुरू करण्यासाठी शंभर कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मूर्तिकार बाळकृष्ण पांचाळ यांच्यासह मोहरीवर छत्रपती शिवरायांची प्रतिकृती साकारणाऱ्या ऐश्वर्या औसरकर, ॲथलेटिक स्पर्धेत कामगिरी करणाऱ्या आर्यन शुक्ल यांचा सत्कार करण्यात आला. (latest marathi news)
काम भुजबळ ब्रँडप्रमाणे
मुंबई नाक्यावरील फुले दांपत्याचे पुतळे बघितल्यानंतर भुजबळ ब्रँडप्रमाणे काम झाल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत, आम्हाला समतेच्या मार्गावर चालायचे आहे, तो मार्ग फुलेंनी दाखविला. ‘एक महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्रा’चे तत्त्व सरकार अमलात आणत असून, महापुरुषांच्या यादीमध्ये फुले दांपत्याचे नाव अग्रभागी असल्याचे फडणवीस म्हणाले.
फुले दांपत्याला भारतरत्न
मुंबई नाका येथे उभारण्यात आलेला फुले दांपत्याचा अर्धाकृती पुतळा देशात सर्वांत मोठा असल्याचे गौरवोद्गार काढताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या लौकिकात भर पडेल, असा विश्वास व्यक्त केला.
महापुरुषांनी महाराष्ट्राला दिलेला वारसा पुढे नेताना सामाजिक बांधणीचे काम सरकारमार्फत सुरू आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दांपत्याला भारतरत्न मिळावा, यासाठी शासनामार्फत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
...या कामांचे झाले लोकार्पण
- मराठा व धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह भूमिपूजन
- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान
- माऊली लॉन्स ते आयटीआय सिग्नल रस्ता काँक्रिटीकरण
- मुंबई नाका येथे शंभर खाटांच्या महिला रुग्णालयाचा दुसरा टप्पा
- इंदिरानगर येथील बोगदा रुंदीकरण
- हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान नूतनीकरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.