सिन्नर (नाशिक) : कोरोना संसर्ग नियंत्रणात (corona virus) आणण्यासाठी शासनाकडून ‘ब्रेक द चेन’ (break the chain) अभियान राबविण्यात येत असून, १ एप्रिलपासून सर्वसामान्यांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा सील (border) करण्यात आल्या आहेत. सीमांवर उभारलेल्या चेक पोस्टचा ग्राउंड रिपोर्ट (ground report) ‘सकाळ’कडून सचित्र मांडण्यात आला. ३ एप्रिलला ग्राउंड रिपोर्टचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यानंतर सिन्नरला प्रशासकीय स्तरावरून तातडीने पोलिसांच्या मदतीला माध्यमिक शिक्षकांच्या नियुक्त्या (teachers) करण्यात आल्या. हे खरे असले तरी या नियुक्त्या करताना संबंधित शिक्षकांच्या अडचणी अथवा त्यांच्या आरोग्यविषयक बाबींकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
कोरोनाबाधित शिक्षकांना चेक पोस्टवर ड्यूटी
शिर्डी महामार्गावर पाथरे येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या चेक पोस्टवर सकाळी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांपैकी एकाचे वडील रुग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत उपचार घेत असून, एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळला, तर एका शिक्षकास गेल्या वर्षीच्या लॉकडॉउन काळात याच चेक पोस्टवर जीवघेणा अपघात झाला होता. या अपघातातून संबंधित शिक्षक अद्याप सावरला नसताना पुन्हा याच ठिकाणी त्याची ड्यूटी लावल्याचा प्रकार नव्याने समोर आला आहे. नोडल अधिकारी म्हणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी त्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हा चेक पोस्टवर पोलिसांच्या मदतीला माध्यमिक शिक्षकांची नेमणूक ३ एप्रिलच्या आदेशाने केली. वास्तविक पुणे महामार्गावर नांदूरशिंगोटे व शिर्डी महामार्गावर पाथरे येथील जिल्हा चेक पोस्टवर प्रवाशांची आरोग्य तपासणी किंवा कोरोना चाचणीसंदर्भात कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. शिवाय अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण देत त्या ठिकाणी आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी नेमण्यात आला नाही. हे वास्तव ‘सकाळ’ने सर्वप्रथम मांडल्यानंतर जाग आलेल्या गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने आदेश काढत शिक्षकांना कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश पारित केले.
पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आम्हाला काय माहीत?
हे करत असताना संबंधित शिक्षकांचे पूर्ण अहवाल निगेटिव्ह आहेत की नाहीत, ते काम करण्यास शारीरिकदृष्ट्या पात्र आहेत किंवा नाही याबाबतची कोणतीच खातरजमा करणे गटविकास अधिकाऱ्यांना योग्य वाटले नाही. या ऑर्डर अतिशय घाईत काढण्यात आल्या असून, त्यासाठी गेल्या वर्षीच्या शिक्षक ड्यूट्यांचा चार्ट समोर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सारवासारव करणारे उत्तर दिले. संबंधित शिक्षक फिट आहेत की अनफिट हे आम्हाला काय माहिती, त्यांनी सांगायला हवे. म्हणजे त्यांच्या जागी माणसे बदलून घेता येतील, असे बोलत त्यांनी आपण महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असल्याचे सांगून फोन बंद केला.
अपघातग्रस्त शिक्षकाला पुन्हा ड्यूटी
वावी येथील माध्यमिक विद्यालयातील एक शिक्षक पाथरे येथील जिल्हा चेक पोस्टवर कर्तव्य बजावत असताना ट्रक अंगावर आल्याने जखमी झाले होते. या अपघातानंतर त्यांच्यावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठीचा खर्च वास्तविकपणे शासनाकडून होणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासकीय यंत्रणांनी त्यांना अद्यापही संबंधित उपचाराची भरपाई दिली नाही. फाइल जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीसाठी प्रलंबित असल्याचे उत्तर त्यांना वारंवार ऐकावे लागले आहे. शस्त्रक्रियेमुळे दोन महिने रुग्णालयात राहावे लागले. त्यानंतर घरी सहा महिन्यांचा आराम करावा लागला. या अपघातामुळे संबंधित शिक्षकाला अद्याप दुचाकी चालविता येत नाही. शस्त्रक्रिया झालेल्या जागी दुखणे पूर्ण थांबलेले नाही. अशातच त्यांना पुन्हा जिल्हा चेक पोस्टवर ड्यूटी करण्याचा आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी बजावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.