NMC News : महापालिकेच्या मलनिस्सारण, पाणीपुरवठा, यांत्रिकी तसेच विद्युत विभागांचे विकेंद्रीकरण करताना दोन कार्यकारी अभियंत्यांकडे प्रत्येकी दोन विभागांचा पदभार देण्यात आला आहे.
त्याव्यतिरिक्त कोरोनाकाळात २४ तास रुग्णालयांची सेवा करणारे डॉ. नितीन रावते यांना शाबासकी मिळण्याऐवजी जेष्ठतेत अग्रभागी असूनही त्यांची रवानगी डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
दरम्यान, या अदलाबदलीच्या खेळात मोठ्या प्रमाणात ‘अर्थकारण’ झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात असून, याविरोधात असहकाराची मोठी लाट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (decentralization two Executive Engineers are in charge of two divisions each nmc news)
मलनिस्सारण, पाणीपुरवठा, यांत्रिकी तसेच विद्युत या चार विभागांचा कार्यभार असलेले अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी ३० सप्टेंबरला सेवानिवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर त्या पदाचा कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविण्यावरून चार दिवसांपासून महापालिका मुख्यालयात घडामोडी घडल्या.
मुळात धर्माधिकारी ज्या दिवशी निवृत्त झाले. त्यापूर्वीच अन्य अभियंत्यांची नियुक्ती होणे अपेक्षित होते. परंतु प्रशासनाकडून विलंब का लावला गेला, यावरून विविध प्रकारच्या चर्चा घडतं आहे. त्यात ३ ऑक्टोबरला अभियंत्यांना थेट दूरध्वनी करून पदांची बोली लावल्याची चर्चा सुरू झाली. या पदावर बसण्यासाठी अटी व शर्ती ठेवल्याने महापालिका मुख्यालयात पदांसाठी अक्षरशः लिलाव झाल्याचे बोलले जात आहे.
बुधवारी अखेरीस मेकओव्हर प्रशासनाकडून करण्यात आला. मलनिस्सारण व पाणीपुरवठा या दोन विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांचा नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल यांच्याकडे, तर यांत्रिकी व विद्युत विभागाचा अधीक्षक अभियंतापदाचा कार्यभार यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश धनाईत यांच्याकडे सोपविला.
अग्रवाल यांच्याकडे सर्वात महत्त्वाचा नगररचना विभाग आहे. असे असताना त्यांच्याकडे पुन्हा मलनिस्सारण व पाणीपुरवठा या दोन महत्त्वाच्या विभागांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
महापालिकेत अन्य कार्यकारी अभियंते नाही का असा सवाल, यानिमित्ताने अभियंता वर्गात उपस्थित केला जात आहे.
रावते पुन्हा फिल्डवर
डॉ. नितीन रावते यांनी कोरोनाकाळात केलेल्या कामामुळे ते रुग्णांसाठी मोठा आधार ठरले. कठडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातच त्यांनी २४ तास रुग्णांची सेवा केली. त्यामुळे त्यांना कामाची बक्षिसी मिळणे अपेक्षित होते. २०२१ मध्ये त्यांना निवासी वैद्यकीय अधिकारी पदावर पदोन्नती मिळाली, परंतु अद्यापपर्यंत त्यांच्याकडे या पदाचा कार्यभार देण्यात आलेला नाही. वैद्यकीय अधीक्षकपद रिक्त झाल्यानंतर त्यांच्याकडे प्रभारी कार्यभार देण्यात आला.
परंतु शासनाने डॉ. तानाजी चव्हाण यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांना वैद्यकीय अधीक्षकपद सोडावे लागले. ज्येष्ठतेनुसार त्यांना मुख्यालयात सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पद मिळणे अपेक्षित असताना ज्येष्ठता असून त्यांना पुन्हा डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात पाठविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वास्तविक महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता आहे, असे असताना मुख्यालयात डॉक्टरांची गर्दी होत आहे. प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.
पगारांकडे नगररचना
पुणे प्राधिकरणाकडून महापालिकेच्या सेवेत पुन्हा रुजू झालेल्या प्रशांत पगार यांच्याकडे पाणीपुरवठा (वितरण) विभाग देण्यात आला असला तरी अग्रवाल यांच्याजागी नगररचना कार्यभार त्यांच्याकडे लवकरच येणार असल्याचे बोलले जात आहे. महापालिकेत जवळपास ९ कार्यकारी अभियंता असताना अग्रवाल व पगार हे दोघेच गुणवार अभियंते महापालिकेत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.