नाशिक: प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या भूमीत संकल्प केल्यास तो यशस्वी होत असल्याचा अनुभव आहे. शत-प्रतिशतचा नारा भाजपने येथेच दिला होता, तो यशस्वी झाला.
भाजप (BJP) प्रथम क्रमांकावर पोचला. (devendra fadnavis statement about winning more seats in election nashik news)
आता श्रीरामाचे आशीर्वाद घेऊन महाविजयाचा मंत्र घेत दीडशे नव्हे, तर दोनशे जागा निवडून आणूच, असा दावा शनिवारी (ता. ११) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
नाशिकमध्ये भाजपच्या दोनदिवसीय पदाधिकारी बैठकीचा समारोप करताना ते बोलत होते. अर्धा तासाच्या घणाघाणी भाषणात त्यांनी पक्षाची आगामी भूमिका निश्चित करताना महाविकास आघाडीला गद्दारांची टोळी संबोधत टीका केली.
ते म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्राची अडीच वर्षे वाया गेली. राज्यातील सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची संधी वाया घालवली. मात्र स्वतःची घरं भरण्याच्या पलीकडे बघितलं गेले नाही. आता जनता सहा-सात महिन्यांतच परिवर्तन बघतेय. वाया गेलेल्या दिवसांची कसर भरून काढण्यासाठी २०२४ पर्यंत ट्वेन्टी-ट्वेन्टी मॅच खेळायची आहे.
पक्षात मिळालेल्या जबाबदारीचा उपयोग सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी करावा. आज एका विशेष परिस्थितीत आपले सरकार तयार झाले आहे. आता आपल्याला जनतेचा विचार करायचा आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी मला काय मिळणार? याचा विचार पुढच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत सोडून द्यावा. पुढील एक ते दीड वर्षे समर्पण दिल्यास महाविजय अभियान यशस्वी होईल.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
सत्तेतून गेलेले सरकार गद्दारांचं आहे. आपलं सरकार खुद्दारांचे आहे. हिंदुत्वासाठी हि खुद्दारी आहे. खुद्दारांना त्रास देण्याचे काम गद्दारांचं सरकार करत होते. लोकांच्या मतांशी गद्दारी करून, पाठीत खंजीर खुपशांचे सरकार स्थापन झाले होते. गद्दारांमधून सकारात्मक खुद्दार बाहेर पडले. आमचे सरकार कायदेशीर आहे.
भीतीमुळे बेकायदेशीर असल्याचा अपप्रचार केला जात आहे. जे दहा-पंधरा उरले आहेत. त्यांना थांबविण्यासाठी हा संदेश दिला जात आहे. परंतु सर्वोच्च न्यायालय आपल्याच बाजूने निर्णय देईल. विरोधकांकडून देशाच्या सर्वोच्च संस्था बदनाम केल्या जात आहेत.
आमचे सरकार कार्यकाळ पूर्ण करेलच; परंतु आता त्याच्यापेक्षा दीडपट जास्त जागांवर निवडून येऊ. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अडीच वर्षांत सांगू शकेल, असा एक तरी प्रकल्प दाखवावा. तीन पायांच्या रिक्षा सरकार कधी गडबडेल याची शंका होती. त्यामुळेच महाराष्ट्राने कधी पाहिला नाही इतका भ्रष्टाचार झाला. भ्रष्टाचारासोबत अनाचार, दुराचार होता.
कोणाच्या बापाला घाबरत नाही
भाजप कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस करून नेत्यांना तुरुंगात टाकायचा प्रयत्न झाला. आतापर्यंत मी बोललो नव्हतो. मी यांच्या बापालाही घाबरत नाही. परंतु बोलण्याची वेळ आणली. मला तुरुंगात टाकण्याची जबाबदारी एका नेत्याला दिली होती. ते तुरुंगात गेले; परंतु मी सत्तेत आलो. केवळ सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दहा हजार कोटी रुपयांची मदत दिली.
अडीच वर्षांत एकाही प्रकल्पाला सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली नाही. प्रकल्प ठप्प करण्याचे काम झाले. भाजप सरकार आल्याबरोबर अडवून ठेवलेल्या २४ हजार कोटींच्या १५ प्रकल्पांना मान्यता दिली. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी वळण बंधारे बांधून पश्चिमी वाहिन्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवत आहोत.
जलक्रांतीचा कार्यक्रम सरकारने हाती घेतला. कोल्हापूर, सांगलीला पूर येतो. ते पाणी महाराष्ट्र, कर्नाटक दोघांचा हिस्सा सोडल्याच्या व्यतिरिक्त पाणी आहे. जागतिक बॅंकेच्या मदतीने पुराचे पाणी वळण बंधाऱ्याच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागात वळविले जाणार आहे. एक लाख कोटीचा खर्च अपेक्षित आहे. समृद्धी महामार्गासाठी खर्च केलेले पन्नास हजार कोटी रुपये मॉनिटायझेशन करून उभे करून तोच पैसा प्रकल्पांसाठी लावू.
नाशिक-पुणे इकॉनॉमिक कॉरिडॉर
नागपूर-गोवा महामार्ग मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांचे चित्र बदलणारा आहे. येथे इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार होईल. पुण्याचा रिंग रोड, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमुळे नवीन इकॉनोमिक कॉरिडॉर तयार होईल.
शेतमालासाठी जलद कनेक्टिव्हिटी होईल. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करण्याचे काम होणार आहे. भविष्यात वन ट्रिलियनची इकॉनॉमी ही महाराष्ट्राची असेल. लातूरच्या कोच फॅक्टरीमध्ये ‘वंदे भारत’ ट्रेन तयार केली जाणार आहे. रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राला १३ हजार ५०० कोटी रुपये मिळाले. महाराष्ट्रात गरीब कल्याणाचा अजेंडा राबविला जाणार आहे.
विधान परिषदेचा पराभव जिव्हारी
विधान परिषदेच्या अमरावती जागेच्या पराभवाचा दाखला देताना श्री. फडणवीस यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. पक्षात नेत्यांमधील कार्यकर्ता मेला, तर पार्टी टिकू शकत नाही. त्यासाठी आपल्यातील कार्यकर्ता जिवंत ठेवा. डोक्यात हवा जाऊ देऊ नका; अन्यथा काँग्रेस होईल.
सातत्याने विजय मिळविण्यासाठी कार्यकर्ता टिकवा. पराभवामुळे मनात परिवर्तन येऊ देऊ नका. २०२४ च्या निवडणुकीत सोशल मीडिया महत्त्वाचा असेल. त्यामुळे दुर्लक्ष होऊ देऊ नका. सोशल मीडियावर निगेटिव्ही नरेटीव्ह तयार केले जात आहेत. त्यामुळे सोश मीडियावर ॲक्टिव्ह होण्याचे आवाहन श्री. फडणवीस यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.