Nashik News: यंदा अल्प पर्जन्यमानामुळे जलस्त्रोताची पाणीपातळी घटते आहे. शेतीची भिस्त धरणातील पाण्यावर आहे. आवर्तन सुटल्यानंतर कालव्या व वितरण नलिकांच्या देखभाल दुरुस्तीअभावी पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होते.
ही गळीत रोखण्यासाठी पालखेड उजव्या कालव्याच्या वितरण नलिका पाइपच्या सहाय्याने बंदिस्त करून शेवटच्या लाभार्थी शेतकऱ्याच्या शेतात पूर्णक्षमतेने पाणी पोचविण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे.
पालखेड उजवा कालव्याचे अधिकारी व पाणीवापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर बंदिस्त नलिकेबाबत सविस्तर चर्चा झाली. जैन इरिगेशनच्या माध्यमातून पाहणी करून खर्चाचे अंदाजपत्रक बनविण्याचे काम हाती घेतले आहे. (Distribution pipe of Palkhed right canal will be closed nashik news)
पालखेड धरणाचा उजवा कालवा निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. साकोरे मिग ते रसलपूर, असा उजवा कालवा विविध गावांतील शेतीशिवार ओलेचिंब करून प्रवाहित होतो. १३ पाणीवापर संस्था या कालव्यावर आहेत. खरीप व रब्बी हंगामासाठी प्रत्येकी तीन रोटेशन दिले जाते.
पण यंदा धरणातील जलसाठा कमी असल्याने आवर्तनाला कात्री लावली जाऊ शकते. त्यातच उजव्या कालव्याला गळतीची मोठी समस्या आहे. ५४ क्यूसेकने सोडले जाणारे पाणी रसलपूरला अखेरच्या टोकापर्यंत पोचताना ३८ ते ४० क्यूसेक दाबाने पोचते. एवढी मोठी पाण्याची गळती होत असते. वितरण नलिका (पोटचाऱ्या)ची स्थिती तर त्याहून अधिक गंभीर आहे. कालवा व नलिकांची गळीत रोखण्यासाठी अधिकारी व पाणीवापर संस्थांचे पदाधिकारी सरसावले आहेत.
साकोरे मिग येथे स्व. रावसाहेब कदम पाणीवापर संस्थेच्या बंद नलिका प्रवाहित करण्याबाबत पाहणी झाली. या वेळी कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे, उपकार्यकारी अभियंता डावरे, शाखा अभियंता भूपेंद्र पवार यांसह पाणीवापर महासंघाचे अध्यक्ष शंकरराव गायखे, उपाध्यक्ष मोतीराम झाल्टे, दिलीप बोरस्ते, विलास बोरस्ते, शिवाजी माळोदे यांच्यात नलिकांची गळीत रोखण्याबाबत दीर्घकाळ चर्चा झाली.
त्यात वितरण नलिका प्लास्टिक पाइपच्या सहाय्याने बंदिस्त करून शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करण्याचा मुद्दा चर्चेत आला. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. त्यासाठी नामांकित कंपनीकडून सर्वेक्षण करून खर्चाचे अंदाजपत्रक बनविण्यात येणार आहे. खर्च आवाक्यातील असले तर तो करण्याबाबत पाणीवापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी तयारी दाखविली आहे. अन्यथा शासनस्तरावरून मदतीसाठी प्रयत्न करण्याचा निर्णय झाला. चर्चेनंतर नामांकित कंपनीच्या प्रतिनिधीला पाचारण करून सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे.
"सध्या जलस्रोत आटले आहेत. पालखेड धरणात पुढील सहा महिने पुरेल एवढा जलसाठा नाही. कालवा व वितरण नलिकेची गळती न रोखल्यास शेतीला पाणी मिळणे मुश्कील होईल. भविष्यातील हा धोका रोखण्यासाठी वितरण नलिका बंदिस्त करण्याबाबत पालखेड उजवा कालव्याचे अधिकारी व पाणीवापर संस्थांचे पदाधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली." - विलास बोरस्ते, अध्यक्ष, स्व. रावसाहेब कदम पाणीवापर संस्था, साकोरे मिग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.