नामपूर (जि. नाशिक) : शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला असून, अनेक शेतीपूरक योजनांचा शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने ऑनलाइन नोंदणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. (Determined to make farmers independent Online registration drive by Animal Husbandry Department Nashik News)
पशुसंवर्धन विभागाच्या विविध नावीन्यपूर्ण वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ११ जानेवारी २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. याचा लाभ घेण्यासाठी पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी जास्तीत जास्त अर्ज दाखल करावेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. चार वर्षांपासून ही मोहीम राबविली जात आहे. त्यासोबत आता जिल्हास्तरीय विविध योजनांसाठीही संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे.
एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर दर वर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नयेत, यासाठी शासनाने तयार केलेली प्रतीक्षा यादी २०२१-२२ पासून पुढील पाच वर्षे म्हणजे २०२५-२६ पर्यंत लागू ठेवण्याची सोय करण्यात आली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळू शकेल. त्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.
नावीन्यपूर्ण योजनांतर्गत दुधाळ गायी-म्हशींचे गटवाटप, शेळी-मेंढी गटवाटप, एक हजार मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य, शंभर कुक्कुट पिलांचे वाटप अशा विविध योजनांसाठी ऑनलाइन पद्धतीने निवडप्रक्रिया राबविली जाणार आहे. पशुपालकांना ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे, त्याची निवड करण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनांची संपूर्ण माहिती, तसेच अर्ज करण्याची पद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील संकेतस्थळावर, मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे.
अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरणे सुलभ असून, अर्जामधील माहिती कमीत कमी टाइप करावी लागेल. बहुतांश माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वतःच्या मोबाईलचा वापर करावा. अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येतील. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मोबाईल क्रमांक बदलू नये व गेल्या वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही.
अशी करा ऑनलाइन नोंदणी...
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ : https.//ah.mahabms.com व अँड्रॉईड मोबाईलमध्ये AH.MAHABMS अॅप्लिकेशन प्ले-स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १९६२ किंवा १८००२३३०४१८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
"पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपायुक्त कार्यालय, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा."-डॉ. विष्णू गर्जे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.