Shravan Somvar : शेवटच्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधत सोमवारी (ता. ११) पंचवटीतील श्री कपालेश्वर महादेवासह सोमेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी पहाटेपासून रांगा लागल्या होत्या. याशिवाय शहरातील लहान- मोठ्या शिवालयातही शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती.
सायंकाळी सुहास वैद्य यांच्याकडून आलेल्या श्रींच्या पंचमुखी मुखवट्यासह परिसरातून ढोलाच्या साथीने पालखी सोहळा रंगला. रात्री उशिरापर्यंत कपालेश्वरासह सोमेश्वरला दर्शनासाठी गर्दी कायम होती. (Crowd flocked to see Someshwar along with Kapaleshwar Queues since dawn due to last Shravani somvar nashik)
शेवटच्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधत हजारो शिवभक्तांनी कपालेश्वरासह सोमेश्वर महादेव व शहर परिसरातील लहान- मोठ्या शिवालयात दर्शनसाठी गर्दी केली होती. म्हसरूळ येथील पेंढारकर परिवारातर्फे कपालेश्वरी भाविकांना केळी व खिचडीचे वाटप करण्यात आले.
श्रावणामुळे झेंडू, बेलाच्या पानांसह सर्वच फुलांना चांगली मागणी होती. त्यामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या गाठीही दोन पैसे लागले. कपालेश्वर देवस्थानतर्फे पहिल्या तीन सोमवारप्रमाणेच भाविकांना रामतीर्थाकडील पायऱ्यांच्या बाजूने प्रवेश देण्यात आला.
या वेळीही पुरुष व महिलांच्या स्वतंत्र रांगा करण्यात आल्या होत्या. उत्तर दरवाजाने बाहेर पडण्याचा मार्ग निश्चित करण्यात आला होता. त्यामुळे सर्वांनाच सुलभ दर्शन झाले.
पंचवटी पोलिसांनी गर्दी लक्षात घेत पहिल्या तीन सोमवारप्रमाणेच मालेगाव स्टॅन्ड, खांदवे सभागृह, साईबाबा मंदिर परिसरात बॅरिकेटिंग करत वाहनांसाठी रस्ता बंद केला होता. त्यामुळे रामतीर्थाजवळील वाहतूक कोंडीही टळली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पालखी सोहळा रंगला
श्रावणी सोमवारसह महाशिवरात्र, सोमवती अमावस्या या दिवशी श्री कपालेश्वरांच्या पंचमुखी मुखवट्याचा पालखी सोहळा रंगतो. भाविक सुहास वैद्य परिवाराकडून मुखवटा देण्यात आला असून त्यांची तिसरी पिढी कपालेश्वरच्या सेवेत लीन आहे.
सायंकाळी चार वाजता निघालेला पालखी सोहळा राममंदिर पूर्व दरवाजाकडून साडेसहाच्या सुमारास रामतीर्थावर पोचला. मुखवट्याला अभ्यंग स्नान घालून अभिषेक करण्यात आला.
त्यानंतर रात्री उशिरा सोहळा पुन्हा कपालेश्वर मंदिरात पोचला. दरम्यान पालखीचे वाटेत ठिकठिकाणी सडा रांगोळीने स्वागत करण्यात आले.
यात्रोत्सव सुरळीत
शहरापासून जवळच असलेल्या गोदातीरावरील निसर्गरम्य सोमेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भल्या पहाटेपासून भाविकांची गर्दी होती. विश्वस्तांच्या उपस्थितीत पहाटेची आरती झाल्यावर दर्शनास सुरवात झाली.
रात्री उशिरापर्यंत रांगा कायम होत्या. देवस्थानतर्फे भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. पार्किंगचे ठेकेदार व भाविकांत काही ठिकाणी वादावादीचे किरकोळ प्रसंग घडले, मात्र मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळूनही यात्रोत्सव सुरळीत पार पडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.