पंचवटी : नाशिक महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार मनपाच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंचवटीत विद्यमान लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला असता प्रभाग कितीही सदस्यांचा असो, जनतेची कामे करणाऱ्या लोकप्रतिनिधींना पुन्हा निवडून येण्यास कोणतीही अडचण नसल्याची प्रतिक्रिया अनेक विद्यमान नगरसेवकांनी व्यक्त केली.
नाशिक महापालिका निवडणुकीचे बिगूल अखेर फुंकण्यात आले असून, पुढील वर्षीच्या सुरवातीलाच म्हणजे फेब्रुवारीत निवडणुकीचा बार उडणार आहे. निवडणुकीसाठी विद्यमान नगरसेवकांसह अनेकजण इच्छुक असल्याने या निवडणुका बहुरंगी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिवसेनेने यासाठी मोठी तयारी केल्याने व इच्छुकांची संख्या मोठी असल्याने आघाडी होण्याची शक्यता धूसर दिसते. तसेच या पक्षाच्या नेत्यांनी ‘अभी नही तो कभी नही’ अशी आक्रमक भूमिका घेतल्याने त्यातच राष्ट्रवादीनेही सर्व जागांवर चाचपणी केल्याने या वेळची लढत बहुरंगी होण्याची शक्यता आहे. भाजपनेही गत निवडणुकीसारखे ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. नाशिक मनपा आजवर झालेल्या सहा पंचवार्षिकमध्ये एक, दोन, तीन व चार अशी वॉर्ड व प्रभागरचना करण्यात आली होती. आता सातव्या पंचवार्षिकसाठी तीन सदस्यांच्या प्रभागाला सरकारने होकार दर्शविल्यावर राज्यपालांनी आढेवेढे न घेता या रचनेला मंजुरी दिल्याने आता नाशिकमध्ये या पद्धतीनेच निवडणुका होणार हे स्पष्ट झाले. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांसह इच्छुक असलेल्या अनेकांनी याबाबत चाचपणी सुरू केली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने २४ पैकी तब्बल १९ जागी विजय मिळविला होता. तर काँग्रेस, राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नव्हता. मनसेला दोन जागा मिळाल्या होत्या. तर गुरमित बग्गा, विमल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत विजयश्री प्राप्त केली होती.
सेनेची आघाडी
या निवडणुकीसाठी शिवसेनेने मेळावे घेत आधीपासूनच आघाडी घेतलेली आहे. परंतु, गेल्या दोन पंचवार्षिकचा विचार करता या पक्षाला केवळ एका जागेवर विजय मिळविता आला. सुनील बागूलसारख्या लढवय्या नेत्याची घरवापसी झाल्याने या पक्षाच्या जागा वाढ शकतात, असे चित्र आहे. पण त्यासाठी सर्वाना सोबत घ्यावे लागणार आहे.
सध्याचे तुलनात्मक संख्याबळ
(विभागातील एकूण जागा २४)
भाजप : १८
मनसे : ०२
शिवसेना : ०१
अपक्ष : ०२
(यात भाजपच्या शांता हिरे यांचे निधन झाल्याने एक जागा रिक्त आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.