"शासकीय कर्मचाऱ्यांची आर्थिक वाहिनी असलेल्या जिल्हा सरकारी व परिषद बॅंकेच्या निवडणुकीतील निकालातून २७ वर्षांपासून सत्तेत असलेल्या समता पॅनलच्या एकाधिकारशाहीला सभासदांनी झिडकारले असून, विरोधकांना सत्तेची संधी दिली आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नाकारण्यात आलेला मतदानाचा अधिकार, सत्ताधाऱ्यांविरोधात असलेला रोष अन् जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेतील विजयाचे वातावरण कायम ठेवण्यात सहकार पॅनल यशस्वी झाला. तर, जुन्या तसेच नवीन चेहऱ्यांचा मेळ घालत उत्तमबाबा गांगुर्डे, रवींद्र आंधळे, विक्रम पिंगळे, प्रमोद निरगुडे यासारख्यांनी पॅनलची केलेली बांधणी सहकारला विजयापर्यंत घेऊन गेली. वर्षोनुवर्षे ठराविक बाह्यकेंद्र असलेल्या कंपूच्या हाती असणारी बॅंकेची सूत्रे, आरोग्य, बांधकाम विभागात उमेदवार न मिळणे तसेच पॅनल नेते भाऊसाहेब खताळे, रमेश राख यांचा फाजील आत्मविश्वास अन यातच सर्वाधिक मतदान असलेल्या जिल्हा परिषदेतील विजयकुमार हळदे यांच्यावरील कर्मचाऱ्यांची नाराजी समता पॅनलला भोवली अन त्यांना २७ वर्षांची सत्तेतून पायउतार व्हावे लागले." -विकास गामणे
(District Government and Council Bank Election Analysis nashik)
बॅंकेत सर्व शासकीय कार्यालयांमधील सभासद आहेत. यात, सर्वाधिक सभासद जिल्हा परिषदेतील असल्याने हेच सभासद निर्णायक भूमिका बजावत असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे.
काही महिन्यांपूर्वी याच जिल्हा परिषदेतील कर्मचारी पतसंस्थेची निवडणुकीत समताचे नेते विजयकुमार हळदे यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी एकजूट होत त्यांना धुळ चारली होती. या विजयापासूनच खऱ्या अर्थाने सहकार पॅनलने बॅंकेच्या निवडणुकीची बीजे रोवली.
हळदे विरोधकांचा फायदा उचलत सहकारने विरोधकांना एकजूट केले. यात, सत्ताधारी समतांच्या नाराजांनाही खेचण्यात ते यशस्वी झाले.
उत्तमबाबा गांगुर्डे, रवींद्र थेटे, महेश आव्हाड, दिलीप थेटे, दिलीप सलादे या सारख्या जुन्यां-जाणत्यांना सोबत घेऊन पाच वर्षे विरोधात असलेले, सत्ताधार्यांऱ्यांविरोधातील नाराज तसेच नवख्यांची रवींद्र आंधळे, प्रमोद निरगुडे, विक्रम पिंगळे या सारख्यांनी वज्रमुठ बांधली.
यामुळेच सहकारकडे उमेदवारीसाठी मोठी भाऊगर्दी झाली. यातही नाराजांची समजूत काढत प्रचारात सत्ताधार्यांविरोधात सहकारने जोरदार लढा दिला. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेण्यात सहकार पॅनेल नेत्यांचा वाटा असल्याचा प्रचार करत समता पॅनलने रान उठविले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मात्र, याकडे सुज्ञ सभासदांनी दुर्लक्ष करत त्यांच्या पदरात मताचा जोगवा टाकला. याउलट सत्ताधारी समता पॅनल सुरवातीपासून फाजील आत्मविश्वासात राहिले. आपल्यासोबत असणारे १२ संचालक सोडून गेले यांची समजूत न घालता त्यांना जाऊ देण्यात आले.
सत्ताधारी असल्याने उमेदवारीसाठी गर्दी असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. वास्तविक, अनेक कार्यालयांमध्ये समता ला उमेदवार देखील मिळाले नाहीत. आरोग्य सारख्या महत्त्वाच्या केडरमधून निश्चित झालेले उमेदवारांनी ऐनवेळी नकार दिला.
जिल्हा परिषदेत हळदे विरोधात वातावरण असतानाही समता पॅनलने याकडे दुर्लक्ष केले. यात हळदे यांना उमेदवारी देत रोषात भर घातली. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मतदानाचा अधिकार आहे, विरोधकांकडे चेहरा नाही, आपल्याशिवाय कोणी नाही या अति आत्मविश्वासात खताळे व राख मश्गूल राहिले.
यातून सभासदांमध्ये असलेला परिवर्तनाचा कलही त्यांच्या लक्षात आला नाही. परिणामी पॅनलचा दारुण पराभवाचा सामना करावा लागला. सभासदांनी परिवर्तन घडवत, सहकारला कौल दिला आहे.
सत्ताधाऱ्यांना नाकारत तुमच्या हातात बॅंकेच्या चाव्या दिल्या आहे. त्यामुळे सहकार पॅनलनेही जबाबदारीने सभासदांच्या हितासाठी काम करून १०३ वर्ष जुन्या बॅंकेचा गाडा हाकावा एवढीच माफक अपेक्षा!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.