Nashik Crime News : विम्याच्या रक्कमेसाठीचा केलेला बनाव बेतला जिवावर!; महिलेसह 6 जणांना अटक

Crime News
Crime Newsesakal
Updated on

नाशिक : स्वत:च्याच नावाने चार कोटी रुपयांची टर्म इन्शुरन्स पॉलिसी काढून ती मिळविण्यासाठी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह मिळवून बनाव रचला. बनाव फलद्रुप होत नसल्याने यातील सहभागी व्यक्तींनी ज्याच्या नावे विमा होता त्याचाच खून करून अपघाताचा बनाव रचून विम्याची चार कोटींची रक्कम हडपल्याचा प्रकार वर्षभरानंतर उघडकीस आला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी एका महिलेसह सहा जणांना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत (ता. २०) पोलिस कोठडी सुनावली आहे. (death due to desire for Insurance Amount 6 people including woman arrested Nashik Latest Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक सुरेश भालेराव (वय ४६, रा. भगुर रोड, देवळाली कॅम्प) यांचा मृतदेह २ सप्टेंबर २०२१ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथील रस्त्यालगत झाडाझुडपांमध्ये आढळून आला होता. प्रथमदर्शनी भालेराव यांच्या डोक्याला जखम व अंगावर वाहन गेल्याने मृत्यू झाल्याचा गुन्हा अज्ञात वाहनचालकाविरोधात मुंबई नाका पोलिसांनी दाखल केला होता.

त्यासंदर्भात पोलिसांनी न्यायालयात कागदपत्र जमा केली होती. चार दिवसांपूर्वी मृत अशोक भालेराव यांचा भाऊ दीपक भालेराव यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष येऊन अपघाताबाबत शंका उपस्थित करीत महत्वपूर्ण माहिती दिली. त्यानुसार मुंबई नाका पोलिसांनी न्यायालयातील या गुन्ह्यांसंदर्भातील कागदपत्रे मागवून घेत नव्याने तपास केला असता त्यामध्ये तथ्य आढळून आले.

पोलिसांनी विम्याची रक्कम जमा झालेली संशयित महिला रजनी कृष्णदत्त उके हिला ताब्यात घेत चौकशी केली असता तिने गुन्ह्यांची कबुली दिली. चौकशीत संशयित मंगेश बाबुराव सावकार, दीपक अशोक भारुडकर, किरण देविदास शिरसाठ, हेमंत शिवाजी वाघ, प्रणव राजेंद्र साळवे (सर्व रा. नाशिक) यांना पोलिसांनी अटक केली. संशयितांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांना येत्या २० तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

२०१८ मध्ये रचला कट

अशोक भालेराव याच्यासह रजनी उके, मंगेश सावकार, दीपक भारुडकर, किरण शिरसाठ, हेमंत वाघ, प्रणव साळवे यांनी संगनमताने २०१८ मध्येच मयत भालेराव यांचया नावे ४ कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स काढला. त्यानंतर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह भालेराव याचा दाखवून विम्याची रक्कम मिळविण्याचा कट रचला. त्यासाठी संशयित महिला रजनी उके हिला भालेराव यांची पत्नी दाखविण्यासाठी तिचे रजनी अशोक भालेराव या नावाने कागदपत्रेही तयार करण्यात आली.

परंतु, बनाव यशस्वी होत नसल्याने भालेराव याला अंधारात ठेवून त्याचाच खून करून अपघात भासविण्याचा कट रजनी उकेसह पाच जणांनी रचला. त्याप्रमाणे भालेराव याच्या डोक्यात कशाने तरी वार करून खून केला आणि त्याच्या अंगावरून वाहन नेले. त्यावरून भालेराव याचा अपघाती मृत्यूचा बनाव केला. त्यानंतर संशयितांनी इन्शुरन्स कंपनीसमोर रजनी उके हिला भालेराव यांची पत्नी दाखवून विम्याची ४ कोटींची रक्कम तिच्या खात्यावर जमा झाल्यानंतर आपसात वाटप केली.

अन्‌ कट उघडकीस आला

चार कोटी रुपयांची रक्कम संशयितांनी आपसात वाटून घेतली. परंतु, या टोळीतील एकाच्या वाट्याला कमी रक्कम आल्याने तो नाराज होता. त्यानेच भालेराव यांचा भाऊ दीपक भालेराव यास भेटून हा अपघात नसून घातपात असल्याचे सांगितले. विम्याच्या रकमेसाठी हा प्रकार घडल्याचेही सांगितले. त्यामुळे दीपक भालेराव यांनी पोलिसात धाव घेत या अपघाताबाबत शंका उपस्थित केली. त्यानंतर पोलिसांनी शहानिशा करण्यासाठी संशयित रजनी उके हिच्या बँक खात्याची माहिती घेतली असता त्यावर चार कोटी रुपये विम्याचे जमा झाल्याचे समोर आले.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

Crime News
Nashik News : नगराध्यक्ष ते उपमुख्यमंत्री घडविणारी ऐतिहासिक रंगारवाडा शाळा कालबाह्य!

संशयिताकडे विनापरवाना पिस्तुल

मुख्य संशयित मंगेश सावकार याच्या वाहनाच्या डिक्कीमध्ये विनापरवाना एक पिस्तुल व सहा जीवंत काडतुसे सापडली आहेत. याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता त्याने स्वसंरक्षणासाठी ते वापरत असल्याचे सांगितले. याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

शवविच्छेदन अहवालाबाबत शंका

भालेराव याच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या डोक्यावर असलेला वर्मी घाव हा अपघाताचा की मारल्याचा आहे, ही बाब विच्छेदन अहवालात कशी समोर आली नाही, याबाबत आता शंका उपस्थित होत आहे. यापूर्वी अनेक अपघाती मृत्यूबाबत शवविच्छेदन अहवालातून खून झाल्याचे निष्पन्न झालेले असताना याच प्रकरणात शवविच्छेदन अहवालातून शंका उपस्थित का करण्यात आली नाही, असाही प्रश्‍न या निमित्ताने उभा राहतो आहे.

"विम्याच्या रकमेसाठी अपघात भासवून संशयितांनी खून केल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. संशयितांनी यापूर्वीही असे काही प्रकार केले असावेत का, या दृष्टीने तपास सुरू आहे."

- किरणकुमार चव्हाण, उपायुक्त, परिमंडळ- १, नाशिक

Crime News
Nashik News : आजपासून नागपूर- शिर्डी दरम्यान 'समृद्धी' मार्गे बससेवा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.