नाशिक : श्रावण मासापासून सर्वत्र धार्मिक-आध्यात्मिक वातावरणाची निर्मिती झालीय. साधनेचा एक भाग म्हणून भाविक उपवास करताहेत. आहारातील बदलांचा शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. पण मानसिक आरोग्याचे काय?
सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे वाढलेल्या मानसिक व्याधी लक्षात घेता त्यावर डिजिटल उपवासाची (डिजिटल डिटॉक्सिंगची) मात्रा दिली जातेय. ही प्रक्रिया मानसिक आजारांवरील औषधोपचारासोबत उपचाराचा भाग बनली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. (Digital Detoxing Need freedom from mobile to Digital fasting Nashik Latest Marathi News)
वेगवेगळ्या व्यसनांप्रमाणेच सोशल मीडियाचा अतिवापर हे व्यसन म्हणून मानसशास्त्रामध्ये संबोधले जात आहे. विशेषतः किशोरवयीनांमध्ये सोशल मीडियाचे दुष्परिणाम आढळत आहेत. विविध वयोगटांतील व्यक्तींमध्ये मानसिक आजारांचे कारण ठरत आहे. या दुष्परिणामांवर उपचार म्हणून मानसोपचारतज्ज्ञांकडून औषधोपचारासोबत डिजिटल उपवास करायला सांगितला जातो.
असे आहेत दुष्परिणाम
सोशल मीडियाच्या दुष्परिणामांचा विचार केल्यास मधुमेह, हृदयरोगासारख्या शारीरिक व्याधी जडू शकतात. मोबाईलच्या अतिवापरामुळे मान व मणक्याचे विकार जडतात. प्रत्यक्षात संवाद कमी झाल्याने ताणतणाव, एकलकोंडेपणा, चिडचिड होणे, ‘एन्झायटी’ यांसारखे मानसिक आजार होण्याची शक्यता असते. नातेसंबंधांमधील संवाद हरवल्याने दुरावा निर्माण होण्यासह कौटुंबिक कलह वाढू शकतात. किशोरवयीनांमध्ये चुकीच्या मार्गाला जाण्याची भीती असते.
५० टक्क्यांनी डिजिटल डिटॉक्सिंगची गरज
‘डिजिटल डिटॉक्स' विषयावर आधारित मानसोपचारतज्ज्ञांच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर शोधप्रबंध सादर होऊ लागले आहेत. जाणकारांच्या अंदाजानुसार मानसिक आजाराने त्रस्त शंभर व्यक्तींमध्ये किमान निम्म्या व्यक्तींना ‘डिडिटल डिटॉक्सिंग’ची आवश्यकता भासते. त्यानुसार मानसोपचारतज्ज्ञांकडून प्रिस्क्रिप्शन’सोबत साधारणतः दहापैकी पाच रुग्णांना डिजिटल उपवासाचा सल्ला देतात. त्यामध्ये किशोरवयीन मुले-मुली व तरुणाईच प्रमाण निम्म्याहून अधिक असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांच्या निदर्शनास आले आहे.
असा केला जातो डिजिटल उपवास
- वर्षातील काही कालावधी सोशल नेटवर्किंग ॲप अनइन्स्टॉल करत तंत्रज्ञानाचा मर्यादित वापर ठेवला जातो
- घरात काही तास ‘नो मोबाईल अवर्स’ निश्चित करत या वेळी सदस्यांकडून मोबाईल, टीव्हीचा वापर सक्तीने टाळले जातो
- आप्तस्वकीय, मित्रमंडळीला प्रत्यक्ष भेटत संवाद साधण्यावर देण्यात येतो
- कामाच्या ठिकाणी मर्यादित वापर राहील, याची घेतली जाते काळजी
- आधुनिक फोनमधील फिचर्सचा वापर करत ॲप्स वापरावर वेळमर्यादा निश्चित करत ठेवण्यात येते नियंत्रण
- ‘गेमिंग'ची आवड असलेल्यांकडून शारीरिक व्यायामांवर देण्यात येतो भर
- मोबाईलमध्ये तासनतास व्हिडिओज बघण्यापेक्षा महिन्यातून एकद्यावेळी चित्रपट, नाटक बघत होते मनोरंजन
- सात वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांना सक्तीने मोबाईल देणे टाळले जाते
- सतरा वर्षापर्यंतच्या मुलांचे सोशल मीडियावर ठेवले जात नाही अकाउंट
- मुलांना उपदेश देताना पालकांमध्ये तंत्रज्ञान वापराचा ठेवला जातो अंकुश
‘अति सर्वत्र वर्जयेत’
शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम ।।
शरीर हे धर्मसाधनेचे आद्य साधन आहे...
योगारुढ व्यक्ती आपल्या इंद्रियांवर पर्यायाने मनावर ताबा मिळवते. त्याची सुरवातही अर्थात ते मन ज्या शरीरात वास करते ते शरीर संयमन करून होते. भगवान श्रीकृष्ण सांगतात, की अर्जुना हा योग साध्य करण्यासाठी संयमनाची आवश्यकता आहे. जे व्यक्तीच्या सर्व शरीर क्रियांमध्ये प्रथम हवे, कारण
युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ।
दुःखाचा नाश करणारा योग यथायोग्य आहार-विहार करणाऱ्याला, कर्मांमध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला आणि यथायोग्य निद्रा-जागरण करणाऱ्याला साध्य होतो. ‘अति सर्वत्र वर्जयेत’ असे एक संस्कृत वचन आहे. श्रीकृष्णालाही हेच सांगायचे आहे. शरीर संयमन करणे म्हणजे शारीरिक क्रियातील अतिला दूर सारणे. आहार-अनाहार, निद्रा-जागरण यांसारख्या क्रिया संतुलित केल्याने शरीर निरोगी आणि उत्साही राहते. असे शरीर मग मन एकाग्र करण्याची साधना करू शकते.
"'सिटिंग इज द न्यू स्मोकिंग' अशी सध्याची स्थिती असून, शारीरिक हालचाली न करता एकाच ठिकाणी तासनतास बसून राहणे धूम्रपानाइतके घातक बनले आहे. त्यातून शारीरिक, मानसिक व्याधींचे प्रमाण वाढले आहे. उपचाराचा भाग म्हणून डिजिटल उपवासाचा सल्ला रुग्णांना दिला जातो. सोशल मीडियाच्या व्यसनातून मानसिक आजार जडण्यापूर्वी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने तंत्रज्ञानाचा गरजेपुरता वापर करायला हवा."
-डॉ. हेमंत सोननीस (मानसोपचारतज्ज्ञ)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.