Nashik News : उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या १३६ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त रविवार (ता. ७) भल्यापहाटे येथील आरम नदीच्या तीरावरील देवमामलेदारांच्या मंदिरात ब्राह्मणवृंदांच्या पवित्र मंत्रोच्चारात व हजारो भाविकांच्या प्रमुख उपस्थितीत महाअभिषेक व महाआरती झाली.
पहाटेच्या महाआरतीवेळी अभूतपूर्व उत्साहात हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी होते. (Commencement of Shri Yashwantrao Maharaj death anniversary celebration nashik news)
यंदा पहिल्यांदाच महापूजेस पहाटे आबालवृद्ध भाविकांची ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी होती. तर दिवसभर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रविवारी पहाटे चारला बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे, प्रतिभा चावडे, उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे, अर्चना काकडे, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र बागड, अरुणा बागड यांच्या हस्ते देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक व महाआरती करण्यात आली.
दरम्यान, महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गेल्या १२२ वर्षांपासून शहरातील आरम नदीपात्राजवळ अविरतपणे सुरू असलेल्या यात्रोत्सवासही रविवारपासून उत्साहात सुरवात झाली आहे. रविवारी पहाटे तीनपासूनच आरमतीरावरील देवमामलेदारांच्या मंदिरात भारुड, भजने आदी मंगलमय कार्यक्रमांची रेलचेल होती. पहाटेच्या निरव शांततेत ध्वनिक्षेपकावरून वाजविण्यात येणाऱ्या शहनाई, सनई चौघडा व शंखनादामुळे शहरातील वातावरण भल्या पहाटे भक्तिमय झाले होते.
मंदिरासमोर परिसरात काढलेल्या भव्य रांगोळ्या भाविकांचे लक्ष वेधून घेत होत्या. पहाटे बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे, प्रतिभा चावडे, उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे, अर्चना काकडे, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र बागड, अरुणा बागड यांच्या हस्ते अभिषेक व महापूजेस सुरवात झाली. महापूजेसाठी आबालवृद्धांची मोठी गर्दी उसळली होती.
महापूजेचे पौरोहित्य वेदमूर्ती सुदर्शन मुळे, मकरंद पाठक, अभय चंद्रात्रे, ऋषिकेश चंद्रात्रे, गजानन जोशी, संजय चंद्रात्रे, पीयूष गोसावी, चेतन कुलकर्णी, पंकज इनामदार, अमोल मुळे, विनायक कुलकर्णी, रोहित देशपांडे, प्रसाद चंद्रात्रे, गौरांग जोशी यांनी केले. पप्पू गुरव व शरद गुरव यांनी सनई चौघड्याचे वादन केले. महाआरतीनंतर मंदिराबाहेर हजारो भाविकांच्या उपस्थितीत बॅंड पथकाने देवमामलेदारांसह विविध भावगीते सादर केली.
या वेळी देवस्थानचे उपाध्यक्ष रमेश सोनवणे, विश्वस्त रमेश देवरे, हेमंत सोनवणे, अॅड. विजयबापू पाटील, राजेंद्र भांगडिया, प्रल्हाद पाटील, कौतिक सोनवणे, सुनील खैरनार, श्रीकांत येवला, स्वप्नील बागड, डॉ. विद्या सोनवणे, योगिता मोरे, महेश देवरे, यशवंत सोनवणे, शिवा सैंदाणे, नीलेश अमृतकर, योगेश अमृतकर, मंडल अधिकारी संजय साळी, मच्छिंद्र मोरे, तलाठी जयप्रकाश सोनवणे, रोशन गौतम, सागर रोकडे, रमेश सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, देवीदास भावसार, पार्थ कापडणीस, मंदार येवला आदींसह भाविक बहुसंख्येने उपस्थित होते.
महाआरतीनंतर महाराजांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरवर्षीप्रमाणे महात्मा गांधी चौकातील श्री यशवंतराव महाराज मित्रमंडळातर्फे पहाटे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद म्हणून साबूदाणा खिचडी वाटप करण्यात आली.
देवमामलेदारांच्या ऐतिहासिक खुर्चीची विधिवत पूजा
येथील बागलाण तहसील कार्यालयात देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांनी ज्या खुर्चीवर बसून जनतेची सेवा केली, त्या ऐतिहासिक खुर्चीची रविवारी पहाटे बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे व प्रतिभा चावडे यांच्या हस्ते ब्राह्मणवृंदांच्या पवित्र मंत्रोच्चारात विधिवत पूजा करण्यात आली. महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पूजेचे पौरोहित्य मकरंद पाठक यांनी केले. या वेळी पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे, सुरेखा रणदिवे, किशोर कदम, भारती कदम, मंडल अधिकारी संजय साळी, मच्छिंद्र मोरे, तलाठी जयप्रकाश सोनवणे, रोशन गौतम, सागर रोकडे, रमेश सोनवणे आदींसह महसूल विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.