रासायनिक औषधाने द्राक्षबागांचे नुकसान; कृषी विभागाकडून पंचनामे

रासायनिक औषधाने द्राक्षबागांचे नुकसान; संबंधीत कंपनीने केले हात वर
रासायनिक औषधाने द्राक्षबागांचे नुकसान; कृषी विभागाकडून पंचनामे
SYSTEM
Updated on

वडनेर भैरव (जि. नाशिक) : एका आंतरराष्ट्रीय कंपनीचे औषध फवारल्यामुळे द्राक्षबागांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी चांदवड तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीकडे केल्याने शुक्रवारी (ता. ८) पिंपळगाव बसवंत येथील कांदा व द्राक्ष संशोधन केंद्राच्या वतीने वडनेर भैरव, बोराळे येथील चार शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांचे पंचनामे केले. परंतु, संबंधित कंपनीने याप्रकरणी हात वर केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी अविनाश पाटोळे यांच्याकडे ३५ एकर द्राक्षबाग असून, निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन ते घेतात. श्री. पाटोळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षीपासून एका आंतरराष्ट्रीय कंपनीचे औषध कंपनीचे प्रतिनिधींच्या सल्ल्याने मिलिबग्ज या कीटकाच्या नियंत्रणासाठी द्राक्षबागेवर फवारले. मिलीबग्ज या किटकाच्या नियंत्रणासाठी कुठलीही ड्रेंचिंग किंवा आगाऊ खर्च करु नका. त्यासाठी आमच्या कंपनीचे एक प्रभावी व वर्षभराच्या आमच्या वेळापत्रकानुसार फवारणी केली तर तुम्हाला मिलिबग्जवर नियंत्रण मिळविण्यासोबतच निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन वाढेल, अशी ग्वाही प्रतिनिधींनी दिली. मात्र, औषध फवारणीनंतरही द्राक्षबागांवर मिलीबग्जचा प्रादुर्भाव दिसून आल्याचे पाटोळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

रासायनिक औषधाने द्राक्षबागांचे नुकसान; कृषी विभागाकडून पंचनामे
IAS अधिकाऱ्याचा राजीनामा; आदिवासींना दिली स्वकर्तुत्वाची ओळख

द्राक्ष उत्पादकांना कृषी कार्यालयामार्फत न्याय मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केल्याने वडनेर भैरव येथील बाळासाहेब शिंदे, अविनाश पाटोळे, अशोक पाटोळे, बोराळे येथील संतोष पवार या शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांचा पंचनामा प्रा. राकेश सोनवणे, चांदवड तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे, पंचायत समितीच्या कृषी विस्तार अधिकारी नलिनी खैरनार, कृषी सहायक बी. पी. खैरे यांनी केला.

दरम्यान, उपस्थित कंपनीच्या प्रतिनिधीने पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे शेतकरी व प्रतिनिधीत बाचाबाची झाली. वडनेर भैरवचे माजी उपसरपंच रावसाहेब भालेराव यांनी कंपनी प्रतिनिधीला धारेवर धरत शेतकऱ्यांचे नुकसान थांबवा, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला.

कंपनीकडून ‘लकी ड्रॉ’चे आमिष

संबंधित कंपनीच्या औषधाने किडीवर अजिबात काम केलेले नाही. वारंवार कंपनीशी यासंदर्भात बोलल्यावर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षीदेखील शेतकऱ्यांनी कंपनीला हा प्रकार निदर्शनास आणून दिला. परंतु, कंपनीचा उद्देश हा शेतकरी हिताचा नसून जास्तीत जास्त औषध विक्रीतून नफा मिळवणे हा आहे, असा आरोप शेतकरी करीत आहे. दोन वर्षापासून कंपनीकडून आमिष दाखवून ‘लकी ड्रॉ’ सारख्या माध्यमातून बक्षिसे देऊ केली जातात. यात दर्जाहीन प्रॉडक्टच्या विक्रीवर भर दिला जातो. मात्र, हे करत असताना शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे डोळेझाक केली जाते. कृषी विभागाने संबंधित शेतकऱ्यांच्या लेखी तक्रारी घेऊन कंपनीवर उचित कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

''संबंधित कंपनीने तीन- चार वर्षांपासून द्राक्षावर येणाऱ्या मिलिबग्ज (पिठ्या ढेकूण) या किडीवर लेबल क्लेम असलेले औषध बाजारात आणले. कंपनी प्रतिनिधीच्या सल्ल्यानुसार सर्व शेतकऱ्यांनी काटेकोर फवारणी करूनही आज द्राक्षबागा पूर्ण तयार होऊन हार्वेस्टिंगला आल्या असताना बागेत मोठ्या प्रमाणात मिलिबग्जचा प्रादुर्भाव दिसून येतोय.'' - प्रमोद निकम, द्राक्ष उत्पादक, वडनेर भैरव

''यावर्षी द्राक्ष बागांवर सदर औषध फवारल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याविषयी कंपनी अधिकाऱ्यांशी सुरवातीला बोलणे झाले. नंतर त्यांनी फोन सुद्धा उचलले नाही. कृषी विभागाने याप्रश्‍नी कडक भूमिका घ्यावी.'' - सुरेश कळमकर, द्राक्ष उत्पादक, मोहाडी

रासायनिक औषधाने द्राक्षबागांचे नुकसान; कृषी विभागाकडून पंचनामे
जंगलांचा गुदमरतोय श्‍वास!

''आमच्या कंपनीच्या औषधाचा वापर करताना शेतकऱ्यांनी आम्ही सांगितलेल्या प्रक्रियेचा अवलंब केलेला नाही. शिवाय या औषध फवारणीमुळे मिलिबग्ज येणारच नाही, असे आम्ही कुठेही म्हटलेले नाही. त्यामुळे नुकसान भरपाईचा प्रश्‍नच येत नाही.'' - दिलीप शिंदे, कंपनी प्रतिनिधी

या वेळी मनोहर पाटोळे, राजेंद्र पूरकर, नाना पूरकर, वैभव भालेराव, कंपनीचे प्रतिनिधी किरण आहेर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.