नाशिक : पांडव लेणीच्या पायथ्याशी असलेल्या चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारक व वॉटर पार्कचा पुनर्विकास रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर करण्याची मागणी पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली. शासनाने निधी मंजूर केल्यास स्मारकाच्या पुनर्वैभवात भर पडणार आहे. (Develop phalke memorial on lines of Ramoji Film City Guardian Ministers delegation to Tourism Minister Nashik)
महापालिका हद्दीतील पाथर्डी शिवारात सर्वे क्रमांक २८७ मध्ये महापालिकेने चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारक व वॉटर पार्कची निर्मिती केली आहे. महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यानुसार रिक्रियेशन सेंटरचे आरक्षण आहे.
जागा विकसित करण्यासाठी चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांचे स्मारक होण्याच्या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाची ११. ७५ हेक्टर जागा हस्तांतरित कली आहे. ९ एप्रिल १९९१ मध्ये महापालिकेकडे जागेचे हस्तांतर करण्यात आले आहे.
महापालिकेने चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकाचे बांधकाम करून पर्यटकांसाठी २००१ मध्ये खुले केले. त्याच जागेत नंतर वॉटर पार्कदेखील सुरू करण्यात आलेले आहे व सुमारे चार एकर जागेवर बुद्धविहार विकसित करण्यात आले.
उद्यान, संगीत कारंजा, ओपन थिएटर, संग्रहालय, जॉगिंग ट्रॅक विकसित केले. स्मारकाच्या एक-एक सेवेचे खासगीकरण झाल्यानंतर अवकळा प्राप्त झाली. सध्या स्मारकाची स्थिती पांढरा हत्ती पोसण्यासारखी झाली असून, खर्च परवडणारा नाही. त्याशिवाय वास्तू पुनर्विकासाला आली आहे.
त्यामुळे दादासाहेब फाळके स्मारक व वॉटर पार्कमध्ये रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर थीम पार्क, सायन्स सेंटर, वॉटर पार्कमध्ये नवीन उपकरणे बसविणे, अम्युझमेंट पार्क, अॅडव्हेंचर पार्क, फिल्मसिटी तयार करणे या कामांसाठी निधीची आवश्यकता आहे.
पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच चित्रपटनिर्मिती क्षेत्राला लाभ होईल व नाशिकचा लौकिक वाढण्यास मदत होणार आहे.
रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत विकसित करावे किंवा महापालिकेला विकसित करण्यासाठी निधी देण्याची मागणी पत्रात करण्यात आली आहे.
"चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकाचा कायापालट होण्यासाठी रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. निधी मिळाल्यास त्यातून करावयाच्या कामांमुळे नाशिकच्या वैभवात मोठी भर पडणार आहे."- दादा भुसे, पालकमंत्री.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.