नाशिक : गॅस सिलिंडरची (LPG Cylinder) नोंदणी केल्यानंतर आकारले जाणारे शुल्क सर्वसमावेशक असते. असे असतानाही डिलिव्हरीच्या नावाने २० ते ३० रुपयांचा नाहक भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागत आहे. अनेक वेळा वजन, मुदत न तपासता सिलिंडरचा ताबा ग्राहक घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. (cylinder delivery boy charges 20 to 30 rupees to deliver cylinder nashik news update)
दिवसेंदिवस सिलिंडरच्या वाढत्या किमती सर्वसामान्यांच्या खिशाला चपराक लावत आहेत. सध्या तर सिलिंडरची किंमत एक हजार रुपयांवर गेलेली असताना सामान्यांना आर्थिक झळ सोसावी लागते आहे.
दरम्यान, सिलिंडरच्या किमती ठरविताना त्यामध्ये वितरकाकडून ग्राहकाला घरपोच सिलिंडर पोचविण्यासाठी असे सर्व शुल्क समाविष्ट केलेले असते. असे असतानाही एजंट प्रतिनिधींकडून २० ते ३० रुपयांची मागणी केली जात असल्याचे बहुसंख्य ग्राहकांचे म्हणणे आहे.
आधीच सिलिंडर महागलेले असताना डिलिव्हरी चार्जेसचे नाहक भुर्दंड सोसावे लागत असल्याने अनेकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरांनुसार वाढतोय डिलिव्हरीचा चार्ज
साधारणतः सिलिंडरचे दर पाचशे रुपयांपर्यंत असताना अतिरिक्त पाच रुपयांची मागणी केली जायची; परंतु जसजसे सिलिंडरचे दर वाढत गेले तशी पैशांची मागणीही वाढत गेली आहे. अनेक सिलिंडरचे दर काहीही असले तरी शून्याच्या पटीत (आठशे, नऊशे, हजार, अकराशे) अशा स्वरूपात पैशांची मागणी केली जाते.
काही ग्राहकांकडून विचारणा केल्यास किंवा ऑनलाइन पैसे भरून बुकिंग केलेली असल्यास अशा ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे देण्यास नकार दिला जातो. अशा ग्राहकांकडून डिलिव्हरी बॉय आग्रह करत नाही, हीदेखील सत्य परिस्थिती आहे.
मागणी केल्यास वजन मोजणी
सिलिंडरवर वैधता व अन्य तपशील नोंदविलेला असतो. कोडिंगच्या स्वरूपात या संदर्भातील तपशील सिलिंडरवर असतो; परंतु अनेक वेळा ग्राहकांकडून या संदर्भात उलट तपासणी केली जात नाही. तसेच ग्राहकांनी मागणी केल्यास संबंधितांकडून सिलिंडरचे वजनदेखील करून दाखविले जाते. ही बाबदेखील अनेक ग्राहकांना माहिती नसल्याचे आढळून आले.
"बऱ्याच वेळा सिलिंडर नोंदविल्यानंतर पावतीवर नमूद रकमेपेक्षा दहा-वीस रुपये अतिरिक्त द्यावे लागतात. चार मजल्यांवर सिलिंडर आणून दिले जात असताना आम्हीही दारापर्यंत सिलिंडर मिळत असल्याने चार पैसे देत असतो." -सोनारी पांढरे, गृहिणी
"सिलिंडरचे वाढते दर सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत; परंतु किमती वाढत असल्या तरी कर्मचाऱ्यांचे कष्ट बघून स्वखुशीने त्यांना १०, २० रुपये देत असतो." -संगीता गायकवाड, गृहिणी
"एक हजार रुपयांपर्यंत सिलिंडरचे दर गेल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडलेले आहे. अशात जादाचे शुल्क नकोसे वाटते." -शीतल शेलार, गृहिणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.