Nashik ZP : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील इमारतीचे डागडुजी व रंगाचे काम वेळेत पूर्ण न केल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सदर ठेकेदाराचे कंत्राट रद्द करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार, संबंधित ठेकेदारास नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, असे असतानाच त्याच काम रेंगाळणाऱ्या ठेकेदाराला समज देऊन उर्वरित काम त्याच्याकडूनच करून घेण्याचा निर्णय झाल्याचे वृत्त आहे. यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी महिनाभरात या प्रकरणी यू टर्न घेतल्याची चर्चा आहे.
जिल्हा परिषद मुख्यालयातील इमारतीच्या डागडुजी आणि रंगरंगोटीसाठी ४७ लाखांचे कंत्राट सार्वजनिक बांधकाम विभाग एकच्या माध्यमातून देण्यात आले होते. (contractor delaying work will do building repair work nashik zp news)
निविदेनुसार तीन महिन्यांच्या आत इमारतीची डागडुजी आणि रंगरंगोटी पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, मुदतीत काम पूर्ण झालेले नाही. इमारतीला कुठला रंग द्यायचा, याचा कोणताही निर्णय वेळेत घेतला गेला नाही. इमारतीची डागडुजीची कामे अद्यापही बाकी आहेत. गळतीची ठिकाणे निश्चित झालेली असतानाही गळती रोखण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली नाही.
सामान्य प्रशासन विभागाकडून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाकडे जाणाऱ्या जिन्याला प्रशासनाशी चर्चा न करता, फरशीचे सॅम्पल न दाखविता जुन्या चांगल्या पायऱ्या तोडून नवीन काळ्या रंगाचे चमकदार कडप्पे बसविण्यात आले.
कामे वेळेत करावीत, गळती रोखावी यासाठी कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनीही वेळोवेळी संबंधित ठेकेदारास सूचना केल्या. मात्र, ठेकेदाराकडून कार्यवाही होत नसल्याने मित्तल यांनी संबंधित ठेकेदाराचे कंत्राट तत्काळ रद्द करण्याचे निर्देश गत महिन्यात दिले होते.
या आदेशानंतर कार्यकारी अभियंता सोनवणे यांनी संबंधित ठेकेदाराला दोन नोटिसाही बजावल्या. मात्र, हा कार्यवाहीचा फार्स सुरू असतानाच बांधकाम विभागाने निविदा रद्द करण्यासाठी नोटिसांचा खेळ खेळण्यापेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
त्यानुसार त्यांनी आधीच सहा महिन्यांपासून सुरू असलेले हे काम रद्द करण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालापव्यय होईल. त्यानंतर नवीन निविदा राबविली जाऊ शकते. या सगळ्या बाबींचा विचार करता सध्याच्याच ठेकेदाराला समज देऊन त्याच्याकडून काम करून घेऊ, असा मार्ग काढण्यात आल्याची चर्चा आहे.
बांधकाम विभागाची ही भूमिका मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्य केल्याचे बोलले जात आहे. यामुळे ठेकेदाराकडून नोटिशीबाबत खुलासा आल्यास तो समाधानकारक असल्याचे मान्य करून घेऊन त्याच्याकडूनच उर्वरित काम करून घेतले जाणार असल्याची चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.