"मोबाईलच्या युगात वाचन संस्कृती लोप पावतांना दिसते. वाचन ही माणसाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. आज समाजातील कोणत्याही यशस्वी व्यक्तीचे उदाहरण घ्या पुस्तकामुळे आयुष्य घडल्याचे ते आवर्जून सांगतात. तंत्रज्ञान अवश्य स्वीकारावे पण त्याचे प्रमाण निश्चित असावे.
आजची पिढी तुम्ही वाचन का करीत नाही, असे विचारले असता वेळ मिळत नाही असे सांगते. तेव्हा मला असे वाटते की मोबाईलचा वापर कमी केला तर वाचनाला वेळही मिळेल आणि ज्ञानातही भर पडेल.
वाचनासाठी दिलेला वेळ तुमच्या प्रगतीसाठीच उपयोगी ठरेल, असे मत खाद्य संस्कृतीतून वाचन चळवळ राबविणाऱ्या भीमाबाई (आजी) जोंधळे यांनी व्यक्त केले." - निखिलकुमार रोकडे
(devoted to reading only useful for your progress Bhimabai Jondhale hotel relax interview nashik news)
१) पुस्तकांचे हॉटेल ही संकल्पना कशी सुचली?
भीमाबाई जोंधळे : दहावा मैल ओझर येथे रिलॅक्स कॉर्नर हे आमचे हॉटेल आहे. हॉटेलमध्ये आलेले ग्राहक मोबाईलमध्ये गुंतून राहत असत, ही गोष्ट मनाला पटणारी नव्हती. माझ्या मुलाकडे जो पुस्तकाचा संग्रह होता. त्याला सांगून पुस्तकाचे स्टॅन्ड बनवून घेतले आणि मेन्यूकार्ड ऐवजी पुस्तके प्रत्येक टेबलवर ठेवली.
त्यामुळे आलेले ग्राहक जेवणाची ऑर्डर येईपर्यंत टेबलवरील पुस्तकांची किमान एक-दोन पाने वाचू लागली आणि त्यातूनच पुस्तकांच्या हॉटेलची संकल्पना पुढे आली.
मग ही वाचन चळवळ पुढे नेण्यासाठी बुकस्टँड, शेल्फ बनवून घेतले. माझ्या मुलाची चोवीस वर्षापासून पेपर एजन्सी आहे. मी रोज पहाटे पेपरच्या पुरवण्या लावते. त्यामुळे माझ्या दिवसाची सुरवात पेपर वाचनानेच होते.
२) उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाविषयी सांगा.
भीमाबाई जोंधळे : सुरवातीला टेबलवर ठेवलेल्या पुस्तकांविषयी ग्राहकांनी ही विक्रीसाठी आहेत काय अशी चौकशी केली तेव्हा ही पुस्तके तुम्ही विकतच घेतली पाहिजेत, असे नाही वाचनासाठीही उपलब्ध आहेत असे ग्राहकांना सांगितल्यामुळे या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. काही पुस्तकांपासून सुरू केलेली सुरवात आज हजारो पुस्तकांपर्यंत पोहोचली आहे.
हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांमार्फत माझ्या या अभिनव उपक्रमाची माहिती सोशल मीडियावर अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाली. त्यानंतर अनेक प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून राज्यभर व देशभर मला ओळख प्राप्त झाली.
अनेक प्रतिष्ठित मान्यवर सर्वच क्षेत्रातील यांनीही कुतूहलापोटी आमच्या हॉटेलला भेट दिली. प्रसारमाध्यमांनीही माझ्या छोट्याशा कामाची दखल घेतली. आतापर्यंत अनेक वेळा शासन विविध संस्थांतर्फे मला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
३) हॉटेलमध्ये अजून पुस्तकांव्यतिरिक्त अजून काय आहे?
भीमाबाई जोंधळे : माझा मुलगा प्रवीण जोंधळे हा सुद्धा लेखक व कवी आहे. महाराष्ट्रातील नामवंत कवींच्या कविता चित्रकार विष्णू थोरे यांच्याकडून बनवून घेतल्या. अक्षरचित्र स्वरूपातील कविता पोस्टर स्वरूपात इथे फ्रेम करून लावलेल्या आहेत. आगळी वेगळी महाराष्ट्राची‘कवितेची भिंत’इथे साकारली आहे.
हॉटेलमध्ये परराज्यातील ग्राहक येतात त्यांना नाशिकची विविधता दर्शविण्यासाठी काही निवडक तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळे आणि महत्त्वपूर्ण ठिकाणांची छायाचित्र मिळवून नाशिक दर्शन साकारले आहे. वाचनाची गोडी लागावी म्हणून हॉटेलच्या परिसरात असलेल्या झाडांखाली पुस्तके वाचायला ठेवली आहेत. (Marathi Tajya Batmya)
४)हॉटेलच्या माध्यमातून राबविलेले उपक्रम सांगा?
भीमाबाई जोंधळे : नोटबंदीच्या काळात सगळीकडे पैशांची चणचण असताना प्रवाशांसाठी ‘जेवण करा आणि जमेल तेव्हा पैसे द्या’ असे सांगत ग्राहकांकडून पैसे न घेता जेवण दिले. परप्रांतीय कामगार घराच्या ओढीने महामार्गावरून जात असताना त्यांचे प्रचंड हाल होत होते. तेव्हा त्यांच्यासाठी अन्नदान सुरू केले.
हॉटेलमधील हजारोंचा माल आणि पाणीबॉक्स मोफत वाटले. पुस्तक माणसाचा चांगला मित्र असतो या हेतूने विविध हॉस्पिटल मधील रुग्णांना, अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ग्राहकांना, हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये साजरे होणारे वाढदिवस व समारंभ या निमित्त पुस्तक भेट देऊन वाचन संस्कृती रुजविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे.(Latest Marathi News)
५) तुमच्या हॉटेलचे वेगळेपण काय आहे?
भीमाबाई जोंधळे : हॉटेलमध्ये आल्यानंतर काही घेतलेच पाहिजे असा आग्रह नाही पण जेवढ्या वेळ बसाल किमान तेवढ्या वेळेतील काही काळ तरी पुस्तक वाचावे असे आवाहन मी करते.
हॉटेलमध्ये आल्यावर जेवणाचा मनसोक्त आनंद घेता घेता पुस्तकाच्या दुनियेची सफर करू शकता.अनोख्या वाचनालयात आल्याचा अनुभव तुम्हाला मिळेल. येथे तुम्हाला वाचण्यासाठी अनेक दुर्मिळ पुस्तकांचा ठेवा उपलब्ध आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.