Nashik News : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी पुन्हा देविदास पिंगळे तर उपसभापतीपदी उत्तम खांडबहाले यांची आज बिनविरोध निवड झाली. विरोधी चुंभळे गटाने अर्ज दाखल न केल्याने निवडणूक बिनविरोध झाली. (Devidas Pingle as Chairman and Uttam Khandbahale as Deputy Chairman of apmc nashik news)
त्यांनी सभापती, उपसभापती यांचे अभिनंदन केले. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. निवड होताच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
दरम्यान बाजार समितीच्या विकासासाठी प्रामाणिक काम करणार असून ३० वर्षात प्रामाणिक काम केल्यामुळे सभासदांनी आम्हाला पुन्हा संधी दिली असल्याचे पिंगळे म्हणाले. आता भ्रष्टाचारमुक्त कारभार करा असे स्पष्ट सांगत शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करू असे चुंभळे यांनी सांगितले.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा (रोहयो) उपजिल्हाधिकारी नितिनकुमार मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली, बिनविरोध निवड झाल्यानंतर विधानसभेचे उपाध्यक्ष, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर यांनी बाजार समितीत येत सभापती, उपसभापती व सर्व संचालकांचे अभिनंदन केले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया २८ एप्रिलला होऊन २९ ला निकाल जाहीर झाला. त्यानंतर सभापती व उपसभापतीपदाची निवडणूक तत्काळ घ्यावी अशी मागणी पिंगळे गटाच्या संचालकांनी केली होती. निवेदन देऊन चोविस तास उलटत नाही तोच पुन्हा सभापती व उपसभापतीपदाच्या निवडणुकीला राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने स्थगिती दिली.
त्यानंतर पुन्हा २४ तासातच निवडणूक प्रक्रिया तात्काळ राबवावी असे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे एक ना अनेक घडामोडींनी समिती कायम चर्चेत राहिली. अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर सुमारे १ महिन्यांनी सभापती, उपसभापती निवड प्रक्रिया पार पडली.
उपसभापतीपदासाठी विनायक माळेकर, भास्कर गावित, निर्मला कड, सविता तुंगार इच्छूक होते. मात्र महाविकास आघाडीला न्याय मिळावा याकरिता खांडबहाले यांचे नाव पुढे आले व त्यांची बिनविरोध निवड झाली.
माजी सभापती तथा संचालक शिवाजी चुंभळे, राजाराम धनवटे, संपत सकाळे, युवराज कोठुळे, तानाजी करंजकर, प्रल्हाद काकड, धनाजी पाटील, भास्कर गावित, निर्मला कड, विनायक माळेकर, जगन्नाथ कटाळे, कल्पना चुंभळे, सविता तुंगार आदीसह दोन्ही गटांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
"गेल्या तीस वर्षांपासून बाजार समितीत प्रामाणिकपणे काम करीत आहे. मात्र, या निवडणुकीत विरोधकांकडून प्रचंड त्रास देण्यात आला. निकाल लागून महिना होत आला तरी सभापती व उपसभापतींची निवड होऊ द्यायची नाही, असा विरोधकांनी प्रयत्न करीत न्यायालयात जाऊन निवड थांबविण्याचा प्रयत्न झाला. अखेर आमच्या बाजूने निकाल लागला." - देविदास पिंगळे, सभापती, नाशिक बाजार समिती.
"मी सभापती असताना बाजार समितीवर असलेले कर्ज भरले व समितीला नफ्यात आणले. आता विरोधात राहून भ्रष्टाचारमुक्त बाजार समिती ठेवण्याचा आणि सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल." - शिवाजी चुंभळे, माजी सभापती
"नाशिक बाजार समिती ही नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ असे तीन तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेली समिती असून शेतकऱ्यांच्या आस्थेचे ठिकाण आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकरींसाठी सर्व नवीन पदाधिकारी एकदिलाने काम करुन बाजार समितीची उन्नती साधतील असा विश्वास आहे." - नरहरी झिरवाळ, विधानसभा उपाध्यक्ष
पिंगळेंचा विक्रमी षटकार
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर बाजी मारत अखेर देवीदास पिंगळे हे सभापतीपदी विराजमान झाले. विशेष म्हणजे पिंगळे यांनी सहाव्यांदा सभापती होण्याचा मान मिळविला असून, एकाच बाजार समितीत सहा वेळा सभापती होण्याचा विक्रमही राज्यात त्यांच्याच नावावर कोरला गेला आहे.
पिंगळे यांनी पहिल्यांदा १९९२-९३ मध्ये सभापतीपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर सन १९९५-१९९८, २०००-२००३, २००३-२०१७, २०२०-२०२२, २०२३-२०२८ या प्रमाणे सभापतीपदाची सूत्रे हाताळली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.