Chirai Mata Mandir : चिराई (ता. बागलाण) येथील नाशिक - धुळे जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या शिवकालीन जागृत देवस्थान अर्धनटेश्वरी महालक्ष्मी मंदिर खानदेशातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. भाविकांच्या देणगीतून मंदिराचे रूप पालटले असले तरी बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांना येथे कोणत्याही सुविधा उपलब्ध नाही.
त्यामुळे चिराईमाता मंदिरास शासनाने पर्यटनस्थळाचा दर्जा देऊन नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या चिराई घाटातील मंदिर परिसराचा सर्वांगिण विकास घडवावा, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. सध्या नवरात्रोत्सवामुळे भाविकांची गर्दी सुरू असून खानदेश व कसमादेतून मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शन घेत आहेत. (devotee demand Chirai Mata temple area should get status of tourist spot nashik news)
मंदिरात अहोरात्र धार्मिक कार्यक्रमांचा जागर सुरू असल्याचे मंदिर व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. चिराई येथील ग्राममंडळाच्या माध्यमातून मंदिराचा सर्वांगिण विकास होत आहे. 'चिराई माता' म्हणूनही येथील महालक्ष्मी मातेचा उल्लेख केला जातो. लोकप्रतिनिधीनी याकामी लक्ष घालून मंदिरास पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन मंदिर परिसराचा विकास करावा, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.
चिराई गावापासून सुमारे दोन किलोमीटरवर असलेल्या घाटात अर्धनटेश्वरी महालक्ष्मी मातेचे अतिशय छोटेस शिवकालीन मंदीर होते. कसमादे पट्टयासह खानदेशातील सुमारे २१ कुळाचे कुलदैवत म्हणून येथील मंदिराचा उल्लेख केला जातो. विवाहसोहळ्यानंतर तसेच नवसपूर्तीसाठी नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात राज्यातील भाविक मोठ्या संख्येने येथे हजेरी लावतात.
सुरुवातीला नामपूर येथील निवृत्त पोलिस दगा बच्छाव यांनी चिराईमाता मंदिराचा जिर्णोद्धार केला. त्यानंतर भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे मंदिराचा सर्वांगिण विकास घडवून आणण्यासाठी चिराई येथील ग्रामस्थांच्या पुढाकारातून ग्राममंडळ स्थापन करण्यात आले. शासनाची कोणतीही मदत न घेता भाविकांच्या देणगीतून चिराई घाटात २००५ मध्ये सुमारे बावीस लाख रुपये खर्चून देवीचे आकर्षक मंदिर उभारण्यात आले आहे.
सध्या मंदिर परिसरात संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. चैत्र महिन्यात अष्टमी व नवरात्र काळात भाविकांच्या गर्दीने मंदिर गजबजलेले असते. महालक्ष्मी मंदिराच्या समोर असलेल्या प्राचीन दुर्गामाता मंदिराचाही सुमारे चार लाख रुपयांच्या विनियोगातून नुकताच जिर्णोद्धार करण्यात आला आहे. चिराई माता मंदिराजवळ अहिल्याबाई होळकर यांच्या काळात फक्त दगडात बांधलेल्या चिरीविहीर आकर्षक मंदिर आहे.
बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांच्या कार्यकाळात तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत सभामंडपासाठी सुमारे १० लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला होता. परंतु वन विभागाच्या हरकतीमुळे मंदिराजवळील काम बंद पडले.
त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते कारभारी अहिरे यांनी पाच गुंठे जागा मंदिर व्यवस्थापनाला दान दिल्यानंतर सभामंडपाला मूर्त स्वरुप मिळाले. बागलाणचे माजी आमदार उमाजी बोरसे यांच्या कार्यकाळात चिराई घाटाचे रुंदीकरण व विस्तारीकरण झाल्याने येथील वाहतूक सुखकर झाली आहे.
भाविकांची तहान भागविण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाने बोअरवेल खोदल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. परिसरातील गावांची तहान भागविण्यासाठीही बोअरवेल उपयुक्त ठरली आहे. मंदिर परिसरात भाविकांसाठी माफक दरात विवाहसोहळे यांची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्राममंडळाच्या २१ संचालकांच्या माध्यमातून मंदिराचे व्यवस्थापन केले जाते. भिवसन सोनवणे, रमेश सोनवणे हे पुजारी म्हणून काम पाहत आहेत.
"नैसर्गिक सौंदर्याने नटलेला चिराई माता मंदिराचा परिसर वनविभागाच्या हद्दीत येत असल्याने मंदिर परिसरात विकासकामांना खिळ बसली आहे. वन विभागाच्या भूमिकेमुळे जागेअभावी भाविकांसाठी राहण्याची व्यवस्था, महिला प्रसाधनगृह, पिकअप शेड आदी कामे प्रलंबित आहेत. लोकप्रतिनिधी यांनी याकामी पुढाकार घेऊन केंद्र, राज्य पातळीवर पाठपुरावा करुन मंदिर व्यवस्थापनास जागा उपलब्ध करून द्यावी." - डॉ. सी. एन. पाटील,ज्येष्ठ नेते भाजपनेते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.