हिमालय पुत्र सुंदरानंद यांचे देहावसान
नाशिक : हिमालयातील क्षेत्रात 'फोटोग्राफर बाबा' म्हणून ओळखले जाणारे संन्यासी स्वामी सुंदरानंद यांचे बुधवारी रात्री देहावसान झाले. ते 97 वर्षांचे होते. आपल्या कॅमेराने टिपलेल्या लक्षावधी छायाचित्रांच्या माध्यमातून सुमारे ७० वर्षातील हिमालयाच्या स्थित्यंतराचा आलेख जगभर पोहोचविणारे स्वामीजी हे "हिमालयाचा संदर्भ कोश" म्हणून ओळखले जात. तसेच श विदेशासह त्यांचा नाशिकमध्येही चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
मूळचे आंध्रप्रदेशातील अनंतपूर चे रहिवासी असलेले स्वामीजी वयाच्या 13 व्या वर्षी हिमालयात आले . त्यांनी वेदान्ताचे महान भाष्यकार स्वामी तपोवन महाराज यांचे शिष्यत्व स्वीकारले आणि आजीवन त्यांची सेवा केली. गुरुंच्याच प्रेरणेने गंगोत्रीत राहून 1947 पासून साधना, हिमालय भ्रमण आणि हिमालयाच्या पर्यावरण रक्षण अभियानाला प्रारंभ केला. गिर्यारोहणाचे अनेक विक्रम प्रस्थापित करीत असताना सत्तर वर्षात सुमारे दोन लाखांवर छायाचित्र टिपली. त्यावर आधारित "हिमालय : थ्रू द लेन्स ऑफ अ साधू" या ग्रंथाचे प्रकाशन दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांनी केले होते.देश विदेशात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.
उत्तर काशीतील प्रसिद्ध "नेहरू पर्वतारोहण संस्थेचे" ते अनेक वर्षे मानद संचालक होते. एव्हरेस्ट वीर तेनसिंग यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. एव्हरेस्ट कन्या बचिंद्री पाल, माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी पर्वतारोहणाचे आणि योगासनांचे धडे स्वामीजींकडून घेतले. 1962 च्या भारत - चीन युध्दात त्यांनी लष्कराला हिमालयाला अज्ञात रस्ते दाखवून मार्गदर्शन केले होते. त्यांच्या या कार्याचा बहुमान म्हणून हिमालयातीय एका मार्गाला त्यांचे नाव देण्याला आले. शिवाय गंगोत्रीच्या वर असलेल्या एका ग्लेशियरला "सुंदर ग्लेशियर" आणि एका शिखराला "सुंदर शिखर" म्हणून ओळखले जाते. राष्ट्रपती भवन, संसद भवन, विविध विधान भवने यापासून देशातील प्रमुख शहरात त्यांनी स्लाईड शो चे शेकडो कार्यक्रम केले आणि जनसामान्यांना हिमालयाचा परिचय करून दिला. देशातील प्रमुख मासिकात आणि वर्तमानपत्रातून त्यांनी विपूल लेखन केले. डिस्कवरी चैनल, जपान ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनने त्यांच्यावर माहितीपट तयार केले आहेत़.
त्यांचे वास्तव्य 1947 पासून गंगोत्रीतील तपोवन कुटीत होते. तेथेच "तपोवनम् हिरण्यगर्भ" नावाची पाच मजली आर्ट गॅलरी उभारण्यात आली आहे. याच ठिकाणी उद्या (ता.25 ) त्यांना भूसमाधी दिली जाईल, असे त्यांचे निकटवर्ती डॉ. अशोक लुथरा यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.