नाशिक : मानवाच्या कल्याणासाठी दत्त महाराजांनी झोळी घेतली. त्या झोळीत दत्त महाराज मानवाचे दुःख स्वीकारतात आणि जनतेला सुख देतात, असे प्रतिपादन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी केले. (Dattagurus pack to accept human suffering Gurumaulis mores Assertion Nashik News)
जगभरातील सर्व स्वामी केंद्रांमध्ये श्री दत्त जयंती सप्ताह साजरा होत आहे. श्रीक्षेत्र दिंडोरी येथील प्रधान केंद्रात गुरुमाउलींनी सप्ताहाच्या पाचव्या दिवशी सेवेकऱ्यांना मार्गदर्शन केले.
गुरुमाउली श्री. मोरे म्हणाले, की दत्तगुरूंचे अवतार श्री नृसिंह सरस्वती यांनी ५० वर्षे गाणगापुरात आध्यात्मिक, सामाजिक कार्य केले. या देशावर परकियांनी अनेक धार्मिक संस्थांवर हल्ले केले, मात्र गाणगापूर एकमेव दत्तस्थान सुरक्षित राहिले.
दत्तप्रभूंनी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या निर्गुण पादुका मागे ठेवल्या. दत्तप्रभू हे एकमेव अवतार असे आहेत, की त्यांनी आपल्या मागे पादुका ठेवल्या. मात्र, इतर आविष्कारांनी आपल्या मागे काहीही ठेवले नाही, याकडे गुरुमाउलींनी सेवेकऱ्यांचे लक्ष वेधले.
गाणगापूरमध्ये माधुकरी मागण्याचा रिवाज आहे. अहंकार घालविण्यासाठी माधुकरी मागितली जाते. आपल्यातील अहंकार नष्ट झाल्याशिवाय आध्यात्मिक प्रगती होत नाही.
अहंकार नाहीसा झाला, की भक्त परमेश्वराजवळ पोहोचतो. अहंकारमुक्त, चिंतामुक्त, दुःखमुक्त होण्यासाठी नित्यसेवा महत्त्वाची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
श्री स्वामी चरित्र सारामृतावर बोलताना ते म्हणाले, की स्वामी सेवामार्गाने नऊ भाषांमध्ये स्वामी चरित्र प्रकाशित केले आहे. स्वामी चरित्र वाचनाने हरवलेली मन:शांती प्राप्त होते. हिमालयातील कर्दळीवनात प्रकटल्यावर देशभर पायपीट करून स्वामी महाराज शेवटी अक्कलकोटला पोहोचले.
तेथे त्यांनी २२ वर्षे वास्तव्य करून अनेक सिद्धपुरुष घडविले. त्यानंतर समाधी घेत असल्याचे केवळ दाखविले. आजही त्यांच्या लीला सुरू आहेत. अनेकांना दर्शन होते. त्यांचा आविष्कार हा कायम राहील.
स्वामींनी मुंबईत स्वामीसूत यांना मुंबईच्या गादीवर बसविले, त्यानंतर दादाबुवांनी कारभार पाहिला, पुढे दादाबुवांचा परमपूज्य पिटले महाराजांशी संपर्क झाला आणि १९७४ पर्यंत पिटले महाराजांनी विविध प्रश्नांनी ग्रस्त असलेल्या जनतेला मार्गदर्शन केले, असे गुरुमाउलींनी नमूद केले. या वेळी सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.