World Family Day : "एकमेकांवरील विश्‍वासच एकत्रित कुटुंबाचा मुख्य आधार!" "कोरोना'ने वाढवली कौटुंबिक जवळीक 

world family day.jpg
world family day.jpg
Updated on

नाशिक : पाच काका, काकूंसह आम्ही दहा भावंडे व त्यांची 20 मुले, असे आमचे पन्नास जणांचे एकत्रित कुटुंब आहे. यातील सर्वच वेगवेगळ्या व्यवसायात कार्यरत असल्याने सर्वांना एकत्र येणे अवघड बनते. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण कुटुंब खूप दिवसांनी एकत्र आले असून, खऱ्या अर्थाने एकत्र कुटुंबाचा आनंद घेत आहोत. 

कोरोना'ने वाढवली कौटुंबिक जवळीक 
अवघ्या तेरा महिन्यांच्या बाळापासून ते थेट 76 वर्षांच्या आजोबांपर्यंत चार पिढ्यांचा समृद्ध वारसा जपत येथील कासलीवाल परिवाराने एकत्र कुटुंबाचे महत्त्व टिकवून ठेवले आहे. जागतिक कुटुंब दिनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्याच्या बदलत्या काळातही एकत्र कुटुंब कसे टिकवून ठेवले, याबाबत 76 वर्षीय कुटुंबप्रमुख राजकुमार कासलीवाल यांनी, जैन धर्मातील शिकवण व सर्वांमधील एकमेकांवरील विश्‍वासच एकत्रित कुटुंबाचा मुख्य आधार बनल्याचे सांगितले. 

कासलीवाल कुटुंबीय जपताहेत सामाजिक बांधिलकी 
स्व. भागचंद कासलीवाल यांनी 1975 मध्ये दहीपुलावरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती घरात प्रतिष्ठापना करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे मागितली. गणेश विसर्जनानंतर या मूर्तीची कासलीवाल कुटुंबीयांनी आपल्या बंगल्यात रितसर प्रतिष्ठापना केली. सुरवातीला अक्षरशः पाटावर ठेवण्यात आलेल्या या गणरायासाठी पुढे सुंदर असे मंदिर घराच्या आवारात बनविण्यात आले. तेव्हापासून आमच्या कुटुंबाचा व्यावसायिक आलेख सतत चढताच राहिल्याचे श्री. कासलीवाल सांगतात. कुटुंबातील महिला सध्या जैन धर्मातील तत्त्वज्ञानाबाबत वाचन करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

सर्वांचे व्यवसाय स्वतंत्र 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या सारेकाही ठप्प आहे. त्यामुळे आम्ही बहुसंख्य सदस्य घरातच आहोत. लग्नाच्या सेलिब्रेशनसह सर्वांचे वाढदिवस एकत्रित साजरे करतो, असे दिलीप कासलीवाल, ऍड. राहुल कासलीवाल यांनी सांगितले. प्रकाश सुपारी, महावीर मिठाई या व्यवसायांशिवाय दही, लोणी, साजूक तूप, लोणी, चक्का आदी व्यवसायात हे कुटुंबीय कार्यरत आहे. याशिवाय ऍड. राहुल यांनी फौजदारी वकिलीत स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. काही सदस्य सनदी लेखापाल व अन्य क्षेत्रातही कार्यरत आहेत. 


सामाजिक योगदान 
व्यावसायिक कुटुंब असल्याने सहाजिकच नोकर मोठ्या प्रमाणावर आहेत. यातील अनेकजण उत्तर प्रदेश, बिहारकडील आहेत. या सर्वांना कोरोनाच्या काळात गावाकडे न जाता नाशिकमध्येच राहण्याचा आग्रह केला. एवढेच नव्हे, तर बंदच्या काळात या कामगारांना पगारासह अन्य सुविधा पुरविल्याने त्यांनीही गावी जाण्याचा निर्णय रद्द केल्याचे श्री. कासलीवाल यांनी सांगितले. याशिवाय अनेक गरीब कुटुंबांना किराणा माल देण्यात आला. करोना हे संकट जरूर आहे; परंतु त्यामुळे कुटुंबाची जवळीक अधिक वाढल्याने खऱ्या अर्थाने सहकुटुंब सुटीचा आनंद घेतल्याचे दिलीप कासलीवाल यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.