नाशिक : गार वारे, अन परतीचा पाऊस अशा प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या 38 तासात 600 किमीचे अंतर सायकलिंगने पार करण्याची किमया नाशिकच्या शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी केली. सायकलिंगचे कॅपिटल म्हणून नाशिक शहराने अल्पावधीत नावलौकिक प्राप्त केले आहे. उपायुक्त बारकुंड यांनी अवघ्या ३८ तासांमध्ये ६०० किलोमीटरचा पल्ला गाठत सायकलिंगचा सुपर रॅन्डोनियर (एसआर) ताब पटकावत नाशिकच्या नावलौकिकात आणखी भर घातली आहे. पोलीस दलातील कामाचा व्याप सांभाळून केवळ शारीरिक सदृढता आणि कठोर मेहनतीच्या बळावर उपायुक्त बारकुंड यांनी सायकलिंगचा छंद जोपासला आहे. (Deputy Commissioner of Police Sanjay Barkund become Super Randonneur of cycling Nashik Latest Marathi News)
ऑडॅक्स क्लब पार्शियन रॅन्डोनियर स्पर्धेची 15, 16 ऑक्टोबर रोजी बीआरएम 600 किमी सायकल राईड पार पडली. या स्पर्धेत लांब पल्ल्याच्या सायकलिंगचे लक्ष दिले जाते आणि ठराविक वेळेच्या मर्यादेत हे अंतर पार करणे अनिवार्य असते. 200, 300, 400, 600 किमीच्या सायकलिंग स्पर्धा एका वर्षभरात स्पर्धकाला पूर्ण करणे बंधनकारक असते. या चारही स्पर्धा सायकलिस्टने एका वर्षात पूर्ण केल्या तरच त्यांना सुपर रॅन्डोनिअर (एसआर) किताब बहाल केला जातो. जो उपायुक्त बारकुंड यांनी पार केल्याने ते सुपर रॅन्डोनियर किताबाचे मानकरी ठरले आहेत.
उपायुक्त बारकुंड यांनी नाशिक सायकलिस्ट आयोजित 200, 300 व 400 किमीची स्पर्धा भर पावसात पूर्ण केल्यानंतर, त्यांच्यासमोर ६०० कि.मी. अंतर निर्धारित ४० तासात पूर्ण करण्याचे आव्हान होते. यासाठी त्यांनी नासिक येथे रजिस्ट्रेशन होते मात्र कामाच्या व्यापामुळे त्यांना सहभागी होता आले नाही. तर, एसआर किताबासाठी अखेरची संधी असल्याने त्यांनी धुळे गाठले व गेल्या 15, 16 ऑक्टोबर रोजी सहाशे किमीच्या स्पर्धेत सहभाग ती विक्रमी वेळेत पूर्ण करीत एसआर किताब पटकावला.
प्रतिकूल हवामानाचे आव्हान
600 किमीसाठी 40 तासांची मर्यादा होती. या स्पर्धेची सुरूवात धुळे येथून झाली. ठिकरी (मध्य प्रदेश) 150 किमी, परत धुळे 150 किमी. त्यानंतर, धुळ्याहून थेट नाशिक आणि नाशिकहून पुन्हा धुळे असा 600 किमीचे अंतर त्यांनी अवघ्या ३८ तासात केले. यादरम्यान, उपायुक्त बारकुंड यांनी ऑक्टोबर हिट, परतीचा पाऊस अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. 38 तासात एक-दोन तास झोप घेत त्यांनी ही स्पर्धा जिंकली.
वर्षात तीन स्पर्धा
बारकुंड यांनी यावर्षी पहिली एनआरएम 100 किमी पूर्ण केली. बीआरएम प्रथम 300 किमी नाशिक ते धुळे (12 जुन 2022 ) भर पावसात पूर्ण केली. 200 किमी (31 ऑगस्ट 2022) नाशिक, येवला, वैजापूर, नाशिक असे पूर्ण केली. 400 किमीसाठी (17 सप्टेंबर 2022) नाशिक ते धुळे, शिरपुर, दभाषी असा मार्ग होता. 400 किमीचे अंतर पूर्ण करताना मुसळधार पावसाला सामोरे जावे लागले होते.
असा होता मार्ग
धुळे सायकलिस्ट आयोजित 600 किमी राईड, धुळे- टिकरी, इंदोर -धुळे -नाशिक -धुळे ( 15-16 ऑक्टोबर 2022) पूर्ण करून संजय बारकुंड यांनी सुपर रॅन्डोनिअर (एसआर) होण्याचा किताब मिळविला. भविष्यात 1000 किमी (NRM) व 1200 किमी (BRM) विहित वेळेपूर्वी पूर्ण करण्याचा मानस संजय बारकुंड यांनी व्यक्त केला.
"दररोज पहाटे सायकलिंग करीत असताना सायकलिस्टच्या माध्यमातून एका वर्षात चार टप्प्यांची स्पर्धा पूर्ण केल्याचे समाधान आहेच. येत्या काळात १००० आणि १२०० कि.मी.अंतराची सायकलिंग करण्याचाही मानस आहे. सायकलिंगमुळे शारीरिक सदृढता आणि मानसिक कणखरताही टिकून राहते." - संजय बारकुंड, पोलीस उपायुक्त, शहर गुन्हेशाखा, नाशिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.