नाशिक : गोदावरी महाआरतीवरुन गंगा गोदावरी पुरोहित संघ व रामतीर्थ गोदावरी सेवा समितीमध्ये सुरु झालेले द्वंद्व संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. राज्य सरकारने मंजूर केलेल्या ११ कोटी ६६ लाखांच्या निधीतून दोन्ही समित्यांना एक रुपयाही मिळणार नाही.
याउलट समित्यांना स्व:निधी उभारावा लागणार असून, त्यातूनच आरतीचा खर्च भागवावा लागेल. त्यामुळे एवढा सगळा अट्टहास कशासाठी केला जात आहे, असा प्रश्न रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने उपस्थित केला आहे. (Committees to raise self funds Question raised by Ramtirth Godavari Seva Samiti office bearers over maha aarti Nashik)
पुरोहित संघाने सोमवारी (ता.१२) महाआरती संदर्भात ग्रामसभा घेऊन निर्वाणीचा इशारा दिला. त्यानंतर गोदावरी सेवा समितीही बुधवारी (ता.१४) दुपारी ३ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. यात ही समिती आपली भूमिका अधिकृतपणे जाहीर करणार आहे.
पण, जेव्हापासून गोदाआरतीसाठी निधी मंजूर झाला तेव्हापासूनच नवीन वाद निर्माण झाल्याचे दिसते. आर्थिक कारणांभोवती ही महाआरती फिरत आहे. पण पुरोहित संघ असेल किंवा गोदावरी सेवा समिती या दोघांनाही या निधीतून एक रुपया मिळणार नसल्याचे सेवा समितीने जाहीर केले आहे.
याउलट गोदावरी सेवा समितीही लोकवर्गणीतून आरती करण्याचा विचार करत आहे. त्यासाठी स्वतंत्र बँक खाते, विश्वस्त मंडळ स्थापन करून या खात्याच्या लेखापरीक्षणासाठी सनदी लेखापालाची नियुक्ती केली आहे.
त्यामुळे गोदाआरतीच्या माध्यमातून अर्थार्जन करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे गोदावरी सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आम्हाला विरोध करणारे आमचेच बांधव आहेत. विचारांमध्ये फरक झाल्याने त्यांनी आम्हाला ‘उपरे’ म्हटले असेल. पण आम्ही त्यांना आपले मानतो.
गोदावरी आरतीचा अधिकार पुरोहित संघाला निश्चितपणे आहे. गोदावरी ही सर्वांची असल्यामुळे सर्वजण तिची आरती करू शकतात. तसेच आम्हीही या आरतीसाठी आग्रह धरला आहे.
यात गैर काही असण्याचे कारण नाही. पण त्यांना यात काहीतरी वेगळे वाटत असल्यामुळे आम्हाला आरतीपासून रोखले जात आहे, असे मत गोदावरी सेवा समितीचे सरचिटणीस मुकुंद खोचे यांनी सांगितले.
साधू महंतांची समिती स्थापणार
गोदावरी सेवा समितीला मार्गदर्शन करण्यासाठी साधुमहंतांची मार्गदर्शन समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी सेवा समिती काम करणार असून, समितीमध्ये कुठल्या आखाड्याच्या महंतांचा समावेश आहे, याविषयी लवकरच घोषणा होणार आहे.
"आमच्या विचारांमध्ये फरक झाला म्हणून वेगळे झालो असा अर्थ होत नाही. पुरोहित संघाला गोदाआरतीचा अधिकार आहे. पण सर्वसामान्य लोकांनाही आरतीचा अधिकार मिळायला हवा. सर्वसामान्य व्यक्तींचा समावेश असलेली ही समिती बरखास्त करण्याचा विषयच नाही!"
-मुकुंद खोचे, सरचिटणीस (गोदावरी सेवा समिती)
"शासनाने हा निधी विकास कामांसाठी दिला आहे. त्यामुळे कुठल्याही समितीला निधी मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. फक्त सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करण्यासाठी या निधीचे आकडे सांगितले जातात."-जयंतराव गायधनी, अध्यक्ष (गोदावरी सेवा समिती)
"अनादी काळापासून आम्ही गोदाआरती करत आहोत. ही परंपरा मोडीत काढण्याची गरज काय, साधुमहंतांचा समावेश नसलेली ही समितीच बेकायदेशीर आहे. ती बरखास्त व्हायला हवी. आम्ही एक रुपयाही कुणाकडे मागणी करत नाही."-सतीश शुक्ल, अध्यक्ष (पुरोहित संघ)
"वेळ पडली तर आम्ही ‘नाठाळांच्या माथी काठ्या मारायला’ मागेपुढे बघणार नाही. गोदाआरतीचा संपूर्ण खर्च पुरोहित संघ करेल. यापूर्वीही आरती पुरोहित संघच करत होता. आताही करत आहे आणि यापुढेही करत राहणार आहोत."-महंत सुधीरदास पुजारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.