नाशिक : भाविकांच्या दर्शनासाठी अलीकडेच खुले झालेले व सुंदर कोरीव कामामुळे भाविकांच्या प्रशंसेस पात्र ठरलेल्या शाही मार्गावरील स्वामी नारायणाच्या दर्शनासाठी रविवारी सुटीचे औचित्य साधत सकाळपासून मोठी गर्दी लोटली होती. यात तरूणाईसह ज्येष्ठांची मोठी संख्या होती. (Crowd rush at Swaminarayan temple on holiday Nashik News)
स्वामी नारायण मंदिर ट्रस्टतर्फे तपोवन रस्त्यावरील नवीन शाही मार्गावरील अडीच एकर जागेवर हे भव्य मंदिर बांधण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच या मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करणात आले. राजस्थानातील भरतपूर जिल्ह्यातील बन्सी पहाडपूर येथील तब्बल एक लाख घनफूट गुलाबी दगडापासून या मंदिराची निर्मिती करण्यात आली असून, सुंदर व सुबक बांधकामामुळे तसेच परिसरात उभारण्यात आलेल्या सुंदर शिल्पांमुळे मंदिराच्या सौंदर्यात भरच पडत आहे.
खांबावर रामायण, महाभारत
गोदावरीच्या डाव्या तटावर नवीन शाही मार्गालगत उभारण्यात आलेल्या या भव्य मंदिराला तीन प्रवेशद्वार आहेत. मंदिराच्या खांबांवर शिवचरिरत्रासह रामायण, महाभारत, श्रीकृष्ण आदींचे चरित्र सुंदर रित्याकोरण्यात आले आहे. तर मंदिराच्या खालील हॉलमध्ये अक्षर पुरुषोत्तम महाराज, घन:श्याम महाराज,हरिकृष्ण महाराज यांच्यासह श्रीगणेश, श्रीराम-सीता, विठ्ठल रुक्मिणी, शिवपार्वती, हनुमान आदी नीलकंठीवर्णी सुंदर मूर्ती विराजमान त्यांची भाविकांना भुरळ पडत आहे. याशिवाय रामायण, महाभारत, भगवान स्वामी नारायण यांच्या जीवनावरील चित्ररूप रेखाटण्यात आले आहे. याशिवाय खालील बागेत देव दानवांमधील समुद्र मंथनाचा देखावा पाहण्यासाठीही गर्दी होत आहे.
पाचवेळा आरती
मंदिरात दिवसभरात पाचवेळा आरती होते. सकाळी सहा वाजता मंगल आरती, साडेसातला श्रृंगार आरती, सव्वाअकराला राजभोज आरती, सायंकाळी सातला संध्या आरती व साडेआठला शेजारती होते. भाविकांसाठी मंदिर सकाळी सहा ते दुपारी बारा आणि नंतर ४ ते रात्री आठ वाजेपर्यंत खुले असते, अशी माहिती साधू दिव्य नयनदास यांनी दिली.
सेल्फीसाठी मोठी गर्दी
मंदिराशेजारीच विविध महाविद्यालये आहेत, तसेच याच ठिकाणाहून तपोवनाकडे जाण्याचा रस्ता आहे. निसर्गाच्या सानिध्यात नदीकिनारी उभारण्यात आलेल्या या मंदिराच्या परिसरात आज तरुणाईची मोठी गर्दी उसळली होती. त्यांनी दर्शनाबरोबच वेगवेगळ्या ठिकाणी सेल्फी घेत आनंद लुटला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.