नाशिक : चंपाषष्टीचे औचित्य साधत अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री खंडोबा महाराजांच्या गंगाघाटावरील मंदिरात पहाटेपासून मोठी गर्दी उसळली होती. ‘सदानंदाचा येळकोट’, ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ च्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. सायंकाळी भाविकांच्या दर्शनरांगा थेट रामसेतूपर्यंत पोचल्या होत्या. यात्रोत्सवाच्या निमित्ताने गंगाघाटावर खेळणीसह विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर बच्चेकंपनीसह खवय्यांची गर्दी उसळली होती. (Crowd of devotees on Ganga Ghat on eve of Champa Shashti Nashik news)
गोदावरीकाठी श्री खंडेराव महाराज यांचे प्राचीन मंदिर असून जागृत देवस्थान म्हणून त्याची महती आहे. सोमनाथ बेळे कुटुंबीयांकडून देवस्थानची देखभाल, नित्य पूजाअर्चा केली जाते. मंगळवारी (ता. २९) सकाळी त्यांच्या निवासस्थानापासून श्रींच्या टाकाची मिरवणूक गंगाघाटावरील मंदिरापर्यंत काढण्यात आल्यावर मंदिरात त्याचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर यात्रोत्सवाला सुरवात झाली. साडेनऊला पेठ रोडवरील मल्हारी राजाचा रथ गंगाघाटावर पोचला. ढोलपथकाच्या वादनाने मिरवणुकीची रंगत वाढविली.
अकराच्या सुमारास हा रथ पेठ रोडकडे मार्गस्थ झाला. या वेळी सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. यात्रोत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून दर्शनासाठी दर्शनबारीचीही नियोजन करण्यात आले होते. याशिवाय महाराजांच्या दर्शनासाठी विविध ठिकाणांहून पालख्यांचेही सवाद्य आगमन झाले.
अर्थकारणास बूस्ट
चंपाषष्टीमुळे श्री खंडेराव महाराज मंदिर परिसरात हार-फुले, नारळासह खाद्यपदार्थ व विविध खेळणीचे स्टॉल्स लावण्यात आले होते. बच्चे कंपनीकडून विविध खेळणीला पसंती दिली जात होती. त्यामुळे येथील अर्थकारणासही थोड्याफार प्रमाणात बूस्ट मिळाला.
हेही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...
घरोघर तळीचे आयोजन
श्री खंडेराव महाराजांचे दर्शन घेतल्यावर सायंकाळी घरोघरी तळी भरण्याचा कार्यक्रम रंगला. देव्हाऱ्यातील श्री खंडोबा महाराजांच्या टाक गंगाघाटावरील खंडेराव मंदिरातून घरी आल्यावर पाच जणांच्या उपस्थितीत तळीही भरण्यात आली. या वेळी घरोघर श्री खंडोबाचा नावाचा गजर करण्यात आला.
उपनगरांतही उत्साह
खंडेराव महाराजांच्या गंगाघाटावरील प्राचीन मंदिरासह पेठ रोड, हिरावाडी, आडगाव, कोणार्कनगर, नांदूर मानूर, विडी कामगार नगर, मेरी- म्हसरूळ परिसरातील श्री खंडेराव महाराज मंदिरांतही दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. या ठिकाणीही नारळ, बेल-भंडाऱ्याची दुकाने थाटण्यात आली होती.
बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम
चंपाषष्ठीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही पेठ रोड व हिरावाडी परिसरात बारा गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर भाविकांच्या प्रचंड उत्साहात प्रथमच हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.