Nashik News : मखमलाबाद येथील नववसाहत व कॉलनी परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून महावितरण कंपनीकडून जणू अघोषित भारनियमन सुरू केले आहे.
साधारण पंधरा दिवसांपासून शांतिनगर, पार्थ कॉलनी, उदयनगर, एलआयसी कॉलनी, रामकृष्णनगर यासह इतर परिसरात रात्री, अपरात्री अर्धा तासाहून अधिक वेळ अचानक वीज जात असते. (Dissatisfaction among residents due to Unannounced load shedding in Makhmalabad area nashik news)
त्यात आता गेल्या तीन ते चार दिवसांपासून पहाटे जो वीजपुरवठा खंडित केला जातो तो सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान पूर्ववत केला जात आहे. त्यामुळे परिसरातील रहिवासी व व्यावसायिकांमध्ये वीज वितरण कंपनीच्या या गलथान कारभाराविषयी असंतोष पसरला आहे.
मखमलाबाद येथे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी मखमलाबाद येथील वीजपुरवठा करणाऱ्या सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाला असून अजून दोन ते तीन दिवस वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी लागणार असल्याचे सांगितले आहे. मखमलाबाद परिसरात अनेक भागात अजूनही शेती केली जाते.
तर नव्याने विकसित झालेल्या परिसरात शहरातील विविध भागातील नोकरदार वर्ग स्थलांतरित होऊन स्थायिक झाला आहे. या भागात अचानक जो विजेचा लपंडाव गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे शेतकरी व नोकरदार वर्ग यांच्यात वीज वितरण कंपनीबद्दल असंतोष पसरला आहे.
शेतातील पिकाला पाणी देण्याची तसेच शाळेत व नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांची सकाळी सुरू असलेल्या धावपळीत अचानक वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तासनतास वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे व्यावसायिकांचेदेखील मोठे नुकसान होत आहे. ड्यूटीवर जाणाऱ्यांपैकी काहींना अक्षरश जेवणाचा डब्बादेखील मिळाला नाही तर काहींना स्नानाविना जावे लागले आहे.
विशेष म्हणजे रात्रभर मोबाईल चार्जिंगला न लावता सकाळी उठल्यावर मोबाईल चार्जिंगला लावणाऱ्यांचीदेखील मोठी फजिती झाली असून अनेक महत्त्वाचे काम रेंगाळले. अशीच परिस्थिती अजून दोन ते तीन दिवस असणार असल्याने नागरिकांनी वीजपुरवठा असताना सर्व कामे करून घ्यावे, असे महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
दुरुस्ती काम युद्धपातळीवर
मखमलाबाद सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाला असून, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दिवसभर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पंचवटी, म्हसरूळ, गिरणारे आदी सबस्टेशनमध्ये वीजपुरवठा वळविण्यात आला आहे.
मोबाईलवर येणारे वीजपुरवठा खंडितचे मेसेज बंद असल्याने नागरिकांना नेमका वीजपुरवठा का आणि किती वेळासाठी खंडित झाला आहे, हे समजत नाही. तसेच दररोज वापरासाठी लागणारे पाणी मोटारीच्या मदतीने गच्चीवरील टाकीत भरले जात नसल्याने महिलांची अडचण होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.