पंचवटी (जि. नाशिक) : दिंडोरी नाका येथील दुभाजकावर वारंवार वाहने धडकत असून, डागडुजी केलेले दुभाजक पुन्हा ढासळण्याच्या स्थितीत आहे. महिनाभराच्या अंतरात चार ते पाच वेळा वाहनांनी या दुभाजकाला धडक दिल्याने सद्यःस्थितीत या दुभाजकाला मोठे तडे गेले आहेत. दिंडोरी रोडने पंचवटी कारंजाकडे येताना दिंडोरी नाका येथे मोठे वळण आहे. समोरच्या बाजूला पुरिया उद्यान असून, त्याच्या समोरून निमाणीकडे जाणारा मार्ग आहे.
दिंडोरी रोडने पंचवटीकडे येण्यासाठी पुरिया उद्यानाच्या समोरच्या बाजूने वळसा घेऊन पंचवटी कारंजाकडे जाण्याचा मार्ग आहे. या मार्गाचे दुभाजक करणारा वळणाचा दुभाजक या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. या दुभाजकात काही वनस्पतींची रोपेही लावण्यात आलेली आहेत. दिंडोरी रोडने पंचवटी कारंजा व निमाणीकडे येणाऱ्या वाहनचालकांना या वक्र दुभाजकाचा अंदाज येत नाही.
त्यामुळे येथे वारंवार अपघात घडत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. महिनाभरापूर्वीच या दुभाजकाला एका ट्रकने जोरदार धडक दिली होती. त्या धडकेत या दुभाजकाचे सर्वच बांधकाम उखडून गेले होते. विटा लांबवर उडून पडल्या होत्या. या अपघातानंतर या विटा जमा करून त्या तात्पुरत्या लावण्यात आल्या होत्या. यानंतर या दुभाजकाचे व्यवस्थित बांधकाम करण्यात आले. हे बांधकाम झाल्यानंतर त्याला पांढरा रंगही देण्यात आला होता.
आता पुन्हा त्याच भागात चार ते पाच वाहनांनी धडक दिल्याने ते दुभाजक पुन्हा तुटले आहे. वळणाचा भाग असल्याने भरधाव वळण घेताना दुभाजकाला धडक बसते, असे येथील नागरिकांनी सांगितले. वाहनांनी सावकाशपणे वळण घेतल्यास असे अपघात घडणार नाहीत, असेही नागरिक म्हणाले.
रात्रीच्या सुमारास घटना
दिंडोरी रोडकडून पंचवटी कारंजा अथवा आडगाव- औरंगाबाद नाक्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांकडून रात्रीच्या सुमारास या दुभाजकाला धडक दिली जाते. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन वाहनचालक भरधाव वाहने चालवत असल्याने हे प्रकार घडतात. दिवसा या ठिकाणी दोन ते तीन वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहने अडविण्यासाठी थांबलेले असतात, त्यामुळे वाहनांचा वेग कमी असतो.
रिफ्लेटर बसविण्याची मागणी
वर्षभरात दिंडोरी नाक्यावरील दुभाजकाला सहा ते सात वेळा अज्ञात वाहन येऊन धडकत असते. या दुभाजाकाचा दुरुस्ती व रंगरंगोटी खर्च हा मनपास करावा लागतो. या खर्चाच्या प्रमाणात घट होऊन असे प्रसंग टळावे, यासाठी मनपा प्रशासनाने व स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे. या ठिकाणी रिफ्लेटर बसावे व अपघाती वळण आहे, अशा आशयाचा फलक लावावा, अशी मागणी वाहनचालक व रहिवाशांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.