पोलीसदादा अक्षर सुधारा! नाशिककरांची वेगळीच डोकेदुखी

police
policeesakal
Updated on

सिडको (नाशिक) : पोलिस मॅन्युअलनुसार (police) पोलिस ठाण्यातील रेकार्ड सुटसुटीत आणि अनेक वर्षांनंतरही लागले तरी ते सुस्पष्ट असावेत, असा दंडक आहे. ब्रिटिशांनी घालून दिलेल्या या नियमांमागे खूप गर्भित मतितार्थ आहे. मात्र कालौघात त्याकडे फारसे कुणी गांभीर्याने पाहत नाही, अशी स्थिती आहे. कोणत्याही गुन्ह्यातील अंत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे प्राथमिक माहिती अहवाल अर्थात, एफआयआर..(FIR) पण सध्या तो इतक्या अगम्य भाषेत आणि लिहिणारे ते नेमके कोणत्या उद्देशाने लिहितात हा एक संशोधनाचा भाग ठरावा. ‘एफआयआर’मध्ये नेमके काय लिहिले आहे, हे समजून घेण्यासाठी तक्रारदाराला पुन्हा ठाणे अमलदाराचेच पाय धरावे लागतात. ही पद्धत बदलून काळानुसार ‘एफआयआर’ संगणकीकृत असावा, यासाठी पोलिस मॅन्युअलमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे.

चांगले अक्षर असलेले नसतात का ?

बहुतांश पोलिस ठाण्यांमधील ठाणे अमलदारांचे हस्ताक्षर म्हणजे मोडी लिपीलाही लाजविणारे असते. इतकी महत्त्वाची कागदपत्रे लिहिण्यासाठी नेमक्या अशाच माणसाची निवड का होते, हेही सर्वसामान्यांना न उलगडणारे कोडे आहे. अतिशय गचाड आणि क्लिष्ट भाषेतील हे गुंतागुंत वाढविणारे अक्षर पाहिले, की तक्रारदाराला भोवळच यावी. आपण जे सांगितले तेच नेमके लिहिले आहे ना, याची तक्रारदाराला खात्रीच पटू नये इतकी या ‘एफआयआर’वरील मजकुराचा गोंधळ असतो. खाकी वर्दीतल्या कुणालाही त्याचे सोयरसुतक नसते. आपले अक्षर किमान समजण्यासारखे असावे, असेही त्यांना वाटत नाही. अशीच काहीशी स्थिती सध्या अंबडसह विविध पोलिस ठाण्यात दिसून येते. पोलिस आयुक्तांनी याची दखल घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी बाळगली, तर त्यात गैर काहीच नाही, अशी प्रतिक्रिया एका तक्रारदाराने व्यक्त केली.

फक्त वकिलाला ते कळते

‘एफआयआर’वरील अगम्य अक्षराबाबतीत काही डॉक्टरांनंतर कुणाचा कोणाचा नंबर लागत असेल, तर तो म्हणजे ठाणे अमलदार, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. डॉक्टरांचे अक्षर जसे मेडिकलवाल्यांना समजते तसेच ठाणे अमलदाराचे अक्षर वकिलाकडूनच समजून घ्यावे लागते, एवढे मात्र खरे. काही जणांना तर ‘एफआयआर’मध्ये ठाणे अमलदाराने नेमके काय लिहिले व कोणते कलम लावले आहे, हे अजिबातच उमगत नाही. कधी कधी आपण जे सांगितले, ते तर लिहिलेलेच दिसत नाही. त्यामुळे पुन्हा पोलिस ठाण्याची पायरी चढावी लागते. कार्बन कॉपी असल्याने हा गुन्हा दखलपात्र आहे की अदखलपात्र, हेसुद्धा सांगण्याचे कष्ट तेथील ठाणे अमलदार घेत नाही. पहिल्यांदाच पोलिस ठाण्याची पायरी चढणाऱ्या तक्रारदाराला मात्र गुन्हा दाखल झाल्याचे तेवढे समाधान लाभते.

police
नाशिक जिल्‍ह्यात दिवसभरात आढळले १४४ कोरोना बाधित

पोलिस आयुक्त दखल घेतील?

एकविसावे शतक म्हणजे संगणकाचे युग म्हटले जाते, यामध्ये जसे डॉक्टर सध्या संगणकाद्वारे प्रिंट काढून समजेल अशा भाषेत प्रिस्क्रिप्शन लिहून देतात. त्याचप्रमाणे पोलिस आयुक्तांनीदेखील ठाणे अमलदाराना योग्य ते संगणक प्रशिक्षण घेऊन कार्बन कॉपीऐवजी संगणकाद्वारे एफआयआरची कॉपी तक्रारदार व फिर्यादीला देण्याची पद्धत सुरू करावी, जेणेकरून त्यातील मजकूर प्रमाण भाषेत असेल अशी तक्रारदार व फिर्यादींची अपेक्षा आहे. पोलिस आयुक्त दीपक पांडे याची दखल घेतील, अशी अपेक्षा आहे.

police
नाशिक शहरातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.